Maha Biz dubai 2024
Maha Biz dubai 2024 sakal
संपादकीय

‘ग्लोबल टू लोकल’चा विचार आवश्यक

सकाळ वृत्तसेवा

‘गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरम ग्लोबल’तर्फे दुबईत नुकतीच द्विवार्षिक परिषद झाली. या परिषदेत ‘ग्लोबल टू लोकल’ या विषयावर ‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी विवेचन केले. त्याचा हा गोषवारा...

माझ्या अनुभवानुसार, आकलनानुसार काही विचार मी आपणासमोर मांडणार आहे. ‘ग्लोबट टू लोकल’ विषयावर मी सांगू इच्छितो. एक भारतीय म्हणून मला आपणास काही गोष्टींच्या धोक्याची जाणीव करून देणे आवश्यक वाटते. भारतीय अर्थव्यवस्था वेगाने प्रगती करत आहे, अशी वल्गना करत असलो तरी आपल्या आसपास काय चालले आहे, याचे भान असणे आवश्यक आहे.

दोन गोष्टींची मला विशेष काळजी आहे. एक म्हणजे चीन. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जोरावर २०३० पर्यंत १५ ट्रिलियन डॉलरच्या आसपास नवीन व्यवसाय सुरू होतील. हा अर्थातच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आविष्कार असेल. यातील सुमारे पन्नास टक्क्यांपेक्षाही जास्त व्यवसाय एकटा चीन कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जोरावर बळकावणार आहे.

अमेरिकेसारख्या देशालाही याची धास्ती वाटते, याचे कारण ते निर्माण करणार असलेला व्यवसाय चीनच्या निम्माही नसेल. उरलेला व्यवसाय सर्व जगात वाटला जाईल. मग यात भारत कोठे आहे, हा विचार करायला नको का? आपण त्याच्या एक दशांशसुद्धा नसणार. फक्त पाकिस्तानशी तुलना करून आपल्या सध्याच्या प्रगतीवर खूश होऊन उड्या मारत राहायचे का? त्यामुळे वास्तव लक्षात घेऊन आपण विचार केला पाहिजे.

भारताकडे मनुष्यशक्ती, अभियंते, स्थिर सरकार, पायाभूत सुविधा वगैरे सर्व गोष्टी आहेत. मात्र, केवळ तेवढेच पुरेसे नाही. यात सर्व राजकीय पक्षांनी आणि उद्योजकांनी एकत्र येऊन देश हितातून धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक आहेत. त्यामुळेच आपल्याला ‘ग्लोबल टू लोकल'' विचार करावाच लागेल.

आपण सर्वजण व्यावसायिक आहोत. त्यामुळे आसपास काय घडत आहे, काय घडणार आहे याबाबत सजग असले पाहिजे. त्यासाठी तयारीही केली पाहिजे. एक गोष्ट निश्चितच ध्यानात घेणे आवश्यक आहे, ती म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे मोठ्या प्रमाणावर बदल घडणार आहेत. त्यामुळेच आपण सर्वांगीण पातळीवर याबाबत एकत्रपणे अधिक जागरूकतेने विचार करणे गरजेचे आहे.

आपल्यापैकी बहुतांश जणांनी अनेक समस्यांना सामोरे जात असताना त्यावर यशस्वीपणे मात केली आहे. त्यामुळे आपल्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता हे नवीन आव्हान आहे. त्याचा आपल्या व्यवसायावर काय परिणाम होणार आणि जागतिक पातळीवर तो कसा परावर्तित होणार, याचा जरूर अभ्यास करावा. जागतिक पातळीवर परिणाम आपण पाहूच; परंतु भारतीय स्तरावर काय परिणाम होणार हे पाहणे महत्त्वपूर्ण ठरेल.

आपण ‘ट्रिलियन’ची भाषा करत आहोत, अशा परिस्थितीत आपले बलस्थान काय आहे, हेही समजून घ्यावे लागेल. आपण आत्ता दुबईत आहोत, विकासाचा दृष्टिकोन आणि दूरदृष्टी असल्यास वाळवंटाचे स्वर्गनगरीत कसे रूपांतर होते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे दुबई. मी गेल्या ३०-३५ वर्षांपासून दुबईत येत आहे. दूरदृष्टी असल्यास काय बदल होऊ शकतो, हे आपण आता पाहात आहोत.

व्यावसायिक म्हणून विचार करताना, गुंतवणुकीसाठी हा सुरक्षित देश असल्याचे लक्षात येते. भारतालाही यापासून शिकण्याची खूप मोठी संधी आहे. आता महत्त्वाची गोष्ट स्थानिक पातळीवर बोलूयात. याबाबतीत आपण व्यक्ती आणि सामुदायिक बाबतीत काय योगदान देतो हे तितकेच महत्त्वाचे आहे.

आमच्या बाबतीत म्हटले, तर माझे मूळ गाव असलेल्या बारामतीमधील ‘ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट’च्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने गेली तीन वर्षे काम सुरू आहे. कृषी क्षेत्रात जागतिक पातळीवर दिशादर्शक ठरेल असा महत्त्वाकांक्षी प्रकल्प यशस्वीपणे उभा राहिला आहे. यामध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठ, बिल गेट्स फाउंडेशन आणि मायक्रोसॉफ्ट यांचा सक्रिय सहभाग घेतला गेला आहे.

यातून आम्ही अशा पद्धतीने तंत्रज्ञान विकसित केले, की त्याच्या वापराने जगभरात कोठेही शेतीच्या उत्पन्नात किमान चाळीस टक्के वाढ होईल आणि पाणी व खतांचा वापर कमी होऊन त्याद्वारे खर्चात सुमारे २० टक्के कपात होणार आहे. त्याची प्रात्याक्षिकेही दाखवली आहेत.

कारण प्रत्यक्ष प्रात्यक्षिक पाहिल्याशिवाय कोणीही शेतकरी त्यावर विश्वास ठेवत नाही. अर्थात, ते स्वाभाविकच आहे. चांगले उदाहरण द्यायचे असल्यास ठिबक सिंचन योजनेचे देता येईल. जोपर्यंत प्रात्यक्षिक पाहिले नाही, त्याचा फायदा दाखविला नाही तो पर्यंत शेतकऱ्यांनी त्याचा वापर केला नाही.

हाच प्रयोग तंत्रज्ञानाचा वापर करून दुग्ध उत्पादनातही केला. बारामतीत केलेला कृत्रिम बुद्धिमत्तेचा हा प्रयोग फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर देश आणि जागतिक पातळीवर प्रात्याक्षिकासह घेऊन जाण्याची आवश्यकता आहे. यासाठी सर्वांनी सहकार्य करावे अशी विनंती आहे. मी तुम्हाला खात्रीने सांगतो, आम्ही प्रयोग करत असलेले तंत्रज्ञान संपूर्ण जगासाठी उपयुक्त आहे. आम्ही यासाठी ‘ग्लोबल पेटंट’ घेत आहोत.

आम्ही शेणापासून फॉस्फरसयुक्त नैसर्गिक खत तयार करत आहोत. हे शेतीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. अशी विविध तंत्रज्ञाने बारामती आणि भारतामध्ये विकसित होत आहेत, कदाचित याची आपल्याला कल्पना नसावी. आपल्याला त्याबद्दल जगासमोर मांडणी करायला पाहिजे.

मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या मदतीने आम्ही जर्मन तंत्रज्ञान, कंपन्या महाराष्ट्रात आणत आहोत. त्याठिकाणी पुरेसे मनुष्यबळ नाही, त्याचा फायदा आम्ही घेत आहोत. पुणे परिसरात १५ कंपन्यांनी येण्याचे मान्य केले आहे. महाराष्ट्रासह सर्व देशाला ही चांगली संधी आहे. भारतात चांगल्या दर्जाचे आणि युवा मनुष्यबळ उपलब्ध आहे. त्यासाठी आपल्या समाजाला आणि विशेष युवकांना आत्मविश्वास देण्याची आवश्यकता आहे.

यापुढे जाऊन मला एक मुद्दा मांडायचा आहे. समाजातली गरजू, गरीब मात्र बुद्धिमान अशा हजारो तरुणांना उत्तम शिक्षण, कौशल्य विकासाची गरज आहे. यासाठी पुण्यातील विद्यार्थी सहायक समितीच्या माध्यमातून आज हजारो विद्यार्थ्यांना साहाय्य करत आहोत. या विद्यार्थ्यांची केवळ शैक्षणिक आणि निवासाचीच व्यवस्था करत नाहीत, तर उत्तम नागरिक होण्यासाठीही संस्कार तिथे केले जातात.

थोडक्यात, देशासाठी एक सुजाण पिढी घडविण्यासाठी आम्ही योगदान देत आहोत. हे काम समजून घेऊन या कामातही आपण मदत करावी. विद्यार्थ्यांना रोजगार देण्याबरोबरच त्यांना रोजगारक्षम करण्यासाठी आपणा सर्वांची आवश्यकता आहे. यासाठी आपण मार्गदर्शक म्हणून पाठीशी उभे राहावे. अशा सर्वांगीण प्रयत्नातूनच (जागतिक ते स्थानिक) भारत सुजलाम सुफलाम होईल, अशी आशा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

USA vs PAK : युएसएने इतिहास रचला! मुंबईकर नेत्रावळकरची सुपर ओव्हरमध्ये सुपर बॉलिंग, पाकिस्तानचा पराभव

Ajit Pawar on Baramati Result: "बारामतीत मी कमी पडलो हे निर्विवाद सत्य"; अजित पवारांची जाहीर कबुली

USA vs PAK : युएसएने पाकिस्तानचा निम्मा संघ शंभरच्या आत गुंडाळला; आफ्रिदीनं पार करून दिला 150 धावांचा टप्पा

Shooting World Cup : सरबज्योत सिंगचा सुवर्णवेध; जागतिक नेमबाजी स्पर्धेत बाजी

मोहोळच्या ज्येष्ठ नागरिकाला सोलापूरच्या रिक्षावाल्याने लुटले! कोंडीच्या पेट्रोल पंपावर नेऊन ‘फोन-पे’वरून काढले १.५ लाख रूपये

SCROLL FOR NEXT