Covid-19 Sakal
संपादकीय

भाष्य : कोरोनाच्या जनुकीय पाऊलखुणा

कोरोनाच्या प्रसाराने जिनोमिक सिक्वेन्सिंगच्या अभ्यासाला गती मिळाली आहे. त्यामुळे त्याच्यातील उत्परिवर्तने, स्वरुपातील बदल यांच्या अभ्यासाने विषाणू किती उपद्रवी, त्रासदायक होऊ शकतो, हे लक्षात येते.

डॉ. प्रदीप आवटे

कोरोनाच्या प्रसाराने जिनोमिक सिक्वेन्सिंगच्या अभ्यासाला गती मिळाली आहे. त्यामुळे त्याच्यातील उत्परिवर्तने, स्वरुपातील बदल यांच्या अभ्यासाने विषाणू किती उपद्रवी, त्रासदायक होऊ शकतो, हे लक्षात येते.

कोरोनाच्या प्रसाराने जिनोमिक सिक्वेन्सिंगच्या अभ्यासाला गती मिळाली आहे. त्यामुळे त्याच्यातील उत्परिवर्तने, स्वरुपातील बदल यांच्या अभ्यासाने विषाणू किती उपद्रवी, त्रासदायक होऊ शकतो, हे लक्षात येते. त्याशिवाय, टीबीसारख्या आजाराला रोखण्याकरता जनुकीय अभ्यास तपासणी उपयुक्त ठरू शकते.

डिसेंबर २०२० पासून आपण कोरोना विषाणूच्या जनुकीय क्रमनिर्धारणाचा अभ्यास करतो आहोत. हे जिनोमिक सिक्वेन्सिंग महाराष्ट्रात सात प्रयोगशाळा करत आहेत. पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था (एन.आय.व्ही.), पुण्याचेच बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, राष्ट्रीय पेशी विज्ञान केंद्र, ‘राष्ट्रीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था’ या साऱ्या महत्त्वपूर्ण संस्था हे काम करत आहेत. मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयाची मध्यवर्ती प्रयोगशाळा आणि नागपूर

येथील ‘नीरी’ ही संस्था देखील यात महत्त्वाचे योगदान देत आहेत. स्वतःच्या जनुकीय रचनेमध्ये सातत्याने बदल करत राहणे हा विषाणूच्या जीवनक्रमातील नैसर्गिक भाग आहे. विषाणूला स्वतःची संख्या वाढविण्यासाठी एका सजीव पेशीची गरज असते. या सजीव पेशीतील संसाधनाच्या मदतीने विषाणू स्वतःची संख्या वाढवत असतो. विषाणूंचे ही हुबेहूब प्रतिकृती तयार होत असताना (रेप्लिकेशन) त्यामध्ये काही चुका जाणता अजाणता होतात, त्यालाच आपण उत्परिवर्तन (म्युटेशन) असे म्हणतो. विषाणूंच्या जनुकीय रचनेची तुलना आपण एखाद्या विटांनी बांधलेल्या भिंतीशी केली तर प्रत्येक वीट म्हणजे एक अमिनो ॲसिड असते आणि यातील अमिनो ॲसिडचा क्रम बदलणे म्हणजेच वेगळी वीट वेगळ्या ठिकाणी लावली जाणे. तेच हे उत्परिवर्तन होय. उत्परिवर्तनाद्वारा होणारा प्रत्येक बदल हा महत्त्वपूर्ण असतो असे नव्हे. अनेकदा जनुकीय रचनेमध्ये होणारे बदल हे किरकोळ स्वरूपाचे असतात. विषाणूच्या स्पाईक प्रोटिनमध्ये होणारे बदल अधिक महत्त्वाचे असतात, याचे कारण स्पाईक प्रोटिनच्या मदतीने विषाणू मानवी शरीरातील संवेदी चेतातंतूच्या टोकासोबत (रिसेप्टर) जोडला जातो, फुफ्फुसातील पेशींना चिकटतो. त्यामुळे या प्रथिनातील बदल अधिक महत्त्वाचे असतात.

जगभरात आतापर्यंत कोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत अनेक उत्परिवर्तने झालेली आहेत. आपल्याकडे आढळलेले ‘डेल्टा म्युटेशन’ आपल्या देशातील आणि राज्यातील दुसऱ्या लाटेला मुख्यत्वे कारणीभूत झाले; तर ओमायक्रॉन हा उपप्रकार आपल्याकडील तिसऱ्या लाटेसाठी कारणीभूत ठरला होता. ‘व्हेरियंट ऑफ कन्सर्न’ म्युटेशनमुळे निर्माण होणाऱ्या कोरोना विषाणूच्या उपप्रकाराला आपण वेगळा विषाणू (व्हेरियंट) असे म्हणतो. व्हेरियंटचे दोन प्रकार आहेत. पहिला म्हणजे व्हेरियंट ऑफ कन्सर्न, याचा अर्थ हा विषाणूचा नवा उपप्रकार चिंता करण्याजोगा आहे, असा होतो. विषाणूच्या ज्या प्रकाराबद्दल फारशी माहिती नाही, त्याला ‘व्हेरियंट अंडर इन्व्हेस्टिगेशन’ अथवा ‘व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट’ अशा नावांनी संबोधले जाते. एखाद्या विषाणू उपप्रकाराला ‘व्हेरियंट ऑफ कन्सर्न’ म्हणण्याकरता तीन गोष्टी महत्त्वाच्या असतात. विषाणूतील या बदलामुळे विषाणूच्या प्रसाराचा वेग वाढणे. या उपप्रकारामुळे होणाऱ्या आजाराची तीव्रता वाढणे आणि या नव्या प्रकाराने विषाणूविरोधी औषधे अथवा लसीकरणाला दाद न देणे.

ओमिक्रॉन माझा लेकुरवाळा

मागील काही दिवसांपासून राज्यात बीए.४ ,बीए.५, बीए.२.७५ आणि असेच काही व्हेरियंट नोंदवले जात असताना पाहत आहोत. यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे कोणतेही नवीन विषाणू नाहीत, तर ते मूळ ओमिक्रॉन विषाणूच्या कुटुंबातील नवे सदस्य आहेत. इंग्रजीत आपण त्याला ‘सब-लिनिएज’ म्हणतो. म्हणजे हे सारे विषाणू प्रकार हे ओमिक्रॉनची बाळे असून पूर्णपणे नवीन विषाणू प्रकार म्हणावा इतपत बदल सध्या तरी या विषाणूमध्ये झालेले दिसत नाहीत. ओमिक्रॉन हा जागतिक आरोग्य संघटनेने व्हेरियंट ऑफ कन्सर्न म्हणून घोषित केलेला आहे. या विषाणूमुळे आजाराचा प्रसार वाढतो, तथापि आजाराची तीव्रता मात्र वाढत नाही. त्यामुळे अनेकांनी ओमिक्रॉनचे वर्णन ‘नैसर्गिक लसीकरण’ असे केले आहे. आता नव्याने ओमिक्रॉनची ही बीए बाळे आढळत असल्याने कोरोना आता पदवीधर झाला, असे विनोदही समाज माध्यमांवर धुमाकूळ घालत आहेत. या नवीन विषाणूंमुळे आजाराचा प्रसार काही प्रमाणात वाढलेला असला तरी आजाराची तीव्रता वाढताना दिसत नाही.

मागील काही महिन्यांपासून नवीन रुग्णांपैकी साधारणपणे चार ते पाच टक्के रुग्णांना भरती होण्याची गरज भासते आहे; तर ऑक्सिजनची किंवा व्हेंटिलेटरची गरज भासणारी मंडळी एकूण रुग्णसंख्येच्या एक टक्क्यांपेक्षाही कमी आहेत. विषाणूचा जनुकीय अभ्यास हा साथरोग सर्वेक्षणातील एक महत्त्वाचा मैलाचा दगड आहे. यामुळे नव्याने येणारा व्हेरियंट आपल्याला वेळेत कळणे शक्य होणार आहे. तसेच सध्या विषाणूचा हा जनुकीय अभ्यास जागतिक पातळीवर एका प्लॅट्फॉर्मवर शेअर होतो आहे. त्यामुळे विविध देशांतील माहितीचे आदानप्रदान झाल्याने विषाणूमधील धोकादायक जनुकीय बदलांची कल्पना आपल्याला वेळेत मिळाल्याने त्यानुसार उपाययोजना करणे शक्य होते आहे. कोरोना विषाणूचे असे नवे नवे उपप्रकार आपल्या समोर येत असले तरी याबाबत सर्वसामान्य जनतेने घाबरून जाण्याचे अजिबात कारण नाही. कारण कोरोनाचा विषाणू उपप्रकार कोणताही असला तरी सर्वसामान्य व्यक्तींनी घ्यावयाची काळजी, अंमलात आणावयाचे प्रतिबंधात्मक उपाय बदललेले नाहीत.

विषाणू उपप्रकार कोणताही असला तरी मास्कचा वापर, हातांची स्वच्छता, शारीरिक अंतर राखणे आणि अनावश्यक प्रवास टाळणे, गरजेशिवाय घराबाहेर पडणे टाळणे तसेच गर्दी होईल अशा कोणत्याही कौटुंबिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन न करणे हे प्रतिबंधात्मक उपाय वैयक्तिक आणि सामाजिक स्तरावर अमलात आणणे आवश्यक आहे. ज्या भागात हे उपप्रकार आढळत आहेत तेथे सर्वेक्षण, निकट सहवासितांचा शोध यावर विशेष भर देण्यात येत आहे. तेथे स्थानिक पातळीवर रुग्ण संख्या वाढते आहे का, रुग्णालयांमध्ये भरती होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढते आहे का या संदर्भातही साथरोग शास्त्रीय विश्लेषण करण्यात येते आहे. या भागातील लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी देखील पावले उचलली जात आहेत. कोरोनाच्या विषाणूने कसे वागावे, हे आपण ठरवू शकत नाही. त्याने कोणता पोशाख घालून, कोणत्या रूपात आपल्या समोर यावे, हे आपल्या हातात नाही. परंतु असे बहुरूपी विषाणू आपल्या अवतीभवती फिरत असताना आपले वागणे मात्र अधिक जबाबदारीचे असायला हवे आणि ते नक्कीच आपल्या हातात आहे.

सर्वेक्षणाचा नवा आयाम

जिनोमिक सिक्वेन्सिंग हे प्रयोगशाळा सर्वेक्षणातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण साधन या निमित्ताने आपल्या हाती आले आहे. याचा वापर इतर साथरोग आजारांचा समर्थ मुकाबला करण्यासाठी होऊ शकतो. क्षयरोग (टीबी) भारतासारख्या देशासमोरील मोठे आणि महत्त्वाचे आव्हान आहे. त्यात कोणत्याही औषधांना अजिबात दाद न देणारा टीबी- ड्रग रझिस्टंट टीबी या जनुकीय तपासणीमुळे आजाराच्या सुरुवातीच्या टप्प्यातच ओळखणे शक्य होत आहे. त्यामुळे रुग्णाला अधिक अचूक आणि नेमके उपचार देणे शक्य होणार आहे. कोरोना, टीबी किंवा कोणत्याही आजाराची ही जनुकीय पाऊलखुणा आपल्याला आजाराचा सूक्ष्म मागोवा घेऊन त्याचा प्रभावी प्रतिबंध करण्यासाठी उपयोगी पडणार आहेत.

(लेखक एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमाचे राज्य सर्वेक्षण अधिकारी आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Heritage status: अभिमानाची बाब! शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश

खरीप हंगामात ८१,००० शेतकऱ्यांना ११४० कोटींचे पीककर्ज! ६३ हजार ८४९ शेतकऱ्यांच्या १०३० कोटी रुपयांच्या पीककर्जाचे बॅंकांनी केले नवे-जुने

Latest Marathi News Updates: 'सीएम'पदासाठी भाजपात पक्ष विलिन करण्याची शिंदेंची तयारी - संजय राऊतांचा टोला!

IND vs ENG 3rd Test: रिषभ पंतने २५ मिनिटं नेट्समध्ये फलंदाजी केली, पण...! जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट्स, Video

Pune ISIS sleeper cell: मोठी बातमी! पुणे ‘इसीस स्लीपर सेल मॉड्युल’ प्रकरणी अकरावी अटक; तीन लाखांचा होता इनाम!

SCROLL FOR NEXT