dr milind naik
dr milind naik  
संपादकीय

परिणामकारक शिक्षणाचा ‘गृहपाठ’

डॉ. मिलिंद नाईक

बदललेल्या शैक्षणिक धोरणात गृहपाठावरील भर कमी करण्याची सूचना केलेली आहे. विद्यार्थ्यांना गृहपाठ द्यावा की देऊ नये, यावर शिक्षणतज्ज्ञांची परस्परविरुद्ध मते आढळतात. ‘गृहपाठ नकोच’ अशी भूमिका न घेता योग्य तेवढा व योग्य प्रकारचा गृहपाठ उपयुक्त ठरेल.

जा स्तीत जास्त लाकडे तोडण्याची स्पर्धा लागलेल्या दोन लाकूडतोड्यांची गोष्ट सर्वांना माहीत असेल. स्पर्धेत जिंकण्यासाठी एक जण दिवसभर सलग काम करत राहतो, तर दुसरा थोड्या-थोड्या वेळाने विश्रांती घेत बोथट झालेल्या कुऱ्हाडीला धार लावत काम करतो. अर्थातच दुसरा जिंकतो. शिक्षणाचेही असेच आहे. केवळ सातत्याने काम केल्याने अध्ययन होत नाही, तर ग्रहण केलेल्या माहितीचे ज्ञानात रूपांतर व्हायला हवे असेल, तर चिंतन-मननासाठीही पुरेसा वेळ व ताजेतवाने होण्यासाठी विश्रांती हवीच. शाळेतील काम हे मेंदूला चालना देणारे असल्याने खरे तर शाळेनंतरचा वेळ विश्रांतीसाठीच ठेवला पाहिजे. ज्या देशांमधील शिक्षण चांगले मानले जाते त्यापैकी एक म्हणजे फिनलॅंड. पण गंमत म्हणजे तेथे लहान वयात शिक्षण सुरू करण्याची घाई केली जात नाही. दिवसातील शाळेचा वेळ व वर्षभरातील शैक्षणिक दिवसही कमी असतात आणि गृहपाठही कमी असतो. याचा साधा अर्थ असा आहे, की खूप वेळ व सलग काम करून घेणे म्हणजे काही चांगले शिक्षण नाही. खूप दिलेल्या गृहपाठाने आकलन व कार्यशक्ती वाढते हा गैरसमज आहे, असे संशोधनानेही सिद्ध झाले आहे. मग गृहपाठ द्यायलाच हवा काय?

शिक्षक विद्यार्थ्याला शिकवीत नाहीत, तर शिकण्यास मदत करतात, असे अध्ययन-अध्यापनातले एक महत्त्वाचे तत्त्व सर्वमान्य आहे. याचाच अर्थ शिक्षकांशिवाय शिक्षण अवघड आहे, पण शिक्षकच सर्वकाही करतात हेही तेवढे काही खरे नाही. याशिवाय प्राथमिक शाळेत पूर्णपणे अध्यापकांवर अवलंबून असलेल्या विद्यार्थ्याचा हळूहळू स्वत:चा अभ्यास स्वत:च करणारा म्हणजेच अध्ययनाच्या बाबतीत स्वयंपूर्ण असणारा विद्यार्थी घडणे हेही अभिप्रेत आहे. या स्वयंपूर्ण होण्याच्या दीर्घ व खडतर प्रवासात गृहपाठ एक महत्त्वाची भूमिका करतो. वाढीच्या कुठल्या तरी टप्प्यात विद्यार्थी अध्ययनाच्या बाबतीत स्वयंपूर्ण व्हायला पाहिजे, ही भूमिका मान्य असेल, तर मग प्रश्न गृहपाठ हवा की नको असा न राहता तो केव्हा व कसा द्यावा एवढाच राहतो. मग प्राथमिक शिक्षणाच्या सुरवातीच्या काळात गृहपाठ दिला नाही, तरी वयोमानानुसार यात काही बदल करायला हवेत, हेही नक्की नाही काय?
शिक्षकाला स्वत:ला येणाऱ्या गोष्टी विद्यार्थ्याला आत्मसात करायला लावणे म्हणजे शिक्षण. जी गोष्ट शिकवायची ती शिक्षकाने आधी करून दाखवावी लागते. नंतरच्या पायरीला स्वत: करून दाखवताना विद्यार्थ्यांची मदत घ्यावयाची असते. तिसऱ्या पायरीला ती गोष्ट विद्यार्थ्याला करायला लावून शिक्षकाने मदत करावयाची असते. मग चौथ्या पायरीला विद्यार्थ्याची स्थिती ती बाब स्वत:चे स्वत: करण्यासारखी होते व पाचव्या पायरीला त्यात तरबेज होण्यासाठी सराव करावयाचा असतो. यातील पहिल्या चार पायऱ्यांमध्ये शिक्षकाची मदत लागत असल्याने त्या शाळेतच शिक्षकांच्या समवेतच व्हाव्या लागतात. तर या चार पायऱ्या पूर्ण झाल्यानंतर सरावासाठी व तरबेज बनण्यासाठी पाचवी पायरी म्हणून गृहपाठ देणे इष्ट ठरते. अलीकडे अभ्यासक्रम लवकर संपविण्याच्या नादात, शिक्षक शाळेत एकदा शिकवितात व थेट सरावासाठी गृहपाठ देतात. घोटाळा इथेच होतो. पहिल्या चार पायऱ्या न झाल्यामुळे पुरेशा न समजलेल्या भागावर थेट सराव करावा लागतो आणि म्हणूनच तो टाळण्याकडे कल वाढतो. तो कंटाळवाणा होतो. त्यामुळे गृहपाठ शेवटच्या पायरीलाच दिला गेला आहे ना याचा नीट विचार करायला हवा.

गृहपाठ काय व कशा प्रकारचा द्यायला हवा यावरही विचार हवा. शिक्षा टाळण्यासाठी तो करण्यापेक्षा आनंदाने करावासा वाटेल असे व्हायला हवे. परंतु, पुष्कळदा गृहपाठ म्हणजे भरमसाट लेखनकार्य दिले जाते. अशा प्रकारचा कंटाळवाणा गृहपाठ दिल्यास तो न होण्याचीच शक्‍यता जास्त. गृहपाठाचे उद्दिष्ट हे शाळेत शिकलेल्या भागाची वेगवेगळ्या प्रकाराने उजळणी करणे अथवा कृती करून एखाद्या नव्या प्रकारची माहिती मिळविणे या प्रकारचे असतील तर विद्यार्थ्यांची गृहपाठ करण्याची प्रेरणा टिकून राहते. मानवी स्मरणशक्तीचा गुणधर्म म्हणून पाहिला तर अध्ययनानंतर पहिल्या २४ तासांत केलेली उजळणी शिकलेले स्मरणात राहण्यासाठी प्रभावशाली ठरते. गृहपाठांसाठी विविध प्रकारची कार्यपत्रके द्यायला हवीत अथवा त्यात कृती हवी ज्यात विद्यार्थी रंगून जातील. शिवाय केवळ लेखन गृहपाठामुळे शिक्षणातील मर्यादित साध्यांचे मूल्यमापन होते. कृतियुक्त गृहपाठ विद्यार्थ्यांनाही आवडतात. परंतु यासाठी केवळ पाठ्यपुस्तकी अभ्यासक्रम म्हणजे शिक्षण ही मानसिकता शिक्षकांनी बदलली पाहिजे. विकसित देशांतील शिक्षणपद्धतीत कल्पकता व प्रकल्प पद्धती हे परवलीचे शब्द आहेत, त्याची दखल घ्यायला हवी. काही शिक्षक अजिबात गृहपाठ देत नाहीत, तर काही भरमसाट! प्राथमिक शिक्षणाच्या सुरवातीच्या काळात गृहपाठ देऊ नये हे खरे असले, तरी वाढत्या वयानुसार गृहपाठाचे प्रमाण व काठिण्य वाढायला हवे. खेळण्यासाठी काही वेळ, विद्यार्थ्यांना स्वत:चा अभ्यास करण्यासाठीचा वेळ राखीव ठेवून आणि सध्याच्या धावपळीच्या युगातील दिनक्रमाचा विचार करता दिवसाकाठी उच्च प्राथमिक गटातील विद्यार्थ्यांसाठी ४५ मिनिटे ते एक तास यापेक्षा जास्त वेळ, तर माध्यमिक विद्यार्थ्यांना एक ते दीड तासापेक्षा जास्त वेळ अभ्यास करावा लागेल, असा गृहपाठ शक्‍यतो देऊ नये. यासाठी एकाच वेळी एकापेक्षा जास्त शिक्षकांचे गृहपाठ येऊ नयेत म्हणून शिक्षकांमध्येही योग्य संवाद हवा. अन्यथा या सर्वाचा परिणाम कौटुंबिक जीवनावर होतो. झोपायला जाईपर्यंत किंवा झोप मोडून अभ्यास करावा लागल्याने कुटुंबातील संवाद कमी होऊन वर्तणुकविषयक प्रश्न निर्माण होतात. शारीरिक स्वास्थ्य बिघडते ते वेगळेच.
पुष्कळदा गृहपाठ केला नाही, तर ती जबाबदारी कुणाची यावरही वाद होतात. भरमसाट गृहपाठ देऊन तो विद्यार्थ्याने केला नाही की शिक्षक पालकांना वेठीस धरतात, तर शिक्षक गृहपाठ देत नाहीत म्हणून काही वेळा पालकही तक्रार करतात. शिक्षकांचे मुलांच्या घरच्या वर्तणुकीवर नियंत्रण असू शकत नाही व सर्वच पालक हे शिक्षणतज्ज्ञ नाहीत हे गृहीत धरून गृहपाठ करून घेण्याची जबाबदारी पालकांची, मात्र त्यातील अचूकता तपासण्याची जबाबदारी शिक्षकांची अशी विभागणी करावी लागेल. पण भारतात यालाही मर्यादा आहेत. येथे अनेक विद्यार्थी ही शिक्षण घेणारी पहिली पिढी आहे,त्यामुळे पालकांची भूमिकाही थोडीशी शिक्षकांना करावी लागेल. खरेतर अशिक्षित पालकांचे प्रमाण पाहता शाळेतच एखादा तास वाढवून शिक्षकांच्या देखरेखीखाली स्वयंअध्ययन करवून घेणे उत्तम. पण व्यवहार्यत: हे शक्‍य होईल असे नाही. तात्पर्य गृहपाठ हा औषधासारखा किंवा पूरक आहारासारखा आहे. नाही घेतला तरी प्रश्न आणि खूप घेतला तरी प्रश्नच. म्हणून ‘गृहपाठ नकोच’ अशी भूमिका न घेता योग्य तेवढा व योग्य प्रकारचा गृहपाठ नक्कीच उपयुक्त ठरेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT