अमेरिकी राजकीय व्यवस्थेतील एकेका संकेताला, पायाभूत मूल्यांना बेधडकपणे गुंडाळून ठेवणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदावर असताना अनेक अनिष्ट गोष्टी पहिल्यांदाच करून दाखवल्या!
लोकशाही संस्थांविषयी उदासीनच नव्हे तर त्याविषयी तुच्छताभाव बाळगणारे ट्रम्प आता मात्र कायद्याच्या जाळ्यात अडकले आहेत.
अमेरिकी राजकीय व्यवस्थेतील एकेका संकेताला, पायाभूत मूल्यांना बेधडकपणे गुंडाळून ठेवणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदावर असताना अनेक अनिष्ट गोष्टी पहिल्यांदाच करून दाखवल्या! देशाच्या राजकीय इतिहासातील हे ‘पहिलेपण’ त्यांनी अक्षरशः मिरवले; मग ते वाईट कारणांसाठी का असेना. त्यांच्या या प्रकारच्या `कर्तबगारी’च्या यादीत एक ठळक भर पडली आहे. २०१६च्या निवडणुकीआधीच्या एका प्रकरणात न्यूयॉर्कच्या ग्रॅंड ज्युरींनी त्यांच्यावरील फौजदारी गुन्ह्याचा खटला चालविण्याच्या बाजूने निर्णय दिला आहे. म्हणजेच त्यांच्यावरील आरोपपत्र दाखल करण्याची औपचारिक प्रक्रिया पूर्ण केली आहे. आता न्यायालय ते दोषी आहेत किंवा नाही, याचा निकाल देईल. पण आरोपपत्र लागले जाणे हीदेखील गंभीर बाब आहे. आता ट्रम्प स्वतःहून न्यायासनापुढे हजर झाले नाहीत, तर त्यांच्यावर अटकेची नामुष्की ओढवेल. कोणत्याही माजी अध्यक्षावर आजवर फौजदारी गुन्ह्यांबद्दल आरोपपत्र ठेवले गेले नव्हते.
२०१६ ची निवडणूक लढविताना ट्रम्प यांनी ‘साध्य-साधन शूचिता’ वगैरे विचार आपल्या वाऱ्यालाही फिरकणार नाहीत, याची पुरेपूर काळजी घेतली होती. त्यामुळे त्यांनी केलेल्या गैरप्रकारांच्या अनेक सुरस कथांची चर्चा सतत सुरू राहिली. त्यातील कायद्याच्या पातळीवर अगदी पुढच्या टप्प्यापर्यंत गेलेले प्रकरण म्हणजे ट्रम्प यांचे एका अभिनेत्रीबरोबर असलेले संबंध. ऐन निवडणूक प्रचाराच्या दरम्यान जर हे संबंध चव्हाट्यावर आले असते तर प्रचारयुद्धात विरोधकांच्या हातात एक अस्त्रच मिळेल, या धास्तीने या अभिनेत्रीचे तोंड बंद करण्यासाठी त्यांनी एक लाख तीस हजार डॉलर एवढी रक्कम मोजली.
‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने २०१८मध्ये या सगळ्या व्यवहाराचा गौप्यस्फोट केल्यानंतरही ट्रम्प कानावर हात ठेवत होते. आजही ते आरोप धुडकावून लावत आहेतच. पण पैसे देण्याचा व्यवहार ज्यांच्यामार्फत झाला, त्या मायकेल कोहेन या ट्रम्प यांच्या तत्कालिन सहकाऱ्यानेच रक्कम हस्तांतरित केल्याचे कबूल केले आहे. हे आपण ट्रम्प यांच्या सांगण्यानुसारच केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे ट्रम्प चांगलेच अडचणीत आले आहेत. २०२०च्या निवडणुकीत ज्यो बायडेन विजयी झाल्यानंतरही त्यांना सूत्रे न देण्याचा हटवादीपणा ट्रम्प यांनी केला होता. एवढेच काय त्यांच्या समर्थकांनी अध्यक्षीय प्रासादात जाऊन धुडगूस घालण्यापर्यंत मजल मारली. या टोळक्याला ट्रम्प यांची फूस होती, असे उघड आरोप झाले. पण एकूणच कायद्याविषयी, लोकशाही संस्थांविषयी उदासीनच नव्हे तर त्याविषयी तुच्छताभाव बाळगणारे ट्रम्प आता मात्र कायद्याच्या जाळ्यात अडकले आहेत. २०२४च्या निवडणुकासाठी ते पुन्हा इच्छुक असल्याने याचे राजकीय परिणाम निश्चित होणार.
अलीकडच्या काळात अमेरिकी राजकारणातील दुभंग वाढला आहे, अधिक धारदार होत गेला आहे. अधिकाधिक कडव्या आणि कट्टर भूमिका घेणारा रिपब्लिकन पक्ष आणि त्याच्या नेतेपदी ट्रम्प यांच्यासारखा रगेल मनुष्य आल्यानंतर एकूणच राजकीय संवादाची,व्यवहाराचीही पातळी खाली आली. ट्रम्प विरोधकांना शत्रू मानतात. प्रसारमाध्यमे असोत वा अन्य लोकशाही संस्था यांच्याविषयी आदर ठेवण्याची त्यांना गरज वाटतच नाही. उलट आपण चौकटीबाहेरचे असल्याने डेमोक्रॅटिक पक्ष, अमेरिकेतील वृत्तपत्रे व अन्य प्रसारमाध्यमे आपल्याविरुद्ध मोहीम राबवित असल्याचे ‘व्हिक्टिम कार्ड’ ते वापरत राहिले. २०२० च्या निवडणुकीत मतदारांनीच त्यांना सत्तेवरून हुसकावून लावले.
डेमोक्रॅटिक पक्ष सत्तेवर आल्यानंतर अमेरिकी लोकशाहीतील वातावरण सुधारेल, अशी अपेक्षा होती. ज्यो बायडेन आणि त्यांचा डेमोक्रॅटिक पक्ष हे ‘उदारमतवादी’ असल्याने त्याचे प्रतिबिंब कारभारात नक्कीच उमटेल, अशी अपेक्षा अमेरिकेतच नव्हे तर जगातच निर्माण झाली. दुर्दैवाने ती पुरी होताना दिसत नाही. ना देशांतर्गत पातळीवर बायडेन यांच्या उदारमतवादाचा प्रत्यय आला, ना जागतिक पातळीवर. अमेरिकेने मनात आणले तर रशिया-युक्रेन युद्ध थांबविण्याच्या दिशेने ठोस पावले पडू शकतात. पण त्यासाठीच्या इच्छाशक्तीचा मागमूसही त्यांच्यात दिसलेला नाही. कशाचीची पत्रास न बाळगणाऱ्या ट्रम्प यांना न्यायालयाने शिक्षा दिली तर वाईट वाटण्याचे कारण नाही; पण लोकशाही आणि उदारमतवादाची जपमाळ ओढणारा डेमोक्रॅटिक पक्ष या खटल्याकडे राजकीय हिशेब चुकते करण्याचे साधन म्हणून पाहात असेल तर ती धोक्याची घंटा आहे.
कायदा जेव्हा राजकीय हेतूंच्या दावणीला बांधला जातो, तेव्हा लोकशाही धोक्यात येते, असे म्हटले जाते. ट्रम्प यांच्यावरील खटला डेमोक्रॅटिक पक्षाची सत्ता असलेल्या राज्यात नव्हे तर देशपातळीवर (फेडरल) चालवायला हवा, असे मत अमेरिकेतील काही विश्लेषकांनी व्यक्त केले आहे. त्यामागचा रोखही लक्षात घ्यायला हवा. ‘माझ्यामागे बायडेन आणि त्यांचा पक्ष हात धुवून लागले असून हा वैयक्तिक माझ्यावरील हल्ला नसून देशाविरुद्धचा आहे,’ अशी प्रतिक्रिया ट्रम्प यांनी दिली आहेच. एकूणच रिपब्लिकन पक्ष येत्या निवडणुकीत हाच विषय आपल्याचा प्रचाराचा एक ठळक मुद्दा बनवण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे राजकीय व्यवस्थेच्या दृष्टीनेच नव्हे तर राजकीय रणनीतीच्या दृष्टीनेदेखील या प्रकरणात बायडेन प्रशासनाने निःपक्षता अधोरेखित करायला हवी. अन्यथा अमेरिकी राजकीय व्यवस्थेतील सध्याची घसरण आणि दुभंगलेपण आणखी वाढेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.