Editorial Dhing Tang British Nandi Article 
संपादकीय

कसला झाला आवाज? (ढिंग टांग! )

ब्रिटिश नंदी

इतिहास साक्षीदार आहे. तो नेहमी साक्षीदाराच्या पवित्र्यातच असतो. वास्तविक गडी चांगलाच पेंगुळलेला होता. रिकामपणी बसल्या बसल्या माणसाला डुलकी लागतेच. (हो की नाही?) पण धुडुमधडाड स्फोटाच्या आवाजाने इतिहास दचकून जागा जाहला, आणि सर्सावून बसला. सवयीने त्याने कागद खसकन ओढले आणि दौतीत बोरू बुडवोन तो सज्ज जाहला. 
नेमकी तिथी सांगावयाची तर ती फाल्गुनातली तृतीया होती. टळटळीत संध्याकाळ होती. कृष्णकुंजगडाच्या पायथ्याशी वसलेल्या शिवाजी पार्कच्या टुमदार वस्तीत क्षणभर हलकल्लोळ जाहला. घरात टीव्हीसमोर बसलेली माणसे भराभरा बाहेर पडली, आणि सायंकालीन चालफेरीसाठी (पक्षी : इव्हनिंग वॉक) बाहेर पडलेली माणसे घाबरून (आपापल्या) घरात शिरली. लोक येकमेकांस विचारू लागले, "कसला आवाज झाला रे? कसला झाला आवाज?'' 
त्याच वेळी गडावर वेगळेच आवाजनाट्य घडत होते... 
"आम्ही आधीच बोलिलो होतो! निवडणुकीपूर्वी असले काही तरी युद्धसदृश घडणार! नव्हे, घडवले जाणार!!'' राजे डर्काळले. त्यांच्या नजरेत अंगार पेटला होता. मस्तक हिंदकळले होते. त्यांच्या उग्रावताराने धरणी थर्कापली होती. बाकी ते आधीच बोलिले होते, हे मात्र शंभर हिश्‍शांनी खरे होते. ते बऱ्याच गोष्टी आधीच बोलितात. ती त्यांची सवयच. माणूस द्रष्टा असला की असे होणारच. ते आधीच बोलिले होते, त्याप्रमाणे घडिले! नियतीचा तरी काय विलाज होता? राजे जे जे काही म्हंटात, ते ते घडविणे हेच नियतीचेही नियतकर्तव्य नव्हे काय? 
""हे म्हणे फकिर! फकिर कसले? बेफिकिर आहेत, झाले! इथं आपले जवान सरहद्दीवर प्राण पणाला लावत आहेत, आणि हे जाकिटे बदलोन बदलोन भूलथापांचे गोळीबार करीत आहेत! आग लागो, असल्या राजवटीला!!'' राजियांचा संताप अनावर झाला होता. अनावरावस्थेतच त्यांनी फकिरास बेफिकिर म्हणोन शाब्दिक कोटी साधिली, त्याने वातावरण किंचित निवळले. परंतु ते तेवढ्यापुरतेच. 
""आम्ही ही अशी जहरी टीका करितो, म्हणोन त्यांची लावारिस ट्रोलसेना आम्हांस घेरते! आमची मन:पूत चेष्टा करिते! म्हणे युद्ध करा!! अरे, दिवाळीतला साधा फटाका फुटला तरी हे लोक प्यांटीतल्या प्यांटीत दचकतात!!'' राजियांनी त्यांची मन:पूत हेटाळणी केली. आसपासचे मावळे ख्यॅख्यॅ हसले. 
"...असल्या ट्रोलबहाद्दरांना घराबाहेर खेचुनु, त्यांस पोत्यात बांधुनु, उखळीत घालुनु कांडुनु काढा! काय कळलेनु?'' राजियांनी आज्ञा दिधली. त्यांचे आज्ञाधारक सैनिक पेटुनु उठले. राजियांचा बोल म्हंजे देवावरचे फूल!! खाली पडता उपेगाचे नाही!! 
"आत्ताच जावोन त्यांची सारी ट्रोलसेना रस्त्यावर खेचोन आणतो, राजे! आपण फकस्त हुकूम करा!!'' एका मावळ्याने गुडघ्यावर बसोन आण घेतली. 
"ऐकू कमी येते काय तुला? एक सेकंदापूर्वी आम्ही मराठी भाषेतच तशीच आज्ञा केली नाऽऽऽ..,'' चापट मारण्यासाठी हात उगारोन दातोठ खात राजियांनी सदर मावळ्यास झापले. 
"राजे, निवडणुका नजीक आल्याती! आपुण काय करावे? हितं जावं तर थितून हाकून देतंत, आणि थितं जावं, तर हितं कुनी हुबं करीना! अशानं आसं हुतंय, तर मान्सानं जावं तरी कुटं?'' एका रांगड्या मावळ्याने त्यांच्या मनातील सल बोलोन दाखवली. शेवटी राजे करतील, तेच खरे, हे मान्य केले तरी काळजी कुणाला सुटते? (हो की नाही?) 
"ते मी नंतर सांगीन! आणि त्या लावारिस कार्ट्यांचा बंदोबस्त करा!!'' राजे म्हणाले. तेवढ्यात ते घडले...धुडुम धडाड आवाज झाला!! प्राणांतिक दचकून कपाटाच्या मागे दडत राजे ओरडले... 
"कसला आवाज झाला रे? कसला झाला आवाज?'' 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat: ७५ वर्षांसंबंधीचं 'ते' विधान भागवतांनी नेमकं का केलं? संघाकडून स्पष्टीकरण, विरोधकांचा मोदींवर रोख

Manchar News : काय सांगता! वृद्ध महिलेचे घरच गेले ‘चोरीला’; न्यायासाठी धावपळ सुरू

Latest Marathi News Updates : नाशिक जिल्हा परिषदेतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलंबित

Palghar News: वसई-विरारमध्ये नालासोपाऱ्यात अमली पदार्थांचा पर्दाफाश, 12 आरोपी अटक

IND vs ENG 3rd Test: 'चेंडू'वरून रामायण! शुभमन गिलचं वाद घालणं चुकीचं नव्हतं; अम्पायरने काय केले, ते वाचाच...

SCROLL FOR NEXT