rishabh-pant 
editorial-articles

अग्रलेख : नवोदितांचा मास्टरस्ट्रोक

सकाळवृत्तसेवा

एकेकाळी भारताकडे उत्तम खेळाडू असूनही संघभावनेचा अभाव जाणवत असे. आता त्या उणिवेवर भारतीय संघाने कशी मात केली आहे, याचे दर्शन ऑस्ट्रेलियात झाले. त्यामुळेच नवोदितांच्या खांद्यावर आलेली जबाबदारी त्यांनी समर्थपणे निभावत विजय खेचून आणला.

आजच्या बदलत्या काळातील गतिमान क्रिकेटच्या युगात, पाच दिवसांची ‘कसोटी’ म्हणजे काळाचा अपव्यय आहे, असे उद्‌गार वारंवार ऐकायला मिळतात. मात्र, पाच दिवसांचा कसोटी सामनाही चित्तथरारक आणि रोमहर्षक कसा होऊ शकतो, त्याचेच प्रत्यंतर मंगळवारी बघायला मिळाले आणि त्यातील सर्वांत आनंदाचा क्षण हा ऋषभ पंतने शेवटी मारलेल्या चौकारातून भारताने मिळवलेल्या विजयाचा होता. एखाद्या रहस्यपटासारखे चढउतार या कसोटीत शेवटच्या सत्रात होत राहिले. मात्र, ऋषभ जराही विचलित झाला नाही आणि अखेर भारताने ब्रिस्बेनच्या ‘गाबा’ मैदानावर इतिहास लिहिला. या इतिहासाची पाने अनेक आहेत आणि त्याचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे हा विजय पूर्णपणे तुलनेने ज्युनिअर खेळाडूंनी खेचून आणलेला विजय आहे. 

विराट कोहली पितृत्वाच्या रजेमुळे मायदेशी परतलेला आणि जसप्रित बुमरा, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, महमद शमी तसेच हनुमा विहारी हे भारतीय खेळाडू जायबंदी झालेले. तर त्याचवेळी ऑस्ट्रेलियाच्या भेदक माऱ्यापेक्षाही अधिक जहरी अशी स्टेडियममधून होणारी वर्णद्वेषी शेरेबाजी यांचा निकराने सामना करत एका नव्याच भारतीय चमूने ऑस्ट्रेलियाचे दात त्यांच्याच घरात, त्यांच्या घशात घातले. हे यश कोणत्याही एका खेळाडूचे नाही आणि हा संघभावनेच्या निर्धारातून मिळवलेला हा विजय आहे. नवोदितांना उभारी देणे आणि त्यांच्याकडून संस्मरणीय अशी कामगिरी करून घेणे, याबद्दल विराटच्या अनुपस्थितीत कर्णधारपदाची धुरा संयमाने हाताळणाऱ्या अजिंक्‍य रहाणेचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. पहिल्या कसोटीत सर्वबाद ३६ अशा मानहानिकारक गर्तेतून संघाला बाहेर काढण्याचे काम अजिंक्‍यने केले आहे. या अभूतपूर्व मानहानीनंतर लगेचच दुसरा सामना जिंकून भारताने आपले मनोबल कसे खचलेले नाही, ते दाखवून दिले होते. त्याचाच कळसाध्याय म्हणजेच ‘क्‍लायमॅक्‍स’ मंगळवारी ब्रिस्बेनमध्ये रचला गेला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अर्थात, तिसऱ्या कसोटीप्रमाणेच हा सामनाही अनिर्णित राहिला असता, तरी ‘बॉर्डर-गावस्कर चषक’ हा भारताकडेच राहिला असता; पण आपण शेवटच्या पाचव्या दिवशी क्रीजच्या एका बाजूने संयत तर दुसऱ्या टोकाने आक्रमण अशी व्यूहरचना आखली आणि त्यास हे विजयाचे फळ आले आहे.

खरे तर या शेवटच्या कसोटीत शेवटच्या दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा भारतापुढे या गाबा मैदानावर आजतागायत चौथ्या डावात कोणीही करू न शकलेल्या ३२८ धावांचे आव्हान होते. आजपावेतो या मैदानावर शेवटच्या डावात झालेल्या सर्वाधिक धावा होत्या २३६ आणि त्याही ऑस्ट्रेलियानेच वेस्ट इंडिजविरोधात १९५१-५२ मध्ये करून तीन गडी राखून विजय मिळवला होता. त्यामुळे भारताने विजयासाठी खेळावयाचे की सामना अनिर्णित ठेवून, मालिका बरोबरीत सोडवून आपल्याकडेच असलेला ‘बॉर्डर-गावस्कर चषक’ आपल्याकडेच ठेवण्यात समाधान मानणारा खेळ करावयाचा, यावरून क्रिकेटप्रेमींमध्ये दोन तट पडले होते. त्यातच भारताचा भरवशाचा फलंदाज रोहित शर्मा हा अगदीच लवकर बाद झाला. तेव्हा तर सामना अनिर्णित राखला तरी खूप असेच वाटू लागले होते.

मात्र, तिसरी कसोटी शेवटचे सत्र पूर्णपणे खेळून सामना अनिर्णित ठेवणारी हनुमा-अश्विन जोडी जायबंदी झाल्याने संघाबाहेर होती. अशावेळी एक बाजू चेतेश्वर पुजाराने राहुल द्रविडची आठवण करून देत भक्कपणे लावून धरली तर दुसऱ्या बाजून शुभमन गिलने जोरदार हल्ला चढवला. या विजयात शुभमनच्या ९१ धावांचे मोल अनमोलच म्हणावे लागेल. तेव्हा ऑस्ट्रेलियाचा धीर खचला आणि त्यांनी उसळत्या चेंडूचा मारा सुरू केला. त्यात पुजारा जायबंदीही झाला; पण त्याने मैदान सोडले नाही. त्यानंतर जबाबदारी उचलली ती रिषभ पंतने. कधी आक्रमक तर कधी संयमित फलंदाजी करत नाबाद ८९ धावांची विजयी खेळी केली. शुभमनने रचलेल्या पायावर कळस चढवणारीच ही खेळी होती. मात्र, त्याचाही संयम अधूनमधून सुटत होता; पण मंगळवारी नशीब खरोखरच भारताच्या बाजूला उभे होते.

ऑस्ट्रेलियावर मग दडपण येत गेले. झेल सुटत गेले आणि कर्णधार टीम पेनच्या बेजबाबदार यष्टिरक्षणामुळे अवांतर धावाही वाढत गेल्या. या सर्वाची परिणती आपण अशक्‍यप्राय वाटणारा विजय खेचून आणण्यात झाली आहे. मात्र, याचवेळी आणखी एक बाब नमूद करावीशी वाटते. विराट, बुमरा, अश्विन, जडेजा, शमी असे जायबंदी खेळाडू संघात परतल्यावर पहिल्या डावाला आकार देणारे वॉशिंग्टन सुंदर तसेच शार्दूल ठाकूर किंवा पाच बळी घेऊन, ऑस्ट्रेलियाला मोठी आघाडी मिळू न देणारा महमद सिराज यांना तेव्हा संघात जागा शिल्लक उरेल काय? ज्या नवोदितांनी हा विजय आपल्या ‘आयपीएल’मधील अनुभवाच्या जोरावर साकार केला, ते सारे ब्रिस्बेनप्रमाणे पुन्हा भारतीय संघात एकत्र खेळताना दिसतील काय? अर्थात, हे प्रश्न यथावकाश सोडवले जातीलच. मात्र, कसोटी सामना ‘ट्‌वेण्टी ट्‌वेण्टी’प्रमाणे शेवटच्या चेंडूपर्यंत रंगतदार करून, केवळ भारतीयच नव्हे तर जगभरातील क्रिकेटप्रेमींना मनसोक्त आनंद लुटू दिल्याबद्दल या चमूचे करावे तितके कौतुक थोडेच आहे. या पराभवामुळे ऑस्ट्रेलियन खेळाडू तसेच प्रेक्षक यांची मनोवृत्ती बदलली तर हा आणखी एका अर्थाने सार्थकी लागला, असे म्हणता येईल.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pravin Gaikwad Attacked : 'माझ्या हत्येचा कट रचला गेला होता, अन् याला पूर्णपणे जबाबदार..'' ; 'संभाजी ब्रिगेड'च्या प्रवीण गायकवाडांचा मोठा दावा!

Sangli Crime : मोक्कातील सांगलीच्या गुन्हेगाराचा सपासप वार करून खून, अल्पवयीन मुलांचा समावेश; वर्चस्ववाद नडला

Latest Marathi News Updates: रेल्वेच्या चौथ्या लाईन साठी शेतीच्या अधिग्रहणाला शेतकऱ्यांचा विरोध

Beed Crime : बीडमध्ये विकृतीचा कळस! निवृत्त पोलिस फौजदाराला खोलीत डांबून बेदम मारहाण; पाणी मागितले असता तोंडावर केली लघुशंका

Russia Ukraine War: रशियाच्या हल्ल्यांत युक्रेनमध्ये दोन ठार

SCROLL FOR NEXT