youth
youth sakal
संपादकीय

भाष्य : तरुणांना खुणावतेय ‘बुद्धिसंपदा’

प्रा. गणेश हिंगमिरे

तरुण वर्गाला ‘बौद्धिक संपदे’ची महती कळली, तर अधिक प्रमाणात तरुण वर्ग संशोधनाकडे आणि नवीन तंत्रज्ञानाच्या निर्मितीकडे वळेल.

तरुण वर्गाला ‘बौद्धिक संपदे’ची महती कळली, तर अधिक प्रमाणात तरुण वर्ग संशोधनाकडे आणि नवीन तंत्रज्ञानाच्या निर्मितीकडे वळेल. त्यातून अनेक जागतिक प्रश्नांवर उत्तरे सापडू शकतील. भारताने या आघाडीवर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. आजच्या ‘जागतिक बुद्धिसंपदा दिना’निमित्त.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या विषयनिहाय अनेक संस्था कार्यरत आहेत. अशाच प्रकारे बौद्धिक संपदा म्हणजे पेटंट, ट्रेडमार्क, कॉपीराइट किंवा भौगोलिक उपदर्शन या जागतिक स्तरावरील महत्त्वाच्या विषयांसाठी १९६७मध्ये ‘जागतिक बौद्धिक संपदा संघटना’ निर्माण करण्यात आली. जागतिक बौद्धिक संपदा संघटनेची १९३ सदस्यराष्ट्रे आहेत. भारतही या संघटनेचा अगदी सुरुवातीपासून सदस्य असल्याने या संघटनेच्या कराराला अनुसरून भारताने आपले बौद्धिक संपदाविषयक कायदे निर्माण केले आहेत. या कायद्यांचा खास प्रत्यय कोविडच्या कालावधीत आला. एका सदस्य राष्ट्राने तयार केलेल्या कोविडवरील लशीला जर पेटंट मिळालेले असेल तर ती लस दुसऱ्या सदस्यराष्ट्रात परवानगीशिवाय बनविता येणार नाही. म्हणजेच जागतिक बौद्धिक संपदा संघटनेच्या सदस्य राष्ट्रांमध्ये एकमेकांच्या बौद्धिक संपदा संरक्षणाच्या संदर्भात समन्वय निश्चित झालेला आहे. हे लक्षात घेता ‘जागतिक बौद्धिक संपदा संघटने’ला अलीकडच्या काळात मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.

२५ एप्रिल हा ‘जागतिक बौद्धिक संपदा दिन’ म्हणून पाळला जातो. त्यासाठी दरवर्षी एक विषयसूत्र निश्चित केले जाते. त्यावर लक्ष केंद्रित केले जाते. गेल्या वेळी ‘महिला आणि पेटंट’ असा विषय ठरविण्यात आला होता. महिलांना पेटंट मिळण्याचे प्रमाण कमी असल्याने त्यांना प्रोत्साहन देणे हा त्यामागचा हेतू होता. या उपक्रमाचा फायदा निश्चित झाला, याचे कारण त्यानंतर महिलांना मिळालेल्या पेटंटमध्ये वाढ दिसून आली. या वर्षी तरुणवर्गाला पेटंटचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न होईल. यंदाच्या वर्षी बौद्धिक संपदा दिवसाची थीम तरुण वर्ग आणि त्यांना बौद्धिक संपदेच्या अधिकाराची विशेष जाणीव करून देणे अशी आहे. तरुण वर्गाला जर पेटंट किवा तत्सम बौद्धिक संपदेची महती कळली, तर अधिक प्रमाणात तरुण वर्ग संशोधनाकडे किंव्हा नवनवीन पदार्थ किंवा तंत्रज्ञान निर्मितीकडे वळेल आणि जागतिक स्तरावर अनेक प्रश्नांना उत्तर शोधेल, अशी आशा आहे.

सध्या जगभरात रोजगार, ऊर्जा, प्रदूषण यासारखे अनेक प्रश्न डोके वर काढत आहेत. या सर्व प्रश्नांना विचारमंथनातून उत्तरे शोधायला हवीत. आणि सदर उत्तर त्या व्यक्तीची बौद्धिक संपदा म्हणून नोंद केली जाईल, त्याचा फायदा त्या व्यक्तीला आणि त्याचबरोबर त्यांच्या देशाही नक्की होईल, परिणामतः जगातील महत्त्वाच्या प्रश्नांना मार्गस्थ केल्यामुळे त्याला जगभरातील बाजारपेठ ही त्याच्या बौद्धिक संपत्तीसाठी उपलब्ध होईल. अजूनही भारतासारख्या अनेक देशांमध्ये बौद्धिक संपदा हा विषय ऐच्छिक विषय म्हणून शिकविला जातो, तर चीन आणि जपानमध्ये शालेय अभ्यासक्रमामध्ये या विषयाला कायमस्वरूपी स्थान देण्यात आले आहे. जपानमध्ये प्राथमिक शिक्षणाचा हा घटक असल्याने लहान वयातच मुलांचा दृष्टिकोन तयार होतो. दहावी- अकरावीच्या टप्प्यावर मुलं संशोधनप्रकल्प पार पाडतात, एवढेच नव्हे तर पेटंटही मिळवितात. मी २००९ मध्ये जपानला होतो आणि तिथे इयत्ता अकरावीच्या मुलांनी चौकोनी कलिंगड तयार केलेले पाहिले आहे. असे कलिंगड बनविण्यामागील प्रश्न होता की गोलाकार कलिंगड पॅकिंगला अडचणीचे ठरते आणि म्हणून चौकोनी कलिंगड बनवावे आणि त्यासाठी मुळापासून काय बदल करायचे, जेणेकरून चौकोनी कलिंगड बनेल आणि पॅकिंगची समस्या मिटेल? या प्रश्नाचे उत्तर त्या विद्यार्थ्यांनी यशस्वीरीत्या शोधले. त्यांनी चौकोनी कलिंगड बनवले आणि त्याचे पेटंट संपादन केले.

अनास्था आणि अज्ञान

जपानमध्ये इयत्ता सातवीला तीन तीन मोठी बौद्धिक संपदेची पुस्तके सरकारने मुलांसाठी तयार केली गेली आहेत, त्यामुळे जपानमधील तरुण मुलांना मिळालेल्या पेटंटची संख्या हजारांमध्ये आहे.तरुणांसाठी असलेल्या बौद्धिक संपदा धोरणाचा अवलंब जपानने केलाच. चीननेदेखील अशाच प्रकारचे धोरण स्वीकारून धडाक्याने त्यांची अंमलबजावणी केली. मागील वर्षी चीनने जवळपास १६ लाख पेटंट दाखल करून घेतले. त्याचवेळी भारतात ही संख्या ५६हजार होती आणि त्यातही मूळ भारतीयांचे केवळ सोळा हजार पेटंट होते. म्हणजे चीनमध्ये एका महिन्याला सव्वा लाख पेटंट चिनी लोक दाखल करतात, तर भारताची संख्या आहे निव्वळ बाराशे पन्नास. एकूणच या विषयासंबंधीची अनास्था आणि अज्ञान दूर करण्याची गरज अहे. या अनास्थेच्या मुळाशी जायला हवे. शालेय अभ्यासक्रमांमध्ये पेटंट किंवा तत्सम बौद्धिक संपदेचा समावेश नसल्याकारणाने किंवा महाविद्यालयीन तरुणांच्या अभ्यासक्रमांतही बौद्धिक संपदेचा विषय नसल्यामुळे भारतीयांची बौद्धिक संपदेची नोंद अत्यल्प आहे.

जगात जास्त तरुण असलेला देश म्हणून भारत आता गणला जात आहे; पण या तरुणांच्या बुद्धीतून निर्माण होणाऱ्या घटकाला किंवा वस्तूला बौद्धिक संपदा हक्काचे संरक्षण मिळू शकते हे जर त्यांना माहीत नसेल, तर त्यांच्याकडून बौद्धिक संपदेची निर्मिती होणार नाही. तरुण लोकसंख्येचा लाभांश मिळण्यासाठीदेखील या आघाडीवर प्रयत्न करण्याची गरज आहे.

तरुणाईची ऊर्जा नवनिर्मितीकडे वळविणे यामध्ये प्रगत राष्ट्रांनी मोठे यश मिळवलेले आहे आणि भारतानेदेखील त्या पावलावर पाऊल उचलले तर निश्चितच भारतीय बौद्धिक संपदेमध्ये वाढ झालेली असेल. यंदाचा ‘बौद्धिक संपदा दिवस’ हा युवककेंद्रित असल्याने जीनिव्हा येथे अनेक तरुणांनी जगभरातून केलेल्या बौद्धिक संपदेचे चित्रीकरण प्रसारित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर तरुणांमध्ये बौद्धिक संपदेच्या स्पर्धांना प्रोत्साहन देण्यासाठी जागतिक बौद्धिक संपदा संघटनेने काही तरुणांच्या संशोधनाचे व्हिडिओ त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहेत आणि लोकांमधून त्या तरुणांच्या बौद्धिक संपलेला ‘लाईक करा’ किंवा पाहून ‘इतर ठिकाणी प्रसारित करा’ असे आवाहनही संघटनेच्या प्रमुखांनी केले आहे. भारतातही अनेक ठिकाणी बौद्धिक संपदा दिवसाचे आयोजन करण्यात आले आहे.

याच अनुषंगाने महाराष्ट्रात विशेष करून राजभवनामध्ये आणि मंत्रालयात दोन कार्यक्रम होणार आहेत. राजभवनामध्ये दोन महत्त्वाच्या ‘भौगोलिक उपदर्शन’ (जी.आय) या भारताच्या बौद्धिक संपदेच्या अर्जाची प्रत राज्यपालांना सुपूर्द करण्यात येणार आहे, तर मंत्रालयात ‘मार्कफेड’ या शासनसंचलित संघटनेच्या माध्यमातून जवळपास १५ शेतकऱ्यांच्या बौद्धिक संपदेचे विशेष किंमत प्रदान करून विपणन करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना बौद्धिक संपदा मिळाल्यामुळे विशेष अधिक किंमत देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरेल. बौद्धिक संपत्तीच्या संरक्षणासाठी आणि प्रसारासाठी मोठ्या प्रमाणावर जागृती घडवायला हवी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BANW vs INDW, T20I: भारतीय महिलांचा सलग दुसरा विजय, राधा यादव-दीप्ती शर्माची धारदार गोलंदाजी

Fact Check : निवणुकीत लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये डुकराची चरबी नसते; व्हायरल होत असलेला दावा खोटा

LSG vs MI IPL 2024 Live : लखनौसमोर मुंबईनं नांगी टाकली; 5 षटकात 4 फलंदाज तंबूत

IPL 2024: सेंड ऑफ देणाऱ्या KKRच्या खेळाडूलाच BCCI ने दिला सेंड ऑफ; दंडाचीच नाही, तर बंदीचीही झाली कारवाई

Aditya Thackeray : बाहेरचे लोक कोण आम्हाला येऊन सांगणारे? आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका

SCROLL FOR NEXT