dhing tang
dhing tang 
संपादकीय

शुभंकराचे सुरेल पाऊल! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी

संधिकालच्या अनंगरंगी
अंतरातल्या व्योमपटावर
रात्र साकळे दहादिशांतुन
वस्तीमधल्या छताछतांवर
चांदणरात्री चांदणवेळी,
फुलास आल्या चंद्रवेलिवर
रक्‍तदेठिच्या पहाटपंखी
प्राजक्‍ताच्या शुभ्रफुलांवर
क्षितिजावरती फुटे तांबडे
त्या दिवसाच्या प्रारंभावर
चराचराच्या श्‍वासामध्ये
आणि तयाच्या उच्छ्वासांवर

पहाटसमयी शुभंकराचे
अंगणात पाऊल उमटते
तुझ्या सुरांच्या मेण्याची अन
आठहि प्रहरी वर्दळ असते...

दिवसरात्रीच्या अवरोहांतच
रस्त्यावरुनि भटकत भटकत
कधी उन्हाचे उष्ण उसासे,
कधी झळांचे हमले सोसत
कधी वाहुनि जळास मिळते
रुप पुराचे गढूळ काही
कधी थर्थरते, गारठते अन
जीवित सारे गोठुनि जाई
...गरगरणाऱ्या ऋतुचक्राशी
तुझ्या सुरांचे सदैव नाते

पहाटसमयी शुभंकराचे
अंगणात पाऊल उमटते
तुझ्या सुरांच्या मेण्याची अन्‌
आठहि प्रहरी वर्दळ असते...

कधि दु:खाची एकुटवाणी
कुणी छेडिते तीव्र सुरावट
कधि गगनाच्या गाभाऱ्यामधि
अंधाराचे जमते सावट
कधी सुखाच्या पाणवठ्यावर
थेंब टपोरा उठवि लहरी
कधी उसळतो मृद्‌गंधाचा
मोरपिसारा आवेगापरी  
अळुमाळू कधि फुले मोगरा
सोनपिंपळी सळसळ होते...

पहाटसमयी शुभंकराचे
अंगणात पाऊल उमटते
तुझ्या सुरांच्या मेण्याची अन्‌
आठहि प्रहरी वर्दळ असते...

अससी कोण तू? स्वप्न नियतीचे?
आशिषाचा ध्वनीच सुस्वर?
की आहे हा घरात माझ्या
सरस्वतीचा मंगल वावर?
असशी कुणी तू,-असे परंतु
तुझ्या सुरांना तुझेच कोंदण
अस्तित्वाच्या भाळावरती
सुभगाचे हे सुरेल गोंदण
पार्थिवातली येरझार ही
तुझ्या स्वरांनी सुसह्य होते...

पहाटसमयी शुभंकराचे
अंगणात पाऊल उमटते
तुझ्या सुरांच्या मेण्याची अन
आठहि प्रहरी वर्दळ असते...

कशी साठवू नेत्रांमधुनी
तुझ्या स्वरांची कृष्णनिळाई
कशी वाजते अशी निरंतर
अलौकिकाची ही शहनाई
श्‍याम सावळा दूर घुमवितो
वृंदावनी त्या मधुर पावा
सूर तिचा का इथे दर्वळे
वाहत येई माझ्या गावा?
शुभंकरचे पाऊल सुस्वर
अंगणि माझ्या रोज उमटते...

पहाटसमयी शुभंकराचे
अंगणात पाऊल उमटते
तुझ्या सुरांच्या मेण्याची अन्‌
आठहि प्रहरी वर्दळ असते...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जीव दे म्हटलं म्हणून एखाद्याने खरंच जीवन संपवलं तर काय? हायकोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

Instagram Algorithm : इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल; ओरिजिनल कंटेंट होणार प्रमोट.. मात्र यूजर्सचं टेन्शन वाढणार!

Namrata Sambherao: "महाराष्ट्राची लाडकी नमा..."; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरनं नम्रता संभेरावला लिहिलं खास पत्र

Viral Video: खिशात खेळण्यातली पिस्तूल सापडल्यानंतर पकडले कान, मुंबई मेट्रो स्टेशन वरील चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : कुर्ल्यातील भाभा हॉस्पिटलमध्ये कामबंद आंदोलन

SCROLL FOR NEXT