loksammelan
loksammelan 
संपादकीय

अग्रलेख : लोकसंमेलनाचे संचित

सकाळ वृत्तसेवा

नित्यनेमाने भरणारी साहित्य संमेलने हे मराठीचे एक सांस्कृतिक वैशिष्ट्य आहे. या उपक्रमाची जत्रा किंवा उरूस म्हणून कोणी कितीही समीक्षकी संभावना केली, तरी त्याचे हे महत्त्व कमी होत नाही. मुळात यात्रा-जत्रा यांचेदेखील लोकव्यवहारात एक स्थान असते. लोकांनी एकत्र येणे आणि तेही साहित्यासारख्या एका सर्जनशील कलेसाठी हीच मुळात एक उत्साहवर्धक गोष्ट आहे. उस्मानाबादेतील पहिल्याच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे सर्वांत मोठे फलित म्हणजे नेमका हा मुद्दा त्या संमेलनाने पुन्हा एकदा ठसठशीतपणे पुन्हा समोर आणला आहे.

या संमेलनातील बहुतेक कार्यक्रमांना गावकऱ्यांनी केलेली उत्स्फूर्त गर्दी, पुस्तक खरेदीसाठी दाखविलेला मोठा उत्साह, महाविद्यालयीन तरुणवर्गाने साहित्यिकांना भेटण्याची, त्यांच्याशी बोलण्याची दाखविलेली असोशी हे या दुष्काळग्रस्त म्हणून प्रामुख्याने ओळखल्या जाणाऱ्या गावातील चित्र बोलके होते. खरे म्हणजे संमेलन एकच; तरीही व्यासपीठावरील आणि त्याच्यासमोरील अशी त्याची दोन रूपे दिसली खरी. भाषणे, शिष्टाचार, सत्कार समारंभ आणि ठराव या इतकेच; किंबहुना त्याहीपेक्षा महत्त्वाचे होते ते हे दुसरे रूप. ज्यात वाचकांचा, साहित्याच्या आस्वादकांचा, कवितेशी मैत्री करू पाहणाऱ्या तरुणाईचा चेहरा जाणवला. असा हा लोकोत्सव होता. साहित्य व्यवहाराविषयीची त्यांची भूक आणि कमालीची उत्सुकता यांतून साहित्यिकांनाही ऊर्जा मिळते आणि मिळायला हवी. मराठीविषयी केवळ उसासे टाकण्यापेक्षा ही ऊर्जा घेऊन एका नव्या उत्साहाने भाषा-संस्कृतीच्या संवर्धनासाठी काम करण्याचा उत्साह वाढायला हवा. संमेलनाचे खरे प्रयोजन तेच तर असते. हे खरेच की खऱ्याखुऱ्या मुक्त आणि उदार अशा वातावरणात साहित्यच नव्हे, तर सर्वच कला बहरतात. या वातावरणावरच सावट आले असेल, तर त्याविरोधात आवाज उठविण्याची जबाबदारी साहित्यिकांचीच आहे. त्यामुळेच या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्याकडून परखड आणि ठाम अशा प्रतिपादनाची अपेक्षा होती. ‘विद्यार्थ्यांची डोकी फुटत असताना आम्ही शांत कसे राहू’, असे विचारून आणि ‘सत्य सांगणे सोडणार नाही’, असा निर्धार व्यक्त करून सध्याच्या स्थितीबद्दल त्यांनी नापसंती व्यक्त केली खरी; पण त्याला प्रभावी धार आली नाही, याचे कारण एखाद्या तत्त्वासाठी वा मूल्यासाठी निःसंदिग्ध भूमिका घेणे आणि त्यासाठी कोणतीही किंमत मोजण्याची तयारी असणे, असे आपल्याकडे फार थोड्यांच्या बाबतीत दिसते. वसईतील पर्यावरणाच्या रक्षणासाठी राजकारणी आणि गुंडांच्या विरोधात उभे राहण्याचे धैर्य त्यांनी दाखविले हे खरेच आहे आणि त्याबद्दल त्यांचा रास्त गौरवही झाला. परंतु ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्या’सारख्या एखाद्या तत्त्वाच्या बाजूने उभे राहताना निःसंदिग्ध आणि निरपवाद अशी ठाम भूमिका ते मांडतात काय, मांडू शकतात काय, हा प्रश्‍नही तेवढाच महत्त्वाचा आहे. अर्थात हा प्रश्‍न त्यांच्यापुरताच आहे, असे नाही. ही मरगळ अधिक पसरलेली आहे. जगणे आणि लिहिणे यातली विलक्षण एकरूपता हे संतांचे वैशिष्ट्य; त्यामुळेच आजही त्यांच्या शब्दांचे मोल हरवलेले नाही. त्या भव्य मापदंडाचा विचार करता आज आपले साहित्य आणि साहित्यिकांची स्थिती कशी आहे, याचे आत्मपरीक्षणही अशा निमित्ताने व्हायला हवे. तसे केले तरच प्रस्थापितांवर समाजातील विवेकाचा प्रभावी अंकुश निर्माण करता येईल. 

मराठीपुढच्या आव्हानांना तोंड देण्यासाठीदेखील अशा आत्मपरीक्षणाचा उपयोग होईल. ‘मराठी वाङ्‌मय इतके परपुष्ट आहे, की ते पुरेसे परपुष्टदेखील नाही’ या मजेशीर विरोधाभासी विधानातून बा. सी. मर्ढेकरांनी एका उणिवेकडे मार्मिकपणे लक्ष वेधले होते. त्यांचे म्हणणे असे, की परपुष्टच व्हायचे, तर फक्त इंग्रजीकडूनच का? जगातील इतर भाषांतही उत्तम साहित्य निर्माण होते. त्यांच्याकडूनही मराठीने पोषण घ्यावे. भारतीय भाषांच्या बाबतीतही हे म्हणता येईल. भारतातील भाषाभगिनींशी मराठीने नाते जोडायला हवे. असे आदानप्रदान सगळ्याच भारतीय भाषांना उपयोगी पडेल. दुर्दैवाने वृथा अभिनिवेश आणि अहंकार अशा सहकार्याच्या आड येतात. सीमाभागातील मराठी संमेलनाला विरोध करून कर्नाटक सरकारने दाखविलेला कोतेपणा हे त्याचे ताजे उदाहरण. परंतु व्यापक अशा साहित्यिक-सांस्कृतिक आदानप्रदानातून, सर्वसामान्य लोकांच्या उत्साहाच्या बळावर या आणि मराठी भाषेपुढील इतरही समस्यांवर मात करता येईल. संत गोरोबांच्या भूमीवर झालेल्या दिमाखदार संमेलनाने तेवढा हुरूप नक्कीच निर्माण केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT