David card Sakal
संपादकीय

‘सांख्य’ दर्शन : प्रयोगशील अर्थशास्त्रावर मोहोर

अर्थशास्त्रात ‘नैसर्गिक प्रयोगपद्धती’ची क्रांती आणल्याबद्दल या वर्षीची अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत.

डॉ. मानसी फडके

अर्थशास्त्रात ‘नैसर्गिक प्रयोगपद्धती’ची क्रांती आणल्याबद्दल या वर्षीची अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत. यापैकी अर्धे पारितोषिक युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया (बर्कले) येथील डेव्हिड कार्ड यांना मिळाले, तर अर्धे पारितोषिक ‘जोशुआ अँग्रिस्ट’ (एमआयटी) आणि गुइडो इंबेन्स (स्टॅनफर्ड) यांना मिळाले आहे. आज डेव्हिड कार्ड यांची गोष्ट ऐकूया!

वर्ष १९९२. यावर्षी अमेरिकेतील न्यू जर्सी राज्यात सरकारने किमान वेतनाचे दर वाढवले. अर्थशास्त्रात साधा नियम आहे, किंमत वाढली, की मागणी कमी होते. याच तत्त्वाला धरून, वेतनवाढ झाल्यावर सहसा कुठल्याही उद्योगात कामगार कमी करण्याची प्रक्रिया सुरु होते. म्हणजेच वेतनवाढ झाली, की रोजगार कमी होतो. न्यू जर्सीमध्ये किमान वेतन ताशी ४.२५ डॉलर होते, ते वाढवून ताशी ५.०५ डॉलर करण्यात आले. शेजारच्याच पेनसिल्व्हानिया राज्यात मात्र किमान वेतन ४.२५ डॉलर इतकेच ठेवण्यात आले होते. प्रयोगाकरीता ही एक आदर्श संधी होती. आपोआपच, काही वेगळे नियोजन न करता, न्यू जर्सीचे छोटे उद्योग ‘ट्रिटमेंट ग्रुप’ तर पेनसिल्व्हानियातील छोटे उद्योग ‘कंट्रोल ग्रुप’ झालेले होते. ‘श्रमाचे अर्थशास्त्र’ या विषयात खास रुची असलेल्या आणि नैसर्गिक प्रयोगप्रणालीमध्ये विश्वास असलेल्या डेविड कार्ड यांच्यासाठी संशोधनाची सुवर्णसंधी मिळाली. ‘कार्ड’ आणि त्यांचे मित्र ‘ऍलन क्युगर’ लगेच कामाला लागले. न्यू जर्सीच्या फास्टफूड हॉटेलांमधील रोजगाराची आकडेवारी ते गोळा करू लागले. संशोधनाचा निष्कर्ष धक्कादायक होता.

पेनसिल्व्हानियातील हॉटेलांपेक्षा न्यू जर्सीतील हॉटेलांमध्ये रोजगार १३ टक्क्यांनी वाढला! नैसर्गिक प्रयोगांच्या आधारे शिष्टाचाररहित, अपारंपरिक संशोधन करणे हा जणू ‘कार्ड’ यांचा हातखंडाच आहे. १९८९मध्ये अचानक क्युबामधून सव्वा लाख स्थलांतरित मायामीमध्ये आले. स्थलांतरितांची ही संख्या मायामीच्या कामगारांच्या जवळजवळ सात टक्के होती. लगेचच, स्थलांतरितांमुळे स्थानिकांच्या वेतनावर आणि रोजगार संधींवर होणारे दुष्परिणाम याबद्दल अमेरिकी माध्यमांत जोरात मोहीम सुरु झाली. इथेदेखील कार्ड यांना मात्र नैसर्गिक प्रयोगशैलीचा वापर करून संशोधनाची संधी दिसली. आकडेवारी गोळा केल्यावर पुन्हा एकदा अगदी आश्चर्यदायक मुद्दा समोर आला. स्थलांतरामुळे स्थानिकांच्या रोजगारावर आणि वेतनांवर कुठलाही परिणाम झालेला नव्हता!

नैसर्गिक प्रयोगांमधून आकडेवारी गोळा करणे आणि त्यातून डोळसपणे परिस्थितीचे विश्लेषण करणे हे त्यांचे मुख्य योगदान आहे. पण त्यांच्या या संशोधनांविषयी भलतेच समजही पसरविले गेले. ‘कार्ड’ हे स्थलांतराचे समर्थन करतात, तसेच सरकारने किमान वेतनवाढ राबवावी, या मताचे ते आहेत, अशी त्यांच्याबद्दलची प्रतिमा आहे. खरं तर, मायामीमधील संशोधन करतांना कार्ड यांनी स्पष्टपणे असे मांडले होते, की मायामीतील निष्कर्ष हा इतर कुठल्या शहरांत लावण्यासारखा नाही. याचे कारण असे, की मायामीमध्ये कमी वेतनावर रोजंदारी करण्याच्या प्रचंड संधी उपलब्ध होत्या. जिथे तसे नसेल तिथे वेगळे चित्र दिसते.लॉस एंजलिससारख्या शहरांमध्ये स्थलांतरितांमुळे स्थानिकांचा रोजगार कमी होतो, हेही त्यांनी दाखवले होते.

मोठ्या सामाजिक प्रश्नांवर संशोधकाला ‘प्रयोग’ करण्याची मुभा नसते. काही जिल्ह्यांत स्थलांतरितांना पाठवूया आणि काहींमध्ये नको, असा प्रयोग अर्थशास्त्रज्ञ किंवा सरकारी अधिकारी तयार करूच शकत नाही. पण काही वेळेला एखाद्या धोरणात्मक किंवा राजकीय घडामोडींमुळे प्रयोगसदृश परिस्थिती निर्माण होते. या नैसर्गिक प्रयोगातून अर्थशास्त्रातील काही विचारांची तपासणी कार्ड यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain News : पुण्यात ढगफुटी सदृश्य पावसाने घरे, गाड्या पाण्याखाली, आज शाळांना सुट्टी जाहीर; प्रशासनाचे नागरिकांना सर्कतेचे आवाहन

Britain News: 'ब्रिटनमध्ये स्थलांतरितांविरोधात मोर्चा'; उजव्या विचारसरणीच्या समर्थकांचा पोलिसांबरोबर संघर्ष

Mumbai Monorail Breakdown : भर पावसात ट्रॅकवर अडकली मोनो रेल, प्रवाशांना बाहेर काढण्यात यश; दोन महिन्यांत दुसरी घटना

कसलं व्यसन नाही, तंदुरुस्त अन् आनंदी आयुष्य; तब्येत बरी नाही मेसेज केल्यानंतर १० मिनिटात सहकाऱ्याचं निधन, बॉसला धक्का

Panchang 15 September 2025: आजच्या दिवशी शिव कवच स्तोत्र वाचावे व ‘सों सोमाय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT