editorial pune page edition article on Jamai Raja Dhing Tang
editorial pune page edition article on Jamai Raja Dhing Tang  
संपादकीय

जमाईराजा ! (ढिंग टांग !)

सकाळवृत्तसेवा

नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (एकशे आठ वेळा लिहिणे) एकही बदली न करता परदेश दौऱ्यावर सटकण्याची ही माझी चार वर्षांतली पहिलीच खेप असावी! निघताना सटासट हातासरशी डझनभर बदल्या करून घ्याव्यात असे वाटले होते. पण आता बदल्या उरल्याच नाहीत, असे पीएने सांगितल्याने नाइलाज झाला. मुंबईचा पाऊस वैताग आणतो. हवामान खात्याने भरपूर पाऊस पडेल, असे भाकित केल्यापासून कुठेतरी निघून जावे असा विचार मनात येत होता. (एवढ्यासाठी यंदा पावसाळी अधिवेशनही नागपुरात नेले...)

इतर पुढारी उन्हाळ्यात थंड हवा खायला परदेशात जातात. मी पावसाळ्यात कॅनडाचा दौरा काढला. तिथे मॉंट्रियलमध्येही अधूनमधून पाऊस पडतो म्हणे. खरे खोटे कोण जाणे. एकंदरित पाऊस टाळणे सोपे नाही हेच खरे. मॉंट्रियल आणि न्यूयॉर्कच्या दौऱ्याची परवानगी काढण्यासाठी मी दिल्लीला फोन केला होता. 

""केनडाला कशाला ज्यायच्या?'' असे कमळाध्यक्ष मोटाभाईंनी विचारले. तुम्ही असे ऐनवेळी गेलात तर तुमच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कोण करणार? असेही त्यांनी गंभीर आवाजात छेडले. "विस्तार कोण करणार?' ह्या सवालात तर चक्‍क इशाराच दडला आहे, असे मला वाटले. ""बरं नाही जात मग'' असे मी पुटपुटलो. पण ते म्हणाले, ""जरूर जा... तिथे तुमच्या स्वागत जमाईराजासारखा होणार! जाओ, जाओ!!'' 

...पडत्या फळाची आज्ञा स्वीकारुन मुसळधार पावसात धावत पळत विमान पकडले. एवढ्या पावसात विमान उडेल का, ह्याचे टेन्शन होते. पण दैव बलवत्तर होते. मुंबई विमानतळावरून उड्‌डाण केल्यानंतर सुटकेचा निश्‍वास सोडला. आता थेट मॉंट्रियलला उतरायचे!! नकोच ती मुंबईची कटकट... पक्षातला प्रत्येक जण विचारत होता की मोटाभाई काय म्हणाले उधोजीसाहेबांना? मित्रपक्षातले लोक भेटले तर विचारत होते की काय म्हणाले आमचे साहेब तुमच्या अफझुलखानाला? सगळ्यांनी मी उगाचच, ""लौकरच कळेल!'' असे गूढ उत्तर देऊन कॅनडाला सटकलो आहे. 

आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि हायपरलूपचे तंत्र मिळवण्यासाठी मी कॅनडाला आलो आहे. महाराष्ट्राला ह्या दोन्ही गोष्टींची नितांत गरज आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे कारभार सुधारेल आणि हायपरलूपमुळे वेगाने विकास होईल!! 
हायपरलूपची महाराष्ट्राला गरज आहे असे मी प्रारंभापासून म्हणतो आहे. आमच्या बैठकीत पहिल्यांदा मी हायपरलूपचा उल्लेख केला तेव्हा साऱ्यांनी माना डोलावल्या. एका मंत्र्याने (नाव सांगणार नाही...) तर "लोकशाही आटोक्‍यात राहण्यासाठी हायपरलूप तंत्र आणावेच लागेल' अशी टिप्पणी केली. मी कपाळाला हात मारला. 

""अहो, हायपरलूपचा लोकसंख्येशी काय संबंध? मुंबईहून पुण्याला 20 मिनिटांत जाता येईल!'' मी खुलासा केला. सगळ्यांनी पुन्हा माना डोलावल्या. ""...पण पुण्याहून मुंबईला यायला किती वेळ लागेल?''असे आमच्या बापटमास्तरांनी विचारले. खरे तर असे काही विचारण्याचे कारण नव्हते. जाऊ दे झाले!! हायपरलूप आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स मी घेऊन जाईन, तेव्हा ह्या सगळ्यांना एक डेमो देणार आहे!! 
...मॉंट्रियलचे दिवे लुकलुकू लागलेले विमानातून दिसले, तेव्हाच अचानक साक्षात्कार झाला. मोटाभाईंनी "तुमचे जमाईराजासारखे स्वागत होईल' असे का म्हटले असेल? कॅनडाच्या पंतप्रधानांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला धोंड्या महिन्यात आवतण धाडावे, ह्यातून काही राजकीय अर्थ निघतो का? 
...मी मनात देवाचा धावा सुरू केला आहे. 

- ब्रिटिश नंदी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT