dhing tang
dhing tang 
संपादकीय

दमणूक! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी

स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे संस्थान.
वेळ : श्रमपरिहाराची.
काळ : आळसावलेला.
प्रसंग : ओढवलेला.
पात्रे : सालंकृत सौभाग्यवती कमळाबाई आणि राजाधिराज उधोजीराजे.
..............................
ब्यागा उपसून नव्या भरण्याच्या उपक्रमात कमळाबाई मग्न आहेत. दौऱ्यावर निघण्याची त्यांची धावपळ सुरू आहे. मधूनच त्या दाराकडे पाहतात. ‘‘शी बाई, अजून कशी स्वारी आली नाही?’’ असे पुटपुटतात. अब आगे...
कमळाबाई : (स्वत:शी बडबडत) कित्ती कामं बाकी आहेत! कुठे कुठे पुरे पडायचं एका माणसानं! मेलं एकटीनं करायचं तरी किती? पंचवीस वरसांच्या नात्याच्या आणाभाका घेणारं आपलं माणूस असं घोरत पडलं तर कसं व्हायचं? मध्येच रणांगण सोडून पळ काढणं शोभतं का एका माणसाला? शिंगरू मेलं हेलपाट्यानं...अशी अवस्था...(तेवढ्यात उधोजीराजे प्रविष्ट होतात.) अग्गोबाई! शंभर वर्षं आयुष्य आहे बरं एका माणसाला!
उधोजीराजे : (मिशीला पीळ देत) ते कसं काय?
कमळाबाई : (कुचकटपणे) शिंगरू म्हटलं आणि तुम्ही आलात ना! म्हणून म्हटलं!
उधोजीराजे : (ब्यागेकडे बघत)...ओहो! तुम्ही अगदी आमच्या मनातलं ओळखता बाईसाहेब! मनकवड्या आहात अगदी!!
कमळाबाई : (लाजून) इश्‍श! काहीतरीच तुमचं!!
उधोजीराजे : (मिशीवरून बोट फिरवत) आमच्या मनातलं ओळखून प्रवासाची ब्याग भरायला घेतलीत ती! आम्ही अगदी हाच प्रस्ताव घेऊन आलो होतो!
कमळाबाई : (खोट्या रागानं) पुरे झाली हो ही साखरपेरणी!
उधोजीराजे : (सहज ब्यागेवर बसत) हुश्‍श!! निवडणुकीचा धबडगा एकदाचा संपला! फार हिंडलो रानोमाळ! तुम्हाला शब्द गेला होता आमचा! आठवतंय ना?
कमळाबाई : (कपड्यांची घडी घालत) कसला शब्द?
उधोजीराजे : (अचंब्यानं) पाच वर्षांची दुश्‍मनी बघितलीत, आता दोस्ती बघा, असं म्हटलं नव्हतं आम्ही?
कमळाबाई : (चतुराईनं) हो ना? मग भरा ब्याग भराभर!
उधोजीराजे : (मिशीवर बोट फिरवत) श्रमपरिहारासाठी चार दिवस कुठं तरी थंड हवेच्या ठिकाणी जावं! आराम करावा! चिक्‍कार आंबे खावेत!
कमळाबाई : (कुत्सितपणे) म्हंजे दोन फोडी...ना?
उधोजीराजे : (दुर्लक्ष करत) आमरस खावा, मजा करावी आणि थेट राज्याभिषेकाच्या दिवशी येऊन पोचावं! दगदग संपली एकदाची, ह्याचाच आनंद आहे!!
कमळाबाई : (फणकाऱ्यानं) तुमची दगदग संपली, पण आमची? आत्ता कुठे ऐन भरात आलंय आमचं युद्ध!! चला, आटपा लौकर...आणि हे काय? तुम्ही अजून घरच्याच कपड्यांत?
उधोजीराजे : (आश्‍चर्यानं) कमालच झाली! आम्ही तर आमचे कपडे धुवायलासुद्धा टाकले! अहो, काल मतदान झालं, आता आरामच आराम!
कमळाबाई : (पदर तोंडाला लावत) बाई, बाई, बाई! काय हा माणूस आहे? अहो, महाराष्ट्रातलं झुंज आटोपलं म्हणून युद्ध कां संपणार आहे?
उधोजीराजे : (ठामपणाने) आम्ही आता झक्‍कपैकी ताणून देणार!! गेले दीड महिना राब राब राबलोय! तुमच्या साथीनं पायाला भिंगरी लावल्यागत महाराष्ट्रभर हिंडलोय! आता आम्हाला आरामाची गरज आहे!
कमळाबाई : (संतापाने) तुमचं हेच वागणं आम्हाला आवडत नाही! असे वागता, म्हणूनच लोक तुम्हाला प्रांतवादी म्हणवतात!
उधोजीराजे : (कु÷र्यात) खामोश! वाट्‌टेल ते बोलू नका! अयोध्येपर्यंत मजल मारून आलो आहोत आम्ही! प्रांतवादी म्हणे! चेपीन एकेकाला!!
कमळाबाई : (थंडपणाने) आधी ही ब्याग चेपून भरा!
उधोजीराजे : (ब्यागेवर बसत हतबल सुरात)...मी काय म्हंटो, तुम्ही व्हा पुढे, आम्ही येतोच मागाहून!! कसं?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: 'ती भटकती आत्मा कोण PM मोदींना विचारणार', शरद पवारांवर केलेल्या अप्रत्यक्ष टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

Mumbai Lok Sabha: मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून रवींद्र वायकर शिवसेनेचे उमेदवार

T20 WC 24 Team India Squad : ना अय्यर... ना राणा... शाहरुख खानने 'या' खेळाडूला संघात घेण्याची केली मागणी

Healthy Menopause: हेल्दी मोनोपॉझसाठी 'या' नैसर्गिक उपायांचा करा वापर, मिळतील अनेक फायदे

Rishi Kapoor: 'ज्यांच्यावर आपण प्रेम करतो ते आपल्याला सोडून जात नाहीत'; ऋषी कपूर यांच्या आठवणीत लेक अन् पत्नी भावूक

SCROLL FOR NEXT