sisilia
sisilia 
संपादकीय

‘ठिबक सिंचन’ (परिमळ)

डॉ. सिसिलिया कार्व्हालो

‘तुझ्यावर सतत रक्त ठिबकत राहील’, असा पृथ्वीला शाप आहे काय? त्यातून तिला उःशाप कधी मिळणार आहे? तिच्याच गर्भातून निपजलेल्या तिच्याच लेकरांनी तिला हा शाप दिलाय काय? मग साऱ्या पृथ्वीतलावर रक्ताच्या चिळकांड्या उडताना का दिसताहेत?
दे

शाचे संरक्षण करण्यासाठी सीमेवर जागता पहारा ठेवणाऱ्या जवानांचा त्याग असीम आहे. जेथे वाणी मुकी व्हावी, अन्‌ डोळ्यांतले अश्रूही सुकून जावेत अशी दृश्‍ये अन्‌ घटना-प्रसंग पाहायला, ऐकायला मिळताहेत. बर्फात गाडले जाणारे जवान पाहून थंडीचा एक टोकदार काटा उरात खुपला होता... तो निघतो की नाही तोच ‘उरी’तील जवानांवर घातलेला घाला उरावर घाव घालून गेला होता. रक्ताची चिळकांडी आपल्याच उरातून बाहेर पडल्याचा भास झाला होता...

‘जालियनवाला बाग’ कवितेत कविवर्य कुसुमाग्रज ख्रिस्ताचे क्रुसावरचे ओघळ ओले असतानाच, इंग्रजांनी केलेल्या हत्याकांडासंदर्भात म्हणतात,

पाचोळ्यापरि पडली पाहून प्रेतांची रास
नयन झाकले असशिल देवा, तू अपुले खास
असेल ही वा सैतानाची प्रभूवरी मात
एक जखम अन्‌ नवीन, येशू तुझ्या काळजात..

क्षमतेचा आणि करुणेचा संदेश ख्रिस्ताने दिला. तरीही इंग्रजांनी जालियनवाला बाग रक्तरंजीत करून टाकली. तेव्हा येशूच्या हाता-पायांत अन्‌ कुशीत तर जखमा झालेल्या/केलेल्या होत्याच. परंतु, जालियनवाला बागेतली एक चिळकांडी ख्रिस्ताच्या शरीरावर उडून त्याच्या काळजात एक नवीन जखम झाली, तर मानवजातीला कलंक फासणारी जखम आहे. 

नौखालीमध्ये हत्याकांड झाले, त्यावर रामानंद सागर यांनी ‘और इन्सान मर गया’ अशी कादंबरी लिहून ‘माणसातली माणुसकी मरण पावलीय आणि त्याच्यातील पशू जागृत झालाय,’ असे म्हटले होते. त्या काळी, त्या स्थळी ही पृथ्वी रक्ताने किती कशी भिजली असेल, याची आपण केवळ कल्पनाच करू शकतो. इतिहासातील ही रक्ताने भिजलेली पाने अजूनही वाळलेली नाहीत. त्यावरील व वास्तवातील घटनांवरील साहित्य वाचताना हृदयाच्या चिंधड्या उडतात आणि उरतात त्याही चिंधड्याच! 

नारायण सुमंत यांची ‘ऊठ माणसा’ नावाची कविता आठवते.

ना राम येथला मेला, ना रहीम येथला मेला
जगताचे पुसुनि डोळे, कबिराचा निथळे शेला
हा पाहुनी नरसंहार, तो प्रेषित झुकवी माथा
या आसवांत ना तरली, तुकयाची अभंगगाथा!

असं वाटतं, की पृथ्वीच्या पाठीवरून वाहणाऱ्या साऱ्या नद्या अन्‌ पृथ्वीच्या पोटात दडलेला समुद्र अन्‌ आकाशातून कोसळणाऱ्या पावसाच्या धारा हे सारे निसर्गाचे अश्रू तर नव्हेत, ही छिन्नभिन्न झालेली मानवता पाहून? हे ‘ठिबक सिंचन’ मानवतेला मानवणारे कसे असेल?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: लाईक्ससाठी पेटवलं जंगल ! सोशल मीडियावर आगीचा व्हिडिओ अपलोड केल्या प्रकरणी तिघांना बेड्या

Manisha Koirala : उमरावजान साकारणार होती मल्लिकाजान ? मनीषाने सांगितली 18 वर्षांपूर्वीची गोष्ट

Harshit Rana KKR vs LSG : कारवाईनंतरही हर्षित राणा सुधरला नाही; बीसीसीआयला पुन्हा डिवचलं?

Latest Marathi News Update : नाशिकमध्ये कपालेश्वर हॉटेलच्या मागच्या बाजूला आग

World Athletics Relays : भारतीय महिला अन् पुरुष संघाची रिलेमध्ये दमदार कामगिरी, आता ऑलिम्पिक पदकासाठी पॅरिसमध्ये धावणार

SCROLL FOR NEXT