Youths Sakal
संपादकीय

भाष्य : आव्हान तरुणाईच्या तणावमुक्तीचे

ताणतणाव, सामाजिक-आर्थिक स्थित्यंतरे आणि तांत्रिक प्रगतीतून येणारी सुखासीनता आजच्या तरुणाईपुढे विविध प्रकारची मानसिक आव्हाने उभी करीत आहे.

डॉ. विद्याधर बापट,मानसोपचारतज्ज्ञ

ताणतणाव, सामाजिक-आर्थिक स्थित्यंतरे आणि तांत्रिक प्रगतीतून येणारी सुखासीनता आजच्या तरुणाईपुढे विविध प्रकारची मानसिक आव्हाने उभी करीत आहे.

ताणतणाव, सामाजिक-आर्थिक स्थित्यंतरे आणि तांत्रिक प्रगतीतून येणारी सुखासीनता आजच्या तरुणाईपुढे विविध प्रकारची मानसिक आव्हाने उभी करीत आहे. त्या आव्हानांना तोंड देण्यासाठी तरुणाईला सक्षम करणे ही समाजावरील मोठी जबाबदारी आहे. ती कशी पार पाडता येईल?

आजची तरुणाई फार नाजूक वळणावरून चालली आहे. जीवघेणी स्पर्धा, इंटरनेटमुळे चांगल्या गोष्टींबरोबरच मिळणाऱ्या गेम्स, हिंसा आणि कामोत्तेजना वाढवणाऱ्या फिल्म्स, वेबसाइट्स, आभासी स्वातंत्र्याचा मोह, उत्तेजक पदार्थांची व्यसनं अशा अनेकानेक अपायकारक गोष्टींमुळे अनेक तरुणांची आयुष्य बरबाद होताहेत. मानसिक समतोल ढासळतोय. नैराश्य, राग वेगात तरुणाईत पसरतोय. सर्वच तरुणाईबाबत हे घडतंय असं नाही. काहीजण किंवा जणी प्रामाणिकपणे मूल्याधिष्ठित विचारसरणी अनुसरून, कठीण परिस्थिती स्वीकारून, आपल्यासाठी चांगलं काय आहे याचा विचार करून हिंमतीने, ध्येयाकडे मार्गक्रमण करत आहेत. त्यांच्या घरातील संबंधही सौहार्दपूर्ण आहेत.

मित्र-मैत्रिणी, प्रियकर-प्रेयसी आदी रिलेशनशिप असेल तर ती जबाबदारीचं भान ठेऊन आहे. सोशल मीडियाचा वापर जबाबदारीने केला जातोय. एकूण सर्व आलबेल आहे. अशा तरुणांचा ॲडव्हर्सिटी कोशंट चांगला आहे. (शांत राहून कठीण परिस्थितीतून मार्ग काढण्याची क्षमता.)

सद्यस्थितीत नैतिकतेची परिमाणं बदललेली आहेत. ती बदलत्या काळानुरूप, पिढी दरपिढी तशी नेहमीच बदलतात. आपण करीत असलेली गोष्ट, कृती योग्य की अयोग्य यापेक्षा त्याचे परिणाम आपल्यासाठी अंतिमतः चांगले की वाईट हे तपासून पहाणं महत्त्वाचं. काहीजण परिणामांचा विचार न करता बेभानपणे, बेजबाबदारपणे स्वैराचार करतात. त्याचे परिणाम त्यांना स्वतःला आणि कुटुंबालाही भोगावे लागतात. या सगळ्याला ते जबाबदार असतातच; पण बऱ्याचदा पालकांची त्यांच्याशी असलेली वागणूक, क्वचित, पालकांची बेभान आणि बेजबाबदार वागणूकही मुलांना ताणाखाली आणू शकते.

आज मुलांवर अपरिमित ताण आहेत. जीवघेणी स्पर्धा, चंगळवाद, अतिमुक्त वातावरण, तुटलेले नातेसंबंध इत्यादींमुळे तणाव वाढतो. त्यावर स्वस्थतेसाठी चुकीची पावलं उचलणं, चुकीचं वागणंही घडू शकते. मग सहज मिळणाऱ्या सिगरेट, दारू वगैरे गोष्टी तात्कालिक स्वस्थता देतात. हल्ली मुला-मुलींची निकोप, मर्यादा पाळून असलेली मैत्री स्वागतार्हच आहे. पण मर्यादा ठरवायच्या कशा, कोणी आणि का, हे प्रश्न मुलं विचारतात.

याचं उत्तर आहे क्षणिक सुखामागे न लागता होणारे अंतिम परिणाम लक्षात घ्यावेत. मोबाईल इंटरनेटचा अति आणि गैरवापर हा मुद्दा आहेच. आज जगामध्ये अस्वस्थतेच्या, नैराश्याच्या आजाराचे प्रमाण वाढत आहे. त्यामागे प्रामुख्याने मेंदूतील रासायनिक असंतुलन, त्याला पाठबळ देणारी अनुवंशिकता, व्यक्तीचा लहानपणापासून बनलेला मेंटल मेकअप (ज्यात घरातील आणि बाहेरील चांगले-वाईट अनुभव) अशी बरीच कारणं आहेत. त्यासाठी व्यसनं, इतर चुकीची प्रलोभनं ही उत्तरं नाहीतच. वेळ न दवडता तज्ज्ञांचं मार्गदर्शन, औषधे, प्रगत मानसोपचार पद्धती यांचा आधार घेणं महत्त्वाचं. त्याचबरोबर जे काठावर आहेत, त्यांनीही नकारात्मक भावनांवर नियंत्रण मिळवायचं कसं हे शिकावे. यात राग, भीती, अस्वास्थ्य, एकलकोंडेपणा, वेगवेगळे कॉम्प्लेक्सेस (गंड), अपराधीपणाची भावना इत्यादी सगळ्याच गोष्टी आल्या. मुळात या गोष्टी काय आहेत आणि का आहेत हे समजून घ्यावे.

ही पिढी अशी का वागते?

पुन्हा क्रोध या भावनेकडे विशेषत्वाने पाहावं लागेल. विशेषत: तरुण पिढीच्या. कारण त्यांच्या हातूनही अशा घटना घडल्या आहेत. ही पिढी अशी का वागते? अनेकांशी बोलताना असं आढळलं की जणू काही त्यांच्या आत लाव्हा उकळतो आहे. आत दबलीय निराशा, असुरक्षितता, व्यवस्थेविषयीचा राग, स्वत:विषयीचा राग. मग लाव्हा क्रोधरुपात सारखा बाहेर येतो. आक्रमकतेतून. तेल ओतायला आजूबाजूला सवंग करमणूक, ओंगळ भ्रष्टाचारी राजकारण आहेच. विविध माध्यमांद्वारे सहज उपलब्ध असलेली, लैंगिकदृष्ट्या उत्तेजित करणारी सवंग करमणूक आणि त्या भावनेचं शमन होण्यासाठी चुकीचे मार्ग, काहींच्या बाबतीत त्या भावना दाबाव्या लागणे.  सुखाच्या चुकीच्या कल्पना.

स्पर्धात्मक वातावरणाचा ताण आहेच. मग शिक्षण असो, नोकरी असो वा व्यवसाय. अपेक्षेप्रमाणेच सगळं मला मिळायला हवं आणि तेही ताबडतोब. खरं सुख भौतिक सुखातच आहे. ते मिळवीनच. दिलं तर सरळ, नाहीतर ओरबाडून. त्यासाठी मी आक्रमक व्हायलाच हवं. इतरांनी माझ्या मनासारखं वागावं. आज दुर्दैवाने अनेक तरुणांची हीच मानसिकता आहे. क्रोधामुळे मग त्यांच्यातल्या काहीजणांकडून घडणारे गुन्हेही वाढले आहेत. सगळ्यांच्याच हातून टोकाच्या गोष्टी घडताहेत असं नाही; पण युवावर्गात अतिराग आणि तो चुकीच्या पद्धतीने व्यक्त होणे वाढले आहे. त्यामुळेच रागासारख्या नकारात्मक भावनांवर नियंत्रण कसे मिळवायचं हे समजून घ्यावं.

एक लक्षात घेऊया, राग व्यक्त होताना त्यामागे अनेक अंतर्प्रवाह असतात. दबलेल्या भावना, असुरक्षिततेची भावना, पूर्वीच्या घटना, नकारात्मक दृष्टीकोन इत्यादींमधून निर्माण होणारी नकारात्मक उर्जा एकदम व्यक्त होते. थोडक्यात, आत्ता प्रसंग घडला आणि केवळ त्याबद्दलची प्रतिक्रिया म्हणून विशिष्ट प्रमाणात रागावलो, असं थेट नसतं. यात भावनात्मक जडणघडणीचा वाटा असतो. रागाच्या व्यवस्थापनात महत्त्वाची पायरी म्हणजे त्याचं मूळ शोधणे. ते नाहीसे करण्याचा प्रयत्न करणे. मुख्य म्हणजे राग व्यक्त न करण्याने शरीरावर अनिष्ट परिणाम होतात. त्याचे कारण म्हणजे राग या नकारात्मक भावनेचे गैरव्यवस्थापन. खरं तर रागाबरोबरच भीती, असुरक्षितता, अहंगंड वगैरेंचेही व्यवस्थापन नीट होत नाही.व्यक्तिमत्त्व दुबळं होतं. कधी विकृतीकडेही झुकू लागतं. जेव्हा भावनांचा अतिरेक होतो तेव्हा एकतर स्वत:ला संपवणे किंवा दुसऱ्याचा बळी घेणे अशी प्रवृत्ती निर्माण होते. हिंसा करण्याकडे प्रवृत्ती वाढायला लागते. नकारात्मक भावनांचं व्यवस्थापन शिकणं महत्त्वाचं आहे.

तरुणाईच्या दुसऱ्या भागाकडे पाहू जी स्वस्थ, संयमी आहे. विचारपूर्वक विपरीत परिस्थितीतून मार्ग काढते. त्यांनी भावनांचं व्यवस्थापन नीट शिकून घेतलं आहे, ती जिद्दीने पण वास्तवाचं भान ठेऊन ध्येयाकडे जात आहे. खरं तर या सगळ्याचं प्रशिक्षण लहानपणापासूनच मिळावं. सकारात्मकता विचार करण्याच्या पद्धतीचाच भाग व्हावा. या किंवा कुठल्याही संकटानंतर विपरीत परिस्थितीत टिकून रहाणं आणि त्यावर मात करणं हे शिकून घेणं, प्राणवायूइतकं महत्त्वाचं आहे. बुद्ध्यांकाबरोबरच, सामाजिकता निर्देशांक, भावनांवर नियंत्रण आणि महत्त्वाचे म्हणजे कठीण परिस्थिती हाताळण्याचा निर्देशांक, अपयश आलं तरी न खचता जिद्दीने उभं रहाणं या गोष्टी मुलांना जमायलाच हव्यात. त्या दृष्टीने घरात, शाळेत प्रयत्न हवेत. शिक्षणक्रमात या विषयाचा समावेश व्हावा. यामुळे व्यक्तिमत्व सक्षम बनेल, अस्वस्थतेवर मात करू शकेल. सकारात्मक विचारसरणीचा मेंदूवर खूप चांगला परिणाम होतो.

१. मेंदूमध्ये प्रीफ्रंटल कोर्टेक्समध्ये मज्जातंतूंची वाढ होते. नवीन synapses तयार होतात. याच भागात मन, विचार यासंबंधी महत्त्वाचे कार्य चालते. २. विश्लेषण व विचार करण्याची क्षमता वाढते. ३. मनाची सतर्क रहाण्याची क्षमता वाढते. ४. सकारात्मक विचारसरणी एकदा रुजली की सर्जनशील विचारक्षमता वाढते. संशोधनाअंती सकारात्मक विचारसरणीचे खूप फायदे लक्षात आले आहेत. १. आयुष्यमान वाढणं २. ताण तणावांचं निराकरण ३. अस्वस्थतेचे व नैराश्याचे आजार टाळणं किंवा झाल्यास लवकर बरे होण्यात मदत ४. शरीरातील प्रतिकारशक्ती वाढणं ५. व्यक्तिमत्व विकास ६. शारीरिक व मानसिक आजार लवकर बरे होणे. ७. भौतिक आयुष्यात हवं असणारं यश, समृद्धी स्वकर्तृत्वानं मिळवता येणं.

तरुण पिढी, लहान मुलांसाठी अशा पद्धतीच्या सकारात्मक प्रोग्रामिंगची नितांत गरज आहे. कारण व्यक्ती शांत, विवेकशील तर व्यक्तींचा समूह म्हणजेच समाज शांत आणि विवेकशील राहू शकेल. पालक, शिक्षक, समुपदेशक सगळ्यांवरच तरुणाईची निकोप वाढ, त्यांचा भावनिक समतोल, ॲडव्हर्सिटी कोशंट या दृष्टीने विचार आणि कृतीची जबाबदारी असेल.

(लेखक मानसतज्ज्ञ, समुपदेशक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ‘’नितीश कुमार यांना भारतरत्न द्या’’, जेडीयू नेते केसी त्यागींची पत्राद्वारे पंतप्रधान मोदींकडे मागणी!

WPL 2026 : Nadine de Klerk ची अष्टपैलू कामगिरी, RCB ने थरारक सामन्यात मारली बाजी; गतविजेत्या MI ची हार

महत्त्वाची बातमी! महापालिका निवडणुकीचा प्रचार मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता थांबणार; उमेदवारांचे पदयात्रा, घरोघरी भेटींवर भर, सोशल मिडियाचा वापर, वाचा...

Rahul Gandhi Attacks on BJP : दूषित पाणी, विषारी कफ सिरप ते अंकिता भंडारी हत्या ; राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात!

HSC Hall Ticket 2026 : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! परीक्षेचे प्रवेशपत्र 'या' दिवसापासून मिळणार!

SCROLL FOR NEXT