dhing tang
dhing tang 
संपादकीय

तीन नावाडी! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी

तीन नावाड्यांची गोष्ट तुम्ही ऐकली आहे का? ऐकाच मग आता. बरे का, कुठल्याही गोष्टीत असते, तसे एक गाव होते. कुठल्याही गावालगत असते, तशी तिथंही एक नदी वाहात होती. कुठल्याही नदीला असतो, तसा तिलाही दुसरा किनारा होता. कुणालाही शेजारीण जशी (बायकोपेक्षा) देखणी वाटते, (खुलासा : सन्माननीय अपवाद समाविष्ट), तसा ह्या नदीचा पैलकिनारा ऐलकिनाऱ्यावरल्या लोकांना छानदार वाटत असे. हे तिघे नावाडी ह्या नदीत होडी चालवण्याचा व्यवसाय करत असत. रोज सकाळी न्याहारी करून निघायचे. होडीने ऐलतीर-पैलतीर करत बसायचे.
एका नावाड्याचे नाव होते ‘रागा’, दुसऱ्याचे ‘राजा’ आणि तिसऱ्याचे ‘उठा’!!
रागाच्या नुसत्या नावातच राग होता, मनुष्य सदा हसतमुख! माणसांनी नेहमी एकमेकांवर प्रेम करावे, अशा मताचा. गाणी म्हणत होडी वल्हवणारा. त्याच्या होडीत बसण्यासाठी लोक धडपडत. काही लोकांना तर पैलतीरी जायचेसुद्धा नसे. तरीही ते रागाच्या होडीतून फेऱ्या मारत. ‘‘या ताई, या अक्‍का...द्या जरा धक्‍का!,’’ भाऊ, येता का जाऊ?’’ असे हाकारे घालत रागा आपला मज्जेत होडी चालवत असे. याउलट राजा! त्याचे नाव खरे तर रागा असायला हवे होते. सदोदित आपला डोक्‍यात राख घातल्यागत! काचसामान घेऊन पाव्हण्याने होडीत पाऊल घातले की तो मेलाच म्हणून समजा. खळ्ळ आणि खटॅक!! लोकांचाही इलाज नव्हता. कसाही असला तरी राजा चांगला आहे, असेच लोक म्हणत. बाहेरगावच्या पाहुण्यांकडून राजा नाविक आठ आणे ज्यास्त दाम घेत असे. त्याने आठ मागितले तर लोक घाबरुन सोळा देत!! असो. उठादादाचे तत्त्व वेगळेच होते. ‘होडी माझी आहे, वल्हे माझे आहे, मी चालवतो आहे, म्हंजे मी सांगीन तिथ्थेच जायचे’ असे तो सांगायचा. आपण बरे आपली होडी बरी असा त्याचा बाणा होता. त्याच्या होडीत बसलेल्या एखाद्या पाहुण्याने त्याचे नाव विचारले की त्यालाच उठून उभे राहावे लागे. कां विचारतां? अहो, सोप्पंय!! तुमचं नाव उठा असेल आणि कुणी तुम्हाला नाव विचारले की तुम्ही काय सांगणार? ‘उठा!’ असेच ना? मग नाव विचारणाऱ्याला उठावेच लागणार ना?
...एकदा काय झाले की तिघांना एकाच वेळी पैलतीरी जाण्याची वेळ आली. तिघांनाही घाई होती. तिघांनीही भराभरा होड्या भरल्या. गाठोडी-डबोली घेऊन पाशिंजरे होडीत चढली. तेवढ्यात रागाभाऊच्या लक्षात आले की होडीला पडलेय भोक!! त्यातून भसाभसा पाणी होडीत भरते आहे. पाशिंजरे घाबरुन उड्या टाकून पळू लागली. ते पाहून रागा गाणे म्हणू लागला...
‘‘राजाभाऊ, माझ्या होडीला पडलंया भोक,
हा नाही गा व्हाट्‌सॲप जोक,
पाणी भरलं रं भरारा,
तुझा दाखीव रं दरारा,
यिऊ दे कमळीच्या पाठीला पोक,
राजाभाऊ, होडीला पडलंया भोक’’
...रागाचे आर्त गाणे ऐकून राजाभाऊंनी स्वत:ची होडी खुंटीला बांधली आणि रागाच्या होडीचा नाखवा म्हणून सूत्रे हाती घेतली. म्हणाले, ‘‘डोण्ट वरी, बी हॅप्पी! आज धंदा बंद राहील... तुमच्या होडीत शिरलेलं पाणी उपसले जाईपोत्तर होडीसेवा बंद! बंद! बंद!!’’
सगळे पाशिंजर ऐलतटावर ताटकळले. आता काय करायचे? पंचाईतच झाली. उरता उरली फक्‍त उठादादाची नौका. इतका वेळ ते आरामात बसले होते. पण रागाराजाने बंद पुकाऱ्याबरोब्बर त्यांनी वल्हे हातात घेऊन ‘चला, चला’ असा पुकारा केला. त्यांना कुणीतरी विचारले, ‘‘असे का?’’ तर ते म्हणाले, ‘‘होडी बंद पडलेल्यांच्या ‘बंद’ला काय अर्थ आहे? बसा!! आय मीन...उठा!’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virtual Campaign: अटक केलेल्या राजकीय नेत्यांना व्हर्च्युअल प्रचाराची परवनगी मागणारी याचिका हायकोर्टाने फेटाळली

Goldy Brar Death: सिद्धू मूसवाला हत्याकांडाच्या मास्टरमाईंडची अमेरिकेत गोळ्या झाडून हत्या

Bumble : आता 'लेडीज फर्स्ट' नाही, तर पुरूषांनाही मिळणार समान संधी.. बम्बल डेटिंग अ‍ॅपने केली मोठी घोषणा!

Salman Khan : गोळीबार प्रकरणातील आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू ; गळफास घेऊन आयुष्य संपवण्याचा केला होता प्रयत्न !

China Highway Collapsed: चीनमध्ये भीषण दुर्घटना! हायवे कोसळल्यानं 19 ठार, डझनभर जखमी

SCROLL FOR NEXT