drugs sakal
editorial-articles

अग्रलेख : विषारी वेटोळ्यातील शहरे

ससूनमधील कैद्याच्या पलायनाने कायदा-सुव्यवस्था यंत्रणेतलेच नव्हे तर अन्य व्यवस्थांमधले मोठे दोषही ढळढळीतपणाने समोर आले.

सकाळ वृत्तसेवा

ससूनमधील कैद्याच्या पलायनाने कायदा-सुव्यवस्था यंत्रणेतलेच नव्हे तर अन्य व्यवस्थांमधले मोठे दोषही ढळढळीतपणाने समोर आले.

एखाद्या लोकप्रिय महामालिकेतील थरारक घटनांप्रमाणे सध्या अंमली पदार्थांचा अदृश्य सर्प आपली वेटोळी उलगडू लागल्याचे चित्र अचानक दिसू लागले आहे. या बातम्या पाहून वा वाचून कुठल्याही सुजाण नागरिकाचा जीव थाऱ्यावर राहणार नाही, हे खरेच. अमली पदार्थाच्या निर्मितीतील आणि तस्करीच्या अधोविश्वाचा प्रमख सूत्रधार म्हणून ललित पाटील हे नाव सध्या चर्चेत आले आहे.

ससून रुग्णालयातून पाटील फरार झाला. त्यामुळे आपल्या कायदा-सुव्यवस्थेतलेच नव्हे तर अन्य व्यवस्थांमधलेही मोठे दोष ढळढळीतपणाने समोर आले. ससून रुग्णालय प्रशासन, पोलिसांची संरक्षण व्यवस्था, येरवडा मध्यवर्ती कारागृहातील यंत्रणा, राज्याची प्रशासकीय यंत्रणा या सगळ्यांतील पोखरलेपण समोर आले. राजकारणाचे गुन्हेगारीकरण कोणत्या तरापर्यंत गेले आहे, याचाही प्रत्यय आला.

सरकारी व्यवस्थेची अवस्था नेमकी काय झाली आहे, याचे सर्वांचे ताजे उदाहरण म्हणजे हे ललित पाटील प्रकरण. ससून रुग्णालय, कारागृह प्रशासन आणि पुणे शहर पोलिस यंत्रणा यांचे या प्रकरणामुळे अक्षरशः वाभाडे निघाले आहेत. कैदी फरार झाल्यानंतर काहीतरी कारवाई करणे भाग होते.

त्यामुळे नऊ पोलिसांचे तातडीने निलबंन करण्यात आले. पण, ही झाली वरवरची मलमपट्टी. रोगाचे मूळ निदान आणि त्यावर प्रभावी उपचार करण्याकडे सर्वच पातळीवर अनास्था असल्याचे स्पष्ट दिसते. त्यातच आता राजकारणदेखील तापू लागले आहे.

‘पळविता धनी’ कोण?

पश्चिम महाराष्ट्रातील गरीब रुग्णांचे आशास्थान असलेल्या ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच दोन कोटी रुपयांहून अधिक किमतीचे अमली पदार्थ सापडले. यानंतरच्या घटना अगदी ‘ब्रेकिंग बॅड’ किंवा ‘नार्कोस’ या आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजलेल्या वेबमालिकेत अथवा एखाद्या हिंदी चित्रपटात शोभाव्या तशा घडल्या.

अमली पदार्थ तस्करीतील मुख्य सूत्रधार दुसऱ्याच दिवशी आरामात पळतो, पंचतारांकित हॉटेलातील त्याचा वावर दृश्य स्वरुपात पाहायला मिळतो, नंतर चेन्नई येथे त्याला परत पकडले जाते आणि न्यायालयात वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात घेऊन जात असताना पाटील माध्यमांच्या प्रतिनिधींकडे बघत म्हणतो की, ‘मी पळालो नाही. मला पळवलं गेलंय.’ हे सारेच विमनस्क करणारे आहे.

यातले खरे काय नि खोटे काय, हे चौकशीअंती बाहेर येईल, अशी भाबडी अपेक्षा बाळगण्यापलीकडे कुणाच्याच हातात काही उरलेले नाही. ललित पाटीलने केलेले वक्तव्य एका संशयिताचे आहे. तो या साऱ्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार होता, हे खरे मानायचे की यामागे कुण्या बड्या धेंडाचा हात आहे? रुग्णालयातूनही तो इतर साथीदारांच्या संपर्कात होता का? त्याला नेमका कोणता गंभीर आजार झाला होता?

शस्त्रक्रियेसाठी अनुकूल अभिप्राय तज्ज्ञांकडून आल्यानंतरही त्याच्यावर शस्त्रक्रिया का केली नाही? अशा धारदार प्रश्नांवर ससून रुग्णालय प्रशासनाने मौन बाळगले आहे, आणि पोलिस यंत्रणेनेही. ‘या प्रकरणाचा गोपनीय अहवाल वरिष्ठ कार्यालयाला पाठविला आहे,‘ हे प्रशासनातील बुळबुळीत झालेले वाक्य माध्यमांच्या प्रतिनिधींच्या तोंडावर फेकून रुग्णालयातील वरिष्ठ अधिकारी मूग गिळून गप्प बसले आहेत.

या संपूर्ण प्रकरणात ससून रुग्णालयातील अधिकारी, डॉक्टर यांची चौकशी करण्यासाठी चार सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली. त्यात फक्त कागदी घोडे नाचविण्यात आले, असे दिसते. रुग्णालयातून कैदी पळाला इतकी मर्यादित ही घटना नाही. त्यामागे मोठे अर्थकारण असावे, असे प्रथमदर्शनी तरी दिसते. तसेच, त्याला राजकारणाचा एक कंगोराही आहे.

ललित पाटील आणि त्याच्या साथीदारांचा अमली पदार्थनिर्मितीचा नाशिकमधला कारखाना पोलिसांनी उद्ध्वस्त केला असला तरीही त्याचा राजकीय धुरळा मात्र आता पसरत आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या झडणाऱ्या फैरी एका बाजूला आणि दुसरीकडे पाटील याने ‘मी पळालो नाही...’ असे सांगणे हा निश्चित योगायोग होऊ शकत नाही.

रुग्णालय, पोलिस, आणि कारागृह या तिन्ही व्यवस्थांना ग्रासलेला ‘कर्करोग’ नेमका किती आणि कुठे-कुठे पसरला आहे, याचे निदान आता संपूर्ण व्यवस्थेचे ‘स्कॅनिंग’ केल्याशिवाय कळणार नाही. पण, अशी तपशीलवार तपासणी करण्याचा निर्णय, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेणार का, हा खरा कळीचा मुद्दा आहे.

अंमली पदार्थांच्या विळख्यात महाराष्ट्रातली शहरे अशी अडकू लागली तर ‘उद्याच्या’ आधुनिक भारताचे स्वप्न पाहाणे निव्वळ मनाचे रंजन ठरेल. अंमली पदार्थांचा सुळसुळाट हा जागतिक चिंतेचा विषय आहे. प्रगत देशांनाही हे दुखणे आटोक्यात आणता आलेले नाही. अंमली पदार्थांची तस्करी एकवेळ कडक कायदे आणि तपासण्यांद्वारे नियंत्रणात ठेवता येऊ शकते. पण निर्मितीच स्थानिक पातळीवर व्हायला लागली, तर सारेच कठीण होईल.

जे काही सकृतदर्शनी दिसते, त्यावरुन अंमली पदार्थांचा हा विळखा भयाकारीपणे घट्ट होत असल्याचा भास होतो. ही विषारी पिलावळ वेळीच रोखायची असेल, तर आधी सरकारी यंत्रणांनी आपल्या कर्तव्यांवर चढलेली बुरशी झटकण्याची खरी गरज आहे. अंमली पदार्थांचा हा विषारी सर्प आपल्या अंगणातच फळतो, फुलतो आहे, ही जाणीवच अंगावर शहारे आणणारी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब चालकांनो लक्ष द्या! ओला-उबर चालवायची असेल तर आधी ५ दिवसांचे प्रशिक्षण अनिवार्य; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

IND vs ZIM: "जे प्रॅक्टिसमध्ये करतो, तेच मॅचमध्येही..." वैभव सूर्यवंशी 'प्लेअर ऑफ द सीरिज' पुरस्कार जिंकल्यावर काय म्हणाला?

Police Station Fire : भायखळा पोलिस ठाण्यात अचानक आग; ऐतिहासिक इमारतीच्या पहिल्या मजल्याला आग

10 Point Action Plan for Women Safety : महिला सुरक्षेसाठी जिल्हास्तरावर 10 कलमी राष्ट्रीय कृती आराखडा; NCW चा महत्त्वाचा निर्णय

Rahul Gandhi: 'विद्यार्थ्यांवर पॅलेट गन चालवण्याचा आदेश कोणी दिला?' राहुल गांधींचा अमित शहांना थेट सवाल; पत्र लिहून मागितले उत्तर

SCROLL FOR NEXT