संपादकीय

हिंदी-अमेरिकी भाई भाई!

सकाळ वृत्तसेवा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौरा टेक्‍सासमधील ह्युस्टन या महानगरात झालेल्या ‘हाउडी मोदी’ या कार्यक्रमात ‘दहशतवादाविरोधात पुकारण्यात आलेल्या एल्गार’मुळे लक्षात राहणारा ठरला असला, तरी या कार्यक्रमास त्यापलीकडली अनेक परिमाणे आहेत. खरे तर परदेशात जाऊन तेथील भारतीय जनसमुदायापुढे जाहीर सभा घेऊन बोलण्याचा नवाच पायंडा मोदी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतरच पाडला होता. यापूर्वी मोदी यांनी ‘मेडिसन स्क्वेअर’मध्ये असा कार्यक्रम केलाही होता. तरीही, रविवारी झालेला ‘हाउडी मोदी’ हा त्यापेक्षा वेगळा आणि अनेक बाबतीत लक्षणीय ठरला. त्याचे मुख्य कारण म्हणजे या सोहळ्यास थेट अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची जातीने असलेली उपस्थिती. ट्रम्प हे या सोहळ्यास केवळ उपस्थितच राहिले, असे नाही; तर मोदी यांच्या घणाघाती भाषणापूर्वीच ‘जगभरातील नागरिकांना इस्लामी दहशतवादापासून वाचवण्याची वेळ आली आहे,’ असे प्रतिपादन करून त्यांनी मोदी यांना मैदान मोकळे करून दिले होते. दुसऱ्या इनिंग्जमधील हा मोदींचा पहिलाच अमेरिका दौरा आहे. शिवाय जम्मू-काश्‍मीरचा विशेष दर्जा रद्दबातल ठरवण्याच्या निर्णयावर भारतीय संसदेने शिक्‍कामोर्तब  केल्याची पार्श्वभूमी असल्यानेही त्याला विशेष महत्त्व आहे. मोदी सरकारच्या या निर्णयानंतर जगभरातील काही उदारमतवादी व्यक्ती आणि प्रसारमाध्यमे यांनी ही बाब भारताची अंतर्गत असल्याचे मान्य केल्यावरही काहीसा विरोधी सूर लावला होता. बर्नी सॅण्डर्स आणि अन्य काही अमेरिकी सिनेटसदस्यांनी या निर्णयानंतर काश्‍मीर खोऱ्यात होत असलेल्या मानवाधिकारांच्या गळचेपीबद्दल तिखट शब्दांत नाराजी व्यक्‍त केली होती. एवढेच नव्हे तर अमेरिकी परराष्ट्र खात्यानेही त्याबाबत चिंता व्यक्‍त केली होती. त्यामुळे आपल्या या दौऱ्यात काश्‍मीरसंबंधाच्या या निर्णयास अमेरिकेचा पाठिंबा मिळवणे, हाही या कार्यक्रमाचा एक उद्देश होता. ट्रम्प यांनी या सोहळ्यास लावलेली उपस्थिती; तसेच दहशतवादी कारवायांबद्दल इस्लामी देशांना जबाबदार धरणे, यामुळे हा उद्देश पूर्णतया सफल तर झालाच; शिवाय भारत-अमेरिका यांची मैत्री ही त्यापलीकडची बाब आहे,  यावरही शिक्‍कामोर्तब झाले. 

ट्रम्प यांनी या सोहळ्यास उपस्थित राहण्यामागे अनेक कारणे आहेत. अमेरिकी अध्यक्षपदाची निवडणूक आता वर्षभरावर येऊन ठेपली आहे आणि ट्रम्प हे पुन्हा निवडून येण्यास उत्सुक आहेत. त्यामुळेच ट्रम्प यांच्या ‘रिपब्लिकन पार्टी’पेक्षा ‘डेमोक्रॅट्‌स’चे बळ अधिक असलेल्या टेक्‍सास या राज्यात हा सोहळा आयोजित केला गेला. मोदी यांनीही ‘अगली बार, ट्रम्प सरकार!’ असा नारा पन्नास हजारांहून अधिक भारतीयांच्या उपस्थितीत देऊन ट्रम्प यांच्या प्रचारमोहिमेचे रणशिंगच फुंकले! त्याचे प्रमुख कारण म्हणजे या उपस्थितांपैकी अनेक जण हे अमेरिकेचे मतदार आहेत. तेथील एकूणच भारतीय मतदारांची मोठी संख्या आणि त्यांना मोदी यांच्याविषयी असलेले कमालीचे आकर्षण, या बाबी लक्षात घेता मोदी यांच्या कार्यक्रमास उपस्थित राहण्यामागे ट्रम्प यांची राजकीय खेळी होती. मात्र, ट्रम्प यांच्या मतपेढीला आवाहन करतानाच मोदी यांनी आपली भारतातील ‘राष्ट्रवादी’ मतपेढी डोळ्यांपुढे ठेवून भाषण केले, हेही लपणारे नव्हते. मात्र, पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांच्या विरोधात अमेरिका आपल्या बाजूला उभी आहे, असे चित्र उभे करण्यात ते कमालीचे यशस्वी झाले. या दौऱ्याचे सर्वांत मोठे फलित हेच आहे. मुंबईवर २६/११ रोजी झालेला हल्ला असो की अमेरिकेतील ‘ट्‌विन टॉवर्स’वरील ९/११चा हल्ला असो; या दोन्हींचे मूळ हे एकाच ठिकाणी होते, हा मोदी यांनी केलेला उल्लेख अप्रत्यक्षरीत्या पाकिस्तानलाच लक्ष्य करणारा होता. त्यास अर्थातच ट्रम्प यांनी आधी केलेल्या वक्तव्याची पार्श्‍वभूमी होती. ‘हाउडी मोदी’ कार्यक्रमाचे भारताच्या दृष्टीने आणखी एक फलित म्हणजे, मुद्दा दहशतवादी कारवायांचा असो की काश्‍मीरचा विशेष दर्जा काढून घेण्याचा असो; आता यापुढे पाकिस्तान हा जगभरात एकाकीच पडत जाणार आहे. या पार्श्‍वभूमीवर ट्रम्प आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या भेटीतून काय निघते, हे पाहावे लागेल. अमेरिकेचा डोळा हा भारतातील विशाल बाजारपेठेवर असला, तरीही दहशतवादाविरोधात या वेळी पुकारला गेलेला एल्गार हा केवळ भारतासाठी नव्हे; तर संपूर्ण जगासाठी महत्त्वाचा आहे. दोन्ही देशांतील व्यापार तूट, भारतातील आयात शुल्काबाबत अमेरिकेचे आक्षेप, अफगाणिस्तानच्या प्रश्‍नावरील भिन्न भूमिका, इराणकडून तेल घेण्यावर भारताला केलेली आडकाठी, असे काही मूलभूत प्रश्‍न द्विपक्षीय संबंधांतील मतभेदाचे कळीचे मुद्दे आहेत आणि त्यावर जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे तोडगा निघत नसतो. पण, असे कार्यक्रम पूरक वातावरणनिर्मिती करण्यासाठी उपयुक्त ठरतात. त्यादृष्टीने त्याकडे पाहिले पाहिजे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT