बैठ्या जीवनशैलीमुळे आरोग्याला धोका उभा राहिल्यामुळे मी सकाळी उठून चालायला सुरुवात केली. सुमारे चार पाच किलोमीटर चालणे इष्ट होते. घरातून स्वयंचलित दुचाकीवरून टेकडीच्या पायथ्याशी जात असे. तेथे गाडी लावून वीस मिनिटे चढून जायचे, वीस मिनिटे सपाटीवर चालायचे आणि वीस मिनिटे उतरायचे, असा माझा दिनक्रम होता. प्रत्यक्ष टेकडीच्या दारापर्यंत अनेकजण पेट्रोल-डिझेल जाळताना दिसत. मी विचार करू लागलो, मी या व्यायामासाठी किती पेट्रोल जाळत असेन?
माझ्या घरापासून टेकडीच्या पायथ्यापर्यंतचे अंतर एक किलोमीटर असेल. माझे वाहन लिटरला ७५ किमी सरासरी वापरत असेल. तर जाऊनयेऊन २० ग्रॅम (२५ मिलिलिटर) एवढे तरी पेट्रोल वापरत असेन. (पेट्रोलचा उष्मांक प्रतिग्रॅम १०५०० कॅलरी). म्हणजे वीस ग्रॅम पेट्रोल जाळल्यावर सुमारे दोन लाख कॅलरी इतकी उष्णता निर्माण होत असेल. आपण सर्वसाधारणपणे ५० सरासरी देणारी दुचाकी किंवा २० सरासरी देणारी चारचाकी वापरत असू तर हा हिशेब बदलेल. म्हणजे मी जेव्हा एक किलोमीटर चालतो, तेव्हा शरीरातून सुमारे पन्नास कॅलरी जाळतो, त्याऐवजी पेट्रोल जाळले तर दोन लाख कॅलरी जाळतो. हेच पेट्रोल मी माझ्या १०चौरसमीटरच्या (१० फूट लांबी, रुंदी, उंचीच्या) खोलीत जाळले, तर खोलीचे तापमान किती वाढेल? अशा आकारमानाच्या खोलीतील हवेचे वजन (खरे तर वस्तुमान) सुमारे ३४ किलो असते. २ लाख कॅलरी ३४ किलो पदार्थ गरम करायला वापरला तर तापमान सुमारे दीड अंश सेल्सियसने वाढेल. (हिशेबाच्या सोयीसाठी हवेची विशिष्ट उष्माधारकता ०.२५ मानली आहे.)
व्यायामासाठी वाहनावरून गेलो, तर जागतिक तापमानवाढीला मी किती हातभार लावतो याचे मोजमापच माझ्या पदरी पडले. चालण्यातून ज्या कॅलरी जळतात, त्या शरीराच्या आरोग्याला फायदेशीर आहेत. याउलट पेट्रोलचे वाहन चालवले, तर ते चार हजारपट जास्त कॅलरी जाळते. ते एकट्या माझेच नव्हे, तर सर्व मानवजातीचे नुकसान करीत असते. हे मान्यच करायला हवे, की व्यवहारात सगळीकडे चालत जाणे शक्य होणार नाही. लांब चालत गेल्यावर तातडीने दुसरीकडे जाण्याबद्दलचा फोन आला, तर तेथे जाणे शक्य नाही, दमणूक खूप होईल. पण यातून काही ठोकताळे मिळाले. मोजक्या वस्तू आणायच्या असतील, तर चालत जाऊन आणणे शक्य होईल. फार वजन नसेल तर असे वाणसामान आणणे सहज शक्य आहे. आपण किती पेट्रोल जाळून किती कार्बनउत्सर्जन करत असतो, याचे वास्तव आकडे उदास करणारे आहेत. पण आपण उलटा विचार केला तर? म्हणजे मी जर जवळच्या एक किलोमीटर अंतरापर्यंत पेट्रोल जाळण्याऐवजी चालत गेलो, तर मी दोन लाख कॅलरी जाळणे टाळतो.
माझ्या खोलीचे तापमान दीड अंश सेल्सियसने वाढणे टाळतो. अशा दिशेने विचार केला तर चालायला हुरुप येतो. आणि त्यामुळे आणि मी सकाळी चालायला जाताना पेट्रोलचे वाहन वापरायचे नाही असे ठरवले. लांबच्या विशिष्ट टेकडीवर, मैदानावर, बागेत जाण्याचा हट्ट धरायचा नाही असे ठरवले. आमच्या घरापासून जवळच्या अंतरात कमी वर्दळीची अनेक ठिकाणे, रस्ते आहेत. पण कदाचित एकूण नगर नियोजनातही किमान अंतरावर चालता येईल असे रस्ते, बागा, पदपथ असावेत. असेही निकष आपल्याला काढता येतील. चालायला जातानासुद्धा वाहन वापरण्याऐवजी चालत गेले तरी चालते, हे समजून त्याप्रमाणे वागायला सुरुवात केली, त्याला आता सव्वाशे दिवस होऊन गेले. कडाक्याच्या थंडीत- उन्हाळ्यात, धुंवाधार पावसात मी असाच वागेन का, हे माहिती नाही; पण इतके दिवस चालल्यानंतर हा विचार लिहून काढण्याइतके नैतिक बळ मी नक्कीच मिळवले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.