White-Hair 
happening-news-india

सर्च-रिसर्च : तणावग्रस्त मन, पांढरे केस!

राहुल गोखले

‘हे केस काही उन्हात पांढरे झालेले नाहीत,’ अशी विधाने अनुभवी आणि पोक्त मंडळींकडून ऐकायला मिळतात. केस पांढरे होण्याचा संबंध खरोखरच अनुभवांशी असतो काय? याला थेट उत्तर नाही. परंतु, हार्वर्ड विद्यापीठातील संशोधकांनी उंदरांवर केलेल्या प्रयोगांवरून मानसिक ताण आणि केस पांढरे होणे यांचा संबंध आहे, असे आढळले. मूलपेशी आणि पुनरुत्पादक जैवशास्त्राचे संशोधक या चाई त्सु यांच्या गटाने हे संशोधन केले. वास्तविक, मानसिक ताणाचा परिणाम हा सर्व शरीरावरच होत असतो आणि त्यामुळे शरीरातील नेमकी कोणती यंत्रणा ताणामुळे केसांचा रंग बदलण्यास कारणीभूत असते याचा पडताळा करणे आवश्‍यक होते. केसांना रंग प्रदान करतात ती मेलॅनोझोम्स नावाची रंगद्रव्ये आणि ती तयार करतात मेलॅनोसाईट्‌स या पेशी.

केसांच्या मुळाशी या पेशी असतात आणि केसांचा रंग कोणता असणार हे त्या पेशी ठरवितात. मानसिक ताणामुळे केसांना रंगद्रव्ये पुरविणाऱ्या पेशींवर रोगप्रतिकारक हल्ला होतो असा कयास होता. त्यासाठी संशोधकांनी उंदरांना मिरचीसदृश पदार्थाच्या सान्निध्यात ठेवले ज्याने क्षोभ होतो; पण ज्या उंदरांमध्ये रोगप्रतिकारकशक्तीला कारणीभूत पेशी नव्हत्या त्यांचे केसही पांढरे झाले. तेव्हा मग कॉर्टिसॉल या संप्रेरकाकडे संशोधक वळले. तणावाच्या प्रसंगी शरीरात या संप्रेरकाचे प्रमाण वाढते. मात्र ज्या अड्रेनल ग्रंथी या संप्रेरकाच्या निर्मितीस जबाबदार असतात, त्या ग्रंथी ज्या उंदरांमधून काढून टाकण्यात आल्या, त्याही उंदरांमध्ये केस पांढरे झाल्याचे आढळले. तेव्हा या दोन्ही शक्‍यता मावळल्या.

अखेर संशोधकांनी सिम्पथेटिक नर्व्ह सिस्टिमवर लक्ष केंद्रित केले. ही यंत्रणा तणावाच्या वेळी कोणता प्रतिसाद द्यायचा हे ठरविते. म्हणजे पळून जायचे की प्रतिकार करायचा हे ही यंत्रणा ठरविते. केश बीजकोषात मज्जातंतू असतात आणि तणावाच्या प्रसंगी हे मज्जातंतू नॉरपेनिफ्रिनचा स्राव करतात आणि हे रसायन मूलपेशींना प्रमाणाबाहेर सक्रिय करतात. वस्तुतः केसांना रंग प्रदान करणाऱ्या रंगद्रव्यांचा साठा म्हणून या मूलपेशी काम करतात; मात्र प्रमाणाबाहेर सक्रिय झाल्याने त्या पेशींचे रूपांतर रंगद्रव्य निर्माण करणाऱ्या पेशीमध्ये वेगाने होते आणि परिणामतः पुढची रंगद्रव्यनिर्मिती खुंटते.

थोडक्‍यात केसांना रंग प्रदान करणाऱ्या मेलॅनोझोम्सचा पुरवठा थांबतो आणि केस पांढरे होतात- म्हणजेच त्यात रंगद्रव्यांचा अभाव असतो.

या प्रयोगांतून असे आढळले की टोकाचा ताण होता, तेव्हा मेलॅनोसाईट्‌स पेशींचा साठा पाच दिवसांत संपुष्टात आला. मानवावर थेट प्रयोग झालेले नसले तरी मानवी मेलॅनोसाईट्‌स पेशींवर काचपात्रांमध्ये झालेल्या प्रयोगांतून तसेच निरीक्षण नोंदविले गेले. तेव्हा केस पांढरे होण्याचा संबंध ताणाशी आहेच; पण तो शरीरात निर्माण होणाऱ्या नेमक्‍या कोणत्या रसायनाशी आहे आणि कसा आहे यावर या संशोधकांनी प्रकाश टाकला आहे. केस पांढरे होण्याची प्रक्रिया कशी रोखता येईल, यावरही त्यांनी अभ्यास केला आणि मूलपेशींची प्रमाणाबाहेरील वाढ रोखणे किंवा नॉरपेनिफ्रिनचा स्राव रोखणे या दोन्ही प्रकारे ही प्रक्रिया थांबविता येते असे त्यांनी सिद्ध केले.

अर्थात केस पांढरे होण्याचा संबंध जनुके, आहार अशा घटकांशीही असतो आणि २०१८ मधील प्रयोगांतून संशोधकांनी असे सिद्ध केले होते, की जे उंदीर पाश्‍चात्य आहारावर म्हणजेच जास्त चरबीयुक्त पदार्थांच्या आहारावर होते, त्या उंदरांचे केस लवकर पांढरे झाले. तेव्हा केस पिकण्याचा संबंध अनेक घटकांशी आहे; पण तो ताणाशीही आहे आणि केसांच्या रंगावर जसा तणावाचा परिणाम होतो, तसाच तो अन्य अवयवांवर कसा होऊ शकतो, याचा वेध घेण्यासही हे संशोधन उपयुक्त ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : कात्रज उद्यानातील ऑनलाईन बुकिंगला प्रतिसाद; दोन वर्षांत ५ लाख ४४ हजार ६३ पर्यटकांकडून ऑनलाईन बुकिंग!

Oral Cancer Risk Prediction: जनुकांद्वारे समजेल कुणाला तोंडाच्या कर्करोगाचा धाेका; टाटा मेमोरियल सेंटर व ‘अ‍ॅक्ट्रेक’चे संशोधन

Khadakwasla Theft : खडकवासला सोसायटीतील चार बंद सदनिका फोडल्या; ४ अज्ञात चोरट्यांकडून सुमारे दीड लाखांचा ऐवज लंपास!

Municipal Employee Pay : समाविष्ट गावांतील कर्मचाऱ्यांचे वेतन कपात आणि पदावनती; आयुक्तांनी पुनर्विचार आदेश दिला!

Latest Marathi News Live Update : बीड शहरातील शाहूनगर भागात दगडफेक

SCROLL FOR NEXT