dhing tang
dhing tang 
संपादकीय

विस्तारभय! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी

प्रिय नानासाहेब,
जय महाराष्ट्र!

वास्तविक आम्ही कधी आपल्याला पत्रबित्र, लखोटे, चिठ्याचपाट्या असले काही पाठवीत नसतो. पण आज आमचा इलाज उरला नाही. गेले काही दिवस आम्ही तुमच्या मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल ऐकत आहोत. नुसते ऐकतच आहोत! हल्ली तर कुणी आम्हास मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल विचारले की आम्ही गाजराची फोड तोंडात टाकून गप्प बसतो. आपली बहुधा गाजराची शेती असावी! इतकी गाजरे तुम्ही कुठून आणता, हे आम्हाला एक कोडेच आहे. पण ते असो. पत्र लिहिण्यास कारण, की तुमच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या वावड्यांमुळे आम्हाला पक्ष चालवणे कठीण झाले आहे. महाराष्ट्राचा कारभार सुरळीत चालावा, आमची मराठी रयत (होय, आमचीच!) सुखाने जगावी, म्हणून आम्ही तुम्हास कारभारीपद दिधले. तुमच्या मिषें कारभाराची घडी नीट बसावी म्हणून आमचे काही शिलेदार-बारगीर तुमच्या दिमतीस दिधले. म्हटले, गृहस्थ नागपूरचा (असला तरी) नेमस्त आहे. त्यास महाराष्ट्राचे हवे नको बघू द्यावे! परंतु, कसले काय... उंटाने तंबूत शिरून अरबास बाहेर घालवावे, तद्वत घडले. उंटाच्या अतिक्रमणामुळे निम्माअधिक तंबूबाहेर गेलेल्या अरबासारखी आमची अवस्था जाहली आहे. आमचा आवाज जरा चढला की तुम्ही मंत्रिमंडळ विस्ताराचे गाजर पिशवीतून काढता!

स्वबळाचा नारा दिलेला असताना तुम्ही दरवेळी ही विस्ताराची भानगड काढून आमच्या स्वबळाची (गाजराची) कोशिंबीर कां करता? आपण विस्ताराचा बूट काढला की आमच्या वाड्यासमोर रांग लागते. आमचेच शिलेदार ‘आता तरी आमचा नंबर लावा!’ अशी गळ घालू लागतात. मंत्रिमंडळात असलेल्यांना विस्ताराचे नसले तरी खांदेपालटाचे भय असते. ते उगीचच वाड्यावर रेंगाळू लागतात.
...अशाने आम्ही पक्ष कसा चालवावा? तेव्हा ही गाजरे दाखवणे आता थांबवावे, असा आदेश आम्ही आपणांस देत आहो. ह्यात हयगय न करणे. उपाव जालीम होईल! कळावे.
 आपला. उधोजीसाहेब.
* * *
प्राणप्रिय मित्रवर्य बंधू मा. उधोजीसाहेब, शतप्रतिशत प्रणाम! आपले पत्र घेऊन येणाऱ्या आपल्या दूतानेही ‘यंदा आमचा नंबर लावा’ असे आमच्या कानात कुजबुजून सांगितले. गोष्टी ह्या थराला गेल्या असतील, असे वाटले नव्हते. आमच्या गाजर पॉलिटिक्‍समुळे आपल्यावर कांदा हुंगण्याची पाळी आली, ह्याचे विलक्षण वाईट वाटते. पण आता असे होणार नाही. होणारा मंत्रिमंडळ विस्तार (आणि खांदेपालट) शेवटचाच असेल, ह्याची मी हमी घेतो. (एकच वर्ष जेमतेम उरले आहे!!) माझ्या कारकिर्दीत मी एकदाच विस्तार केला. त्याआधी आपला पक्ष आम्हाला उशिरा जॉईन झाल्यामुळे तुमच्या शिलेदारांचा शपथविधी लोकांनी मंत्रिमंडळ विस्तारासारखाच घेतला, ही खरी वस्तुस्थिती आहे!! त्यात माझी चूक नाही.

मंत्रिमंडळ विस्ताराच्या बातम्या आल्या की आपल्या वाड्यावर रांगा लागतात, हे निरोगी लोकशाहीचे लक्षण मानावे. आपण नेमून दिलेला कारभारी (पक्षी : आम्ही) उत्तम कारभार करीत असल्याचेच हे द्योतक आहे. आपल्या वाड्यावर जशा रांगा लागतात, तशा माझ्या छोट्याशा बंगलीसमोरही लागतात. एरवी टर्रेबाजी करणारे मंत्री नम्रपणाने वागू लागतात. हवे-नको विचारतात. बाकीच्या कार्यकर्त्यांचे तर विचारूच नका.

दिवाळीनंतरच मंत्रिमंडळाचा विस्तार करीन असे म्हणतो. ह्यामुळे काही लोकांची दिवाळी बरी जाईल, काहींची बरी जाणार नाही. पण त्याला इलाज नाही. दिवाळीपूर्वी विस्तार केला तर आमची दिवाळी वाईट गेली असती. म्हणून थोडा विलंब होत आहे. काळजी नसावी. काही दिवस कळ काढा. (मंत्रिमंडळ विस्ताराच्या गाजरामुळे यंदा दिवाळीत आपल्याला शुभेच्छा भरपूर भेटणार!! जस्ट डोण्ट वरी!!) बाकी भेटीअंती बोलूच. फराळाला वाड्यावर येईनच. कळावे.
 आपला. फडणवीसनाना.
ता. क. :
‘फराळाला वाड्यावर येईन’ हे आश्‍वासन आहे, धमकी नव्हे!! आपला. नाना.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: पुन्हा सूरत पॅटर्न! शेवटच्या दिवशी काँग्रेस उमेदवाराने अर्ज मागे घेत केला भाजप प्रवेश..काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदी सोलापुरात दाखल; थोड्याच वेळात होणार सभा

Champions Trophy 2025 : जागा ठरली! पाकिस्तानने केली मोठी घोषणा; PCBच्या निर्णयानंतर BCCI उचलणार मोठं पाऊल?

Kansas Bizarre : आधी बायकोची केली हत्या, मग विम्याच्या पैशातून खरेदी केली चक्क 'सेक्स डॉल'.. पोलीसही झाले हैराण!

Health Care : अवकाळी पावसानंतर सावधगिरी बाळगा; सर्दीसह दमा, श्वसन विकारात होते वाढ

SCROLL FOR NEXT