वडील आणि मुलीने एकाच क्षेत्रात काम करणे यात काही नवे नाही. पण पोलिस खात्यातील एका अधिकाऱ्याची लेक पोलिस उपअधीक्षक झाली, आणि हे बापलेक ‘समाजमाध्यमां’त चर्चेचा विषय ठरले. तिरुपती येथे झालेल्या ‘आंध्र प्रदेश पोलिस ड्युटी मिट’मध्ये हे दोघे एकमेकांसमोर आले तेव्हा शिष्टाचारानुसार बापाने लेकीला सॅल्यूट केला. अनेकांनी कॅमेऱ्यात टिपलेल्या या दृश्याला समाजमनानेही माध्यमांतून सॅल्यूट केला आहे. यातील बाप माणूस आहे येंडलुरू श्यामसुंदर आणि लेकीचे नाव आहे जे. सी. प्रशांती!
आई-वडील आपल्या मुलांचे संगोपन करता करताच भविष्याचे चित्र रंगवत असतात. आपली स्वप्नं त्यांच्या प्रतिमेतून पाहत असतात. ती पूर्ण व्हावीत आणि आपल्या मुलांनी पूर्ण करावीत, ही अपेक्षा असतेच, पण ते स्वप्न प्रत्यक्षात उतरते तेव्हाचा आनंद अनुभवणे हा परमोच्च असतो. असाच अवर्णनीय आनंद गुंटूरची जे. सी. प्रशांती हिला सॅल्यूट करताना येंडलुरू श्यामसुंदर यांना झाला.
प्रशांती महिनाभरापूर्वीच पोलिस उपअधीक्षक झाली. तिचे वडील श्यामसुंदर हे कर्नूल रेंजचे मंडल निरीक्षक आहेत. गेली २६ वर्षे ते पोलिस सेवेत आहेत. त्यामुळे मुलीला वाढवतानाच तिच्यावर समाजसेवेचे संस्कार झाले. त्यांच्या प्रामाणिक सेवेचा प्रभाव प्रशांतीवर पडला नसता तर नवलच. वडिलांचा लोकांच्या सेवेबाबतचा ध्यास आणि आत्मीयता यामुळे ती प्रभावित झाली. साहजिकच शिक्षण पूर्ण झाल्यावर तिलाही हेच क्षेत्र खुणावू लागले. कितीही बदल झाले असले तरी पोलिस क्षेत्र हे पुरुषी वर्चस्वाचेच राहिले आहे.आता हळुहळू बदल होत असले तरी अद्याप खूप बदल व्हायला हवा आहे. पण समाजसेवा करायची असेल तर पोलिसी सेवा हे उत्तम आणि प्रभावी माध्यम आहे, असे प्रशांतीच्या मनाने घेतले. आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती जिद्दीने कामाला लागली.शारीरिक तंदुरुस्तीचा ध्यास घेतला; पण या सेवेतील खडतर बाबींचा अनुभव असलेल्या श्यामसुंदर यांना मात्र हा निर्णय सुरुवातीला थोडा खटकला. मुलीने असे क्षेत्र निवडले की कोणत्याही बापाची जी घालमेल होते तीच त्यांची झाली, पण या क्षेत्रात ती यशस्वी होईल असा विश्वासही त्यांना होता. त्यामुळे श्यामसुंदर यांनी मुलीला पाठिंबा दिला. ‘वडिलांनी प्रोत्साहन दिले तेव्हा पोलिस सेवेत उच्च पदावर जायचे हे आमचे दोघांचे ध्येय बनले’ असे प्रशांती सांगते.
प्रशांती सेवेत रुजू झाल्यापासून श्यामसुंदर यांना किमान निवृत्तीपूर्वी तिच्यासोबत काम करण्याची फार इच्छा होती. लवकरच तो योग जुळून आला. ‘आंध्र प्रदेश पोलिस ड्युटी मिट’ तिरुपती येथे नुकतेच झाले. या कार्यक्रमाच्या वेळी नेमकी प्रशांती समोर आल्यावर श्यामसुंदर यांनी तिला सॅल्यूट ठोकला. प्रशांतीला थोडं अवघडल्यासारखं झालं; पण वडिलांनी त्यांचे कर्तव्य पार पाडले होते. तिनेही मग त्यांना सॅल्यूट केला. तिथे उपस्थित असलेल्या अनेकांना हा प्रसंग भावला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.