Sonali-Navangul
Sonali-Navangul 
संपादकीय

पहाटपावलं : इश्‍क, उन्स, इबादत वगैरे

सोनाली नवांगुळ

आजूबाजूचं संत्रस्त राजकीय वातावरण, भरून राहिलेला दमट-कोरडेपणा नि अशा अजिबात उल्हसित न वाटणाऱ्या हवेत हिमांशूची ‘सर्जनशाळा’ नवीच तकतकी आणते, तेव्हा वाटतं नशीब म्हणतात ते हेच! प्रयोग होता रवीशकुमारच्या ‘इश्‍क में शहर होना’चा. तुकड्यातुकड्यांतल्या त्या कथा प्रेमाविषयी नि मुळात त्यात लाभणाऱ्या, न लाभणाऱ्या स्पेसविषयी बोलणाऱ्या. तक्रारखोर मुळीच नव्हे. त्यामुळेच रंगमंच, रंगमंच कसला हो, हॉलमधल्या पावपेक्षा कमी भागाचा तुकडा. तो तुकडा पताका, त्यावरचं नाजूक लायटिंग, शहराचं अभिन्न अंग बनलेल्या कसल्याकसल्या जाहिराती नि इंडिया गेटच्या चित्रानं सजलेला. जणू शहराची नाडी तिथं लवलवत होती.

रोहितच्या या मांडणीतली सगळी तरुणाई ‘इश्‍का’च्या धुनीत उजळून उठलेली. कुणी एक महत्त्वाचा न बनता वेगवेगळ्या वेळी वेगवेगळी माणसं महत्त्वाची होत रोल निभवायची नि नाहीशी व्हायची. तरीही, या छोट्याछोट्या प्रेमगोष्टींचं मिळून एक लयदार गाणं झालेलं बघताना, आजूबाजूच्या स्वार्थी खेळीमुळं झाकोळलेलं चित्त काहीसं उमलून आलं.

रंगमंचाच्या छोट्या अवकाशात पाहिलेल्या गोष्टींपलीकडं मला मिळणारी एनर्जी ही एकूण या गटाची जादू होती! एकमेकांची स्पेस राखत केलेलं सुंदर प्रेम होतं. ‘कर दे मुझे मुझसेही रिहा’ समजलेलं या सगळ्यांना. मनापासून, स्वत:ला विसरून केलेलं काहीही ‘इश्‍क’च असतं, हे पाहणं संसर्गी होतं.

हजारो वर्षं प्रेमाच्या गोष्टी सांगितल्या जाताहेत, तरी त्या सांगून संपत नाहीत. त्यातलं कल्पनाविश्‍व, उत्कटता, उद्दिपन तसंच ताजं राहतं. कसं काय घडतं हे? माणसाच्या मनाची गूढ दारं उघडण्याची नि स्वत:सारखं वागता येण्याची शक्‍यता या गोष्टीत असणार, हे नक्कीच! प्रेमात देहभान हरपलेल्याला वेडा म्हणणाऱ्यांना गुलजारांनी उत्तर देऊन ठेवलेलं असतं, ‘तुम जिसे भटकना कहती हो, उसे मैं और जानने की तलाश कहता हूँ. एक दुसरे को जानने की तलाश.’ हा शोध घ्यायला नि रूबरू व्हायला गर्दीनं ओसंडून वाहणाऱ्या शहरात प्रेमवेड्यांना जागा सापडत नाही, तेव्हा ते गर्दीतला एकांत शोधतात.

काही काळ त्यांना तो लाभतोही. जसा अण्णा हजारेंच्या आंदोलनात काही जिवांना लाभला होता. त्या गर्दीत एकमेकांच्या सलगीत राहून एकच चोकोबार पाळीपाळीनं चाखताना नेमकं उपोषण संपल्याची घोषणा होते नि गर्दी पांगायला लागते. दोघांचा हक्काचा एकांत संपतो. निघताना ते रामलीला मैदानाकडं दुखरी नजर टाकतात. इथल्याच आंदोलनाच्या भारलेल्या गर्दीत एकमेकांच्या प्रेमात असण्याचे वेडे क्षण त्यांनी अनुभवले होते. असे कितीतरी जीव तिथं होते, ‘इश्‍क में सिर्फ देखनाही नहीं, अनदेखा करना भी होता है!’ हे समजणारे. इंडिया गेटसाठी, देशासाठी आता त्यांची काहीही करायची तयारी झालेली, फक्त पुढचं उपोषण कधी हे माहिती नव्हतं!
- हेच तर ‘इश्‍क में शहर होना!’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : धोनी गोल्डन डक; जडेजामुळे चेन्नईने मारली 168 धावांपर्यंत मजल

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

मुंबईत नोकरीसाठी मराठी माणसालाच नो एन्ट्री करणाऱ्या कंपनीला शिकवला धडा, एचआरने मागितली माफी!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT