संपादकीय

माध्यमांचं ‘जंगल बुक’!

सकाळवृत्तसेवा

एखादी सनसनाटीपूर्ण बातमी हाती लागली की कुठलीही शहानिशा न करता सबसे तेज घराघरांत पोहोचवण्याचा दूरचित्रवाणी वाहिन्यांना रोगच लागलेला आहे. हा रोग आताशा अगदीच हाताबाहेर गेला आहे, असे दिसते. त्याचे ताजे उदाहरण म्हणून उत्तर प्रदेशातील बहराइचमध्ये सापडलेल्या ‘मोगली गर्ल’च्या वृत्ताकडे बोट दाखवता येईल. दहा-अकरा वर्षांची ही मुलगी दोन महिन्यांपूर्वी वनरक्षकांना कटर्नियाघाट वन्यजीव अभयारण्यातील रस्त्यालगत आढळली. माकडांच्या टोळीने दहा वर्षे तिला सांभाळले होते, त्यामुळे ती माकडांप्रमाणेच वागते, असे वृत्त वाऱ्यासारखे पसरले. परदेशी वृत्तसंस्थांचे प्रतिनिधीही तेथे धावले. रुडयार्ड किपलिंगच्या प्रसिद्ध ‘जंगल बुक’मधील मोगली सर्वांच्या परिचयाचा होता. त्या चालीवर या मुलीचेही बारसे जितीजागती ‘मोगली गर्ल’ असे माध्यमांनी करून टाकले.

तिचे तळवे कसे माकडांप्रमाणे सपाट आहेत. ती अन्न जमिनीवर पसरून चिवडते, तिचे हावभाव माकडांप्रमाणे आहेत आदी कंड्या पिकायला वेळ लागला नाही. ज्याप्रमाणे लांडग्यांच्या कळपाने ‘मोगली’चा प्रतिपाळ केला, त्याचप्रमाणे बहराइचनजीकच्या जंगलातील माकडांनी या मुलीला सांभाळले, अशी ही चविष्ट कथा रंगली. खरे तर त्या मुलीच्या संदर्भातील दृश्‍यफिती बघूनही या ‘मोगली गर्ल’च्या बातमीत फारसे तथ्य नसावे, हे कळत होते. अभयारण्यात दहा वर्षे एक लहान मूल मानवी दृष्टीस न पडता वाढू शकते, हेही अशक्‍य आहे. कारण अभयारण्यात जागोजाग छुपे कॅमेरे वन्यजीवांना टिपत असतात; पण माध्यमांना त्याची पर्वा नव्हती.

हळूहळू ही मुलगी माकडांनी सांभाळलेली नसून आई-बापांनी टाकून दिलेली ‘नकुशी’ असावी, अशी कुजबूज सुरू झाली. मग परदेशी वृत्तसंस्थांनीही ‘मोगली गर्ल’च्या बातमीतला फोलपणा जाहीर करून टाकला. तूर्त ही मुलगी गतिमंद असून, फार तर काही दिवस जंगलाच्या रस्त्यात पडलेली असेल, असे सांगितले जात आहे. आई-बापांनी ‘नकुशी’ला टाकणे ही भारतात काही ‘बातमी’ होऊ शकत नाही. अशा हजारो नकोश्‍या मुली या देशात आहेत. पण त्यांना ‘मोगली गर्ल’चा टीआरपी नाही, हे माध्यमजगतातले एक उघडेवागडे सत्य. सारांश, माध्यमांचे ‘जंगलबुक’ वेगळे असते, तिथले नियम-कायदेही वेगळे आणि अग्रक्रमही!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pension Department: पेन्शनधारकांना सरकारची मोठी भेट! नवीन ऑनलाइन पोर्टल केले लाँच; मिळणार 'या' सुविधा

Latest Marathi News Live Update: सलमान खान गोळीबार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल; सीबीआय तपासाची केली मागणी

Indian Navy : अरबी समुद्रात पुन्हा भारतीय नौदलाची हवा, 20 पाकिस्तानींसाठी ठरले देवदूत

Bhushan Pradhan: 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात पडलाय भूषण प्रधान? व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, "लवकर लग्न करा!"

Virat Kohli : 'खूप फसवणूक झाली मात्र आता...' विराट कसा झाला 634 कोटी रूपयाचा मालक?

SCROLL FOR NEXT