edward wilson
edward wilson sakal
संपादकीय

‘आधुनिक डार्विन’चा अस्त

सकाळ वृत्तसेवा

विज्ञानक्षेत्रात कधीकधी अशी व्यक्ती निर्माण होते, की जिच्यामुळं विज्ञानक्षेत्राचा चेहरामोहरच बदलून जातो. अशा व्यक्तींचं कर्तृत्व इतकं मोठं असतं की त्यांचा काळ हा त्यांच्या नावानं ओळखला जातो.

- डॉ. प्रदीपकुमार माने

जीवशास्त्रज्ञ एडवर्ड विल्सन यांचं योगदान इतकं महत्त्वाचं आहे, की जीवशास्त्रातील नजीकच्या काळाला ‘विल्सन युग’ म्हणावे लागेल. मुंग्यांवरील त्यांचा कामामुळं ते जरी प्रसिद्ध असले तरी त्यांचं काम फक्त तेवढ्यापुरतं सीमित नाही. डार्विन यांच्या उत्क्रांती सिद्धांताचा विस्तार करणारा जीवशास्त्रातील प्रबोधक त्यांच्या निधनाने हरपला आहे.

विज्ञानक्षेत्रात कधीकधी अशी व्यक्ती निर्माण होते, की जिच्यामुळं विज्ञानक्षेत्राचा चेहरामोहरच बदलून जातो. अशा व्यक्तींचं कर्तृत्व इतकं मोठं असतं की त्यांचा काळ हा त्यांच्या नावानं ओळखला जातो. अलीकडेच निधन झालेले जीवशास्त्रज्ञ एडवर्ड विल्सन यांचं योगदान इतकं महत्त्वाचं आहे, की जीवशास्त्रातील नजीकच्या काळाला ‘विल्सन युग’च म्हणावे लागेल. मुंग्यावरील त्यांचा कामामुळं ते जरी प्रसिद्ध असले तरी त्यांचं काम फक्त तेवढ्यापुरतं सीमित नाही. ते विसाव्या आणि एकविसाव्या शतकातील महान उत्क्रांती जीवशास्त्रज्ञ होते. चार्ल्स डार्विन यांनी मांडलेल्या उत्क्रांती सिद्धांताचा विस्तार करणारे जीवशास्त्रातील प्रबोधक होते, असे म्हटले तर जास्त योग्य ठरेल. त्यामुळेच तर त्यांना ‘आधुनिक डार्विन’ म्हटलं गेलं.

शाळकरी वयातच विल्सन यांनी मुंगीची नवी प्रजाती शोधली. मुंग्यांची रहस्यमय रासायनिक भाषा उलगडली. आयुष्यभरात एकट्यानेच चारशेपेक्षा जास्त मुंग्यांच्या प्रजाती शोधल्या. मुंग्यांविषयीचं त्यांचं काम इतकं मोठं आहे, की मुंगी आणि एडवर्ड विल्सन हे शब्द समानार्थी बनले होते. असं जरी असलं तरी विल्सन यांच्या कार्याचं मूल्यमापन आपणाला त्यांच्या मूलगामी आणि विविधांगी योगदानाचा विचार करूनच करावं लागेल. नंतर नंतर विल्सन यांनी आपण करीत असलेल्या मुंग्यांच्या कामाचा विस्तार केला आणि इतर कीटकांनाही त्यांच्या संशोधनाच्या कक्षेत घेतलं. याच अभ्यासाद्वारे १९७१ मध्ये ‘द इन्सेक्ट सोसायटीज’ नावाचा ग्रंथ लिहिला. या संशोधनपर ग्रंथामुळं सामाजिक कीटकांचा अभ्यास करण्यासाठी एक नवीन दृष्टी प्राप्त झाली. विल्सन फक्त एवढ्यावरच थांबले नाहीत, तर चारच वर्षात म्हणजे १९७५मध्ये त्यांनी आपल्या संशोधनाच्या आधारे ‘सोशिओबायालॉजी- द न्यू सिंथेसिस’ या ग्रंथाद्वारे सामाजिक कीटकांना लागू असणारे सामाजिकतेचे नियम इतर पृष्ठवंशीय प्राण्यांना लागू केले. अगदी मानवासहित !

नव्या विद्याशाखेचा जन्म

या ग्रंथातील विल्सन यांची मांडणी इतकी क्रांतिकारी ठरली की त्यातून ‘सोशिओबायालॉजी’ म्हणजेच ‘समाजजीवविज्ञान’ या नव्या शाखेचा जन्म झाला. या नवीन शाखेवर कडकडून टीका झाली. मनुष्यात आणि इतर प्राण्यांत आलेली सामाजिकता एकदमच अवतरलेली नाही. ती जैविक उत्क्रांतीतूनच आलेली आहे. मुंग्या, पक्षी, माकडे आणि मानव यामधील सामाजिक वर्तनाचा जीवशास्त्रीय पाया सांगण्याचा प्रयत्न विल्सन यांनी या संशोधनाद्वारे केला. हिंसा, वर्चस्ववृत्ती या वृत्ती निर्माण होण्यामागे जनुकीय कारण असते असा निष्कर्ष विल्सन यांनी मांडला. इथे त्यांना सर्व मानवी वर्तणूक किंवा सामाजिक वर्तणूक पूर्णपणे जनुकीयदृष्ट्या म्हणजेच जैवनियंत्रित असते असे म्हणायचे नाही.

पण मानव प्राणी हा पूर्णपणे संस्कृतीने घडणारा जीव आहे, हा विचार त्यांनी आपल्याला प्राप्त झालेल्या संशोधनाद्वारे नाकारला. मानवाच्या वर्तणुकीत जैविक प्रेरणाही मूलभूत आणि महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात, असे विल्सन यांनी मांडले. जैवविज्ञानातही हा विल्सन यांचा विचार लगेच स्वीकारला गेला नाही. पण हळूहळू या शाखेनं जीवशास्त्रातील आपली पायवाट विस्तारित केली आहे. आज ‘सोशिओबायालॉजी’ जीवशास्त्रातील आधुनिक आणि महत्त्वाची शाखा बनली आहे. या पुस्तकांनंतर लगेच तीनच वर्षात म्हणजे १९७८मध्ये ‘ऑन ह्युमन नेचर’ हा पुन्हा आणखी एक क्रांतिकारी ग्रंथ प्रसिद्ध केला.या ग्रंथात विल्सन यांनी मानवी सामाजिक कृतींचा अर्थ समजून घेण्यासाठी त्यांची जैविक घडण समजून घ्यावी लागते या मताचा ठामपणा दाखविण्याचा प्रयत्न केला. विल्सन यांच्या या पुस्तकावरही टीका झाली; पण वर्षभरात पुस्तकाला पुलित्झर पुरस्कार मिळाला आणि टीका हळूहळू मावळली.

‘द इन्सेक्ट सोसायटीज’, ‘सोशिओबायालॉजी- द न्यू सिंथेसिस’ आणि ‘ऑन ह्युमन नेचर’ ही तीन पुस्तके ही विल्सन यांनी केलेल्या संशोधनाची परिपूर्ती असणारी पुस्तकत्रयी (ट्रिलॉजी) म्हणावी लागेल. १९८१मध्ये त्यांनी लिहिलेले ‘जीन माइंड अँड कल्चर’ हे पुस्तक मानवी वर्तणुकीच्या जैविक आणि सांस्कृतिक प्रेरणांचा सविस्तर अभ्यास मांडते. १९९०मध्ये बर्ट हॉलडॉब्लर यांच्याबरोबर लिहिलेले ‘ॲण्ट्स’ हे पुस्तक आजही मुंग्यांच्या अभ्यासासाठी ‘बायबल’समजले जाते. १९९८मध्ये विल्सन यांचे पुस्तक ‘कॉन्सिलियन्स- द युनिटी ऑफ नॉलेज’ हे पुस्तक आंतरशाखीय ज्ञानप्रणाली मांडणारे आजच्या काळातील महत्त्वाचे पुस्तक आहे. मानवासमोरील प्रश्न सोडविण्यासाठी ज्ञानशाखांतील सर्व शाखांनी एकात्मिक दृष्टिकोन बनविला आणि बाणविला पाहिजे अशी मांडणी करते. स्वतः विल्सन यांनाही सातत्याने या पुस्तकातील विचार हिरीरीने मांडला आणि आचरण करून दाखविला. पर्यावरण संरक्षण विषयी बोलताना एडवर्ड विल्सन एकदा म्हणाले होते, ‘आर्थिक फायद्यासाठी वर्षावने नष्ट करणे म्हणजे जेवण बनविण्यासाठी एखादे प्रबोधनकाळातील सुंदर चित्र जाळणे होय’. एडवर्ड विल्सन यांचे जीवन म्हणजे त्यांनी स्वतःच्या कृतीतून त्यांनी पुसट होत जाणारे पर्यावरणाचे सुंदर चित्र समजावून सांगण्याचा व वाचविण्याचा केलेला प्रयत्न होय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT