Editorial
Editorial  symbolic photo
संपादकीय

अग्रलेख : कवित्वानंतरचा शिमगा!

सुशांत जाधव

गुजराथी भाषेतील कवयित्री पारुल खक्कर यांची एक कविता गेले काही दिवस समाजमाध्यमांमधून भरपूर गाजते आहे. इतर माध्यमांनीही या कवितचा आशय आपापल्या परीने लोकांपर्यंत पोचवण्यासाठी धडपड सुरु केलेली दिसते. विविध भाषांमध्ये या कवितेची भाषांतरे होताना दिसत आहेत, आणि विशेष म्हणजे ही भाषांतरे सामान्य लोकच करत आहेत. भले भले डावे-उजवे वैचारिक खक्कर यांच्या कवितेवर चिंतनपर लेख लिहीत आहेत, चर्चा करत आहेत. शिमग्यानंतरचे कवित्त्व माहीत होते, पण कवित्वानंतरचा हा शिमगा फारा वर्षांनी कानांवर आला! एरवी, कवितेच्या वाट्याला इतकी जोरकस समाजमान्यता फार क्वचित येते. कविताच कशाला, अन्य कुठलीही साहित्य वा कलाकृती इतकी गाजली तर ती लोकविलक्षण सांस्कृतिक घटनाच मानली जाते आणि जायलाही हवी. परंतु, पारुल खक्कर यांच्या कवितेबाबत जे काही घडते आहे, त्याला नकारात्मक कंगोरेच जास्त आहेत. त्याला सांस्कृतिक कटाचा दर्प येऊ लागला आहे, हे घातक आहे. (Editorial On The criticised Gujarat poet Parul Khakhar for her poem)

पारुल यांनी गेल्या महिन्यात आपल्या समाजमाध्यमातील ‘भिंती’वर एक कविता पोस्ट केली. ‘एक अवाजे मडदां बोल्यां, ‘सबकुछ चंगा चंगा, राज तमारा रामराज्यमां शबवाहिनी गंगा’ अशा तिच्या पहिल्या ओळी होत्या. आणखीही बरेच काही होते, जे सत्ताधाऱ्यांना चांगलेच झोंबले. मूळ कविता गुजराती भाषेतली, त्याची भाषांतरे होता होता त्यात विविध गडदरंगी छटा मिसळत गेल्या. मे महिन्यामध्ये कोरोनाची साथ ऐन भरात असताना, बिहार-उत्तर प्रदेशातील गंगेच्या पात्रात वाहिलेल्या मानवी कलेवरांची भयंकर दृश्ये माध्यमांनी दाखवली होती. त्याच दृश्यांवर पारुल यांची प्रतिक्रिया कवितेच्या रुपबंधात उमटली. गंगेच्या काठाला मृतदेह पुरण्याचा प्रकार नवा नाही, याचा कोरोनाबळींची संख्या लपवण्याशी काहीही संबंध नाही, असा खुलासा सरकारतर्फे करण्यात आला. परंतु, जे दिसले ते विदारक होते, हेही कोरडे सत्य आहे. आगीनडागासाठी लाकडे उरली नसल्याने हा मार्ग लोकांना स्वीकारावा लागला, असा आरोप केला जातो. गंगेच्या वेगवान प्रवाहामुळे काठावरील माती ठिसूळ होत गेली, आणि पुरलेले मृतदेह प्रवाहात वाहून गेले, हा सरकारी खुलासा ग्राह्य मानला तरीदेखील विदारक दृश्याचे समर्थन कसे करणार, हा प्रश्न उरतोच.

राजकीय टीकेच्या भडिमाराला उत्तर देताना राजकीय अभिनिवेशच कामी येतो हे राजकारणापुरते ठीक आहे, परंतु जेव्हा सामान्य जीविते मानवी आयुष्याची ही परवड स्वत:च्या डोळ्यांनी पाहतात, तेव्हा असले प्रश्न राजकारणाच्या पलिकडे जातात. सामान्यांच्या डोळ्यांना जे दिसते, त्यावर पांघरुण घालण्याचा प्रयत्न धिक्कारार्ह आहेच, तो अंगलटही येतो. अशा परिस्थितीत एखादा कवी किंवा कवयित्री आपल्या कवितेमधून अभिव्यक्त झाली तर तिला दोष कसा द्यायचा? पण तसे घडले.

पारुल यांच्या कवितेवर समाजमाध्यमांवरील मंडळी तुटून पडली. एका प्रासंगिक कवितेवर शिव्यांच्या लाखोलीचा पाऊस पडला. अर्थात या कवितेचे समर्थन करणारेही होतेच. परंतु, ते मोजकेच होते. ‘गुजराथी साहित्य अकादमी’चे अध्यक्ष विष्णू पंड्या यांनी लगोलग आपल्या ‘शब्दसृष्टी’ या अकादमीच्या मुखपत्राच्या संपादकीयामध्ये पारुल यांचे नाव न घेता नमूद केले की, ‘ज्यांना मातृभूमीबद्दल सुतराम देणेघेणे नाही, अशा डाव्या विचारसरणीच्या तथाकथित पुरोगामी मंडळींना ‘साहित्यिक नक्षलीं’ना हाताशी धरुन देशात अराजक माजवण्याची संधी मिळते…’ विष्णू पंड्या यांचा रोख उघडपणे पारुल खक्कर यांच्यावरच होता, आणि त्यांनाच त्यांनी ‘साहित्यिक नक्षलवादी’ ठरवले होते. साहित्यिक नक्षलवादी ही नवी उपाधी आहे. ‘अर्बन नक्षल’ ची पोटजात म्हणा हवे तर! याच विष्णू पंड्या यांनी काही काळापूर्वी पारुल खक्कर यांना ‘गुजराती कवितेचे नवे आशास्थान’ असे म्हटले होते, ही बाब अलाहिदा. या सगळ्या प्रकाराला दमनशाहीचा एक असह्य दर्प येतो हे मात्र खरे. या देशात अलीकडे कविता झोंबते, व्यंग्यचित्र खुपते, टीका अस्वस्थ करते, ही सगळी कशाची लक्षणे आहेत? अलीकडच्या काळात वाढलेल्या या प्रकारांबाबत आत्मपरीक्षण करायला हवे.

पारुल खक्कर यांची कविता बरी की वाईट, याच्या साहित्यसमीक्षेत अजूनही कोणी पडलेले नाही, त्यांच्या अभिव्यक्तीचा रोख थेट वंदनीय नेत्याकडेच दिसत असल्याने ‘चाय से किटली गरम’ या न्यायाने काही उजवी मंडळी आपले धार्जिणेपण निभावताना दिसत आहेत, इतकेच. नकोसे सवाल करणाऱ्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी खुद्द नेत्याला रिंगणात उतरावे लागत नसते. ते काम त्याचे अनुयायीच करत असतात. अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. सुमारे ऐंशी वर्षांपूर्वी मन्रो लीफ नामक लेखकाने लिहिलेल्या ‘फर्डिनंड’ या बालकथेच्या कॉमिक पुस्तकालाही हिटलर-मुसोलिनी आणि स्पेनचा हुकूमशहा फ्रँको याने ‘क्रांतिसाहित्य’ ठरवून ते कॉमिक चोपडे चौकाचौकात जाळले होते. फक्त मोहनदास करमचंद गांधी नावाच्या एका महात्म्याने निर्भयपणे टाळी वाजवून त्या बालकथेला दाद दिली. रणांगणावर तलवार गाजवणारे हुकूमशहा लेखणीला घाबरतात, हेच यातून सिद्ध झाले. पारुल खक्कर यांच्या कवितेला अनुल्लेखाने मारणे मात्र शासकांना जमले नाही, कारण समाजमनाचा भरघोस पाठिंबा त्या कवितेला मिळाला. पारुल यांनी काही दिवसांपूर्वीच एक शेर आपल्या ‘भिंती’वर टाकला : गनीमत के ‘पारुल’ अभी तक है जिंदा, रहा नाम उनका कई खंजरों में…,’ आता या अभिव्यक्तीचे काय करायचे?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT