Marathi Classical Language ESakal
editorial-articles

विशेष संपादकीय : अमृताहुनी गोड..!

मायमराठीच्या प्रदीर्घ इतिहासातील हा सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा, असा दिवस आहे यात शंका नाही.

सकाळ वृत्तसेवा

मायमराठीच्या प्रदीर्घ इतिहासातील हा सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा, असा दिवस आहे यात शंका नाही. आचार्य अत्रे असते तर त्यांनी ‘गेल्या दहा हजार वर्षात’ असा आनंद झाला नाही, असे म्हटले असते. तमाम मराठीजनांना हर्ष होईल, अशी ही घटना आहे. ‘अमृतकाला’तच ही अमृताहुनि गोड बातमी आली, त्याचे स्वागत दोन्ही बाहू पसरून करायला हवे.

जी भाषा अजाणत्या वयातच जिभेवर चढली, ती अभिजात भाषा होती, ही भावनाच मराठी मनासाठी कृतार्थतेची आहे. अभिजात भाषेचा दर्जा मराठीलाही मिळावा, यासाठी गेली अनेक वर्षे मराठीप्रेमींनी जंगजंग पछाडले. बारा वर्षापूर्वी अभ्यासकांची एक विशेष समिती स्थापन करण्यात आली होती. प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखालील या समितीने सखोल संशोधनाअंती पाचशे पानांचा अहवाल सरकारला सादर केला.

ही भाषा किमान अडीच हजार वर्षे जुनी असून तिचा आजवरचा प्रवास अभिजात दर्जासाठी आवश्यक असलेल्या निकषांना पुरुन उरणारा आहे, असे त्या अहवालात सप्रमाण सिद्ध करण्यात आले. तरीही हे घडण्यासाठी दशकभराचा वेळ का जावा लागला, हे एक कोडेच आहे. मग पाठपुरावा समितीही नेमण्यात आली. तसेच अनेकांनी ‘अभिजात दर्जा मिळाला तर काय उजेड पडणार आहे?’ असा काहीसा नकारात्मक सूरदेखील लावला.

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यामुळे घरोघरच्या ‘पप्पा-मम्मी’ आणि शाळेतल्या ‘टीचर-मॅम’ या मंडळींना फारसा फरक पडणार नाही, हे तर खरेच. पण दिवसेंदिवस मराठीचे जे मातेरे होत चालले आहे, त्याला काही प्रमाणात तरी आळा घालण्यासारखे उपक्रम राबवता येतील, हे नसे थोडके. ‘झाले गेले गंगेस मिळाले’ असे म्हणून मायमराठीच्या नव्या बिरुदासाठी मराठीजनांनी आता सिद्ध व्हावे हे इष्ट.

मराठी भाषेसह प्राकृत, पाली, आसामी आणि बंगाली या भाषांनाही अभिजात दर्जा बहाल करण्यात आला आहे. मराठीचा एक मुद्दा राजकारणाच्या धुळवडीतून एकदाचा बाहेर गेला, ही आणखी एक स्तुत्य बाब. नाहीतरी ते एक तोंडीलावणेच होते. आता यापुढे तरी मराठीची हेळसांड आटोपती घेऊन अभिजात दर्जाला शोभेसा मायमराठीचा वापरही अभिजात प्रकारे होईल, असे स्वप्न बघू या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

kolhapur Danoli killing case : दानोळी २५ लाखांच्या अपहरण करून खून प्रकरणाला नवे वळण; एकावर डोळा, दुसऱ्यावर गेम, गुप्तांगाला दिला विजेचा शॉक

Pune Airport: पुणे विमानतळ धावपट्टीचे काम पावसाळ्यानंतरच; उन्हाळी हंगामामुळे दुरुस्ती लांबणीवर, ‘नोटम’ कालावधीत काम होणार!

जातीचा दाखला कैसा बनाया? सहर शेख अडचणीत, ४ कार्यालयांना फसवलं; नगरसेवकपद धोक्यात

Nirav Modi Extradition Update : नीरव मोदीला भारतात आणलं जाणार? CBIची टीम लंडनमध्ये

IPL 2026: मुंबई इंडियन्सचं टेन्शन आणखी वाढणार... रोहित शर्मा MI vs PBKS मॅच खेळणार की नाही? जाणून घ्या काय आहे अपडेट

SCROLL FOR NEXT