impact of mahatma gandhi thought significance history gandhi jayanti 2024 sakal
संपादकीय

गांधीजींचा वैश्विक प्रभाव

जागतिक स्तरावर गांधीजींचा ठसा आणि प्रभाव अगदी अलीकडच्या कालखंडातही कमी झालेला नाही. गांधीजींनी अहिंसा, शांततेची आणि सत्याची जी भूमिका घेतली, तो आज साऱ्या जगापुढे आदर्श आहे.

अरुण खोरे

जागतिक स्तरावर गांधीजींचा ठसा आणि प्रभाव अगदी अलीकडच्या कालखंडातही कमी झालेला नाही. गांधीजींनी अहिंसा, शांततेची आणि सत्याची जी भूमिका घेतली, तो आज साऱ्या जगापुढे आदर्श आहे.

पोलंडमधील लेक वालेसा यांच्या नेतृत्वाखालील सॉलिडॅरिटी या संघटनेचे (१९८० च्या दशकातील) आंदोलन चिरडण्यासाठी रशियन लष्कर तेथील सरकारच्या मदतीला होते. आंदोलनकर्ते रॉकेलबॉम्ब किंवा सुतळीबॉम्ब या लष्कर किंवा पोलिसांवर फेकत असत. त्यानंतर मग पोलीस गोळीबारच करायचे.

परिणामी कामगारांपैकी काहींचे मृत्यू झालेले असायचे. या सगळ्या आंदोलनात घरातला कर्ता पुरुष मरतो आहे, बळी जातो आहे, हे जसजसे दिसू लागले तसे अनेक महिलांनी चिंता व्यक्त करायला सुरुवात केली. संघटनेची बैठक झाली आणि त्यात आपण काय करायचे अशा विषय समोर आला. त्यावेळी या महिलांनी आमच्या घरातील एकेक माणूस जात असेल तर कसे होणार, असा प्रश्न उपस्थित केला. यावेळी लेक वालेसांच्या मदतीला आले गांधीजी!

आपण रॉकेलबॉम्ब फेकायचे नाहीत, दगडफेक करायची नाही. शांतपणे रस्ता अडवायचा, आंदोलन शांततेने करायचे,असा निर्णय घेण्यात आला. यानंतर रशियन लष्कर किंवा स्थानिक पोलीस यांना या शांतपणे आंदोलन करणाऱ्या कामगार कार्यकर्त्यांवर गोळीबार करणे अशक्य झाले.

यानंतर मग वाटाघाटींना सुरुवात झाली आणि आंदोलनाचा पुढील टप्पा गाठला गेला, असा अनुभव वालेसा यांनी आपल्याला सांगितल्याची माहिती काही महिन्यांपूर्वी गांधीजींचे पणतू तुषार गांधी यांनी एका लेखात नोंदवली होती.

गांधीजींनी अहिंसा, शांततेची आणि सत्याची जी भूमिका घेतली तो आज साऱ्या जगापुढे आदर्श आहे. व्यापक अर्थाने गांधीविचारांचा हा ‘ग्लोबल स्पर्श’ आहे. अमेरिकेतील अनेक विद्यापीठात आज गांधीजींच्या सत्याग्रही आणि अहिंसक विचारांच्या संदर्भात अध्यासने संशोधन करत आहेत.

जर्मनीमध्ये गांधीजींच्या १२५ व्या जयंतीनिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेतील पहिला निबंध आठवीतल्या मुलीचा होता. तिने लिहिले होते, "जर माझ्या मित्राला गांधीजींचे सत्याचे प्रयोग, हे पुस्तक लवकर वाचायला मिळाले असते, तर त्याने आपल्या मित्राचा खून केला नसता!"

निबंधस्पर्धेतील या सर्व विद्यार्थ्यांना गांधीजींचे `माझे सत्याचे प्रयोग’, हे आत्मचरित्र संदर्भासाठी देण्यात आलेले होते. आजही हे आत्मचरित्र वाचताना त्याची प्रस्तुतता लक्षात येते. दक्षिण आफ्रिकेच्या दीर्घ वास्तव्यात गांधीजींचा जागतिक स्तरावरील विचारवंत आणि लेखक यांचा काही एक संवाद सुरू होता.

जॉन रस्किन यांचे ''अन टू धी लास्ट'', हे पुस्तक त्यांनी दक्षिण आफ्रिकेतील रेल्वे प्रवासात वाचले आणि ते विलक्षण प्रभावित झाले. हे पुस्तक वाचल्यानंतर आदल्या दिवशीचा मोहनदास गांधी दुसऱ्या दिवशी बदलला ,असे त्यांनी म्हटले आहे.

विख्यात रशियन लेखक लिओ टॉलस्टॉय यांचा प्रभाव त्यांच्यावर पडला होता. ''द किंगडम ऑफ गाॅड इज विदीन यू '', या ग्रंथाने ते भारावून गेले होते. याखेरीज टॉलस्टॉय यांच्याशी त्यांचा पत्रव्यवहारही सुरू होता.तो वाचताना एक गोष्ट लक्षात येते आणि ती म्हणजे ८० ओलांडलेले टॉलस्टॉय या तरुण भारतीय माणसाचे मुद्दे आणि विचार आस्थेने समजावून घेत होते. आफ्रिकेतील वास्तव्यात त्यांनी ‘टॉलस्टॉय फार्म’ची उभारणी केली.

वैचारिक ऋणानुबंध

हेन्री डेव्हिड थोरो याच्या विचारांनीही गांधीजी भारावले होते आणि त्यांनी त्याचा अभ्यास केला होता. थोरोच्या सविनय कायदेभंगाचा विचार असलेले त्याचे लेखन गांधीजींनी अभ्यासले होते आणि गांधीजींच्या एकूण आंदोलनात हा विचार मूलभूत होता.

गांधीजींचा जागतिक संदर्भ समजून घेताना युरोप, आफ्रिका, अमेरिका, रशिया आणि अर्थातच आशिया या सर्व भूखंडातील महापुरुषांचा वैचारिक ऋणानुबंध त्यांच्याशी जोडलेला होता. रशियातील टॉलस्टॉय, अमेरिकेतील थोरो आणि ब्रिटनमधील विचारवंत जॉन रस्किन या सर्वांच्या वैचारिक परिपोषाचा आधार गांधीजींच्या सत्याग्रहांना लाभला होता.

महाकवी रवींद्रनाथ टागोर आणि फ्रेंच भाषेतील विचारवंत व लेखक रोमा रोलाॅ, हेही नोबेलविजेते! या दोघांचा गांधींवर प्रचंड विश्वास होता. अमेरिकेतील नागरी हक्क चळवळीचे प्रणेते डॉ. ल्युथर किंग यांच्यावर गांधीजींच्या सत्याग्रहाच्या तंत्राचा आणि विचारांचा प्रभाव पडला.

दक्षिण आफ्रिकेच्या वर्णद्वेषी राजवटीविरुद्ध लढा उभा करणारे नेल्सन मंडेला यांनीही गांधीजींकडून प्रेरणा घेतली होती. गांधीजींनी जी ‘नाताळ इंडियन काँग्रेस’ दक्षिण आफ्रिकेच्या वास्तव्यात स्थापन केली होती, त्याच संघटनेचे काम बऱ्याच वर्षांनी मंडेला यांनी सुरू केले. त्या माध्यमातून राजकीय हक्क मिळवून वर्णद्वेषी राजवटीला पायउतार व्हावे लागले.

डॉ. किंग यांनी लिहिले आहे : "एका रविवारी दुपारी मी फिलाडेल्फियाकडे निघालो होतो. हार्वर्ड विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. जॉन्सन यांचे भाषण मला ऐकायचे होते. त्यांनी नुकतीच भारताला भेट दिली होती आणि त्यामुळे त्यांच्या भाषणात गांधींचे चरित्र आणि गांधींची शिकवण यांचा तपशीलवार उल्लेख आला. माझा त्याच्यावर विलक्षण परिणाम झाला.

मी तेथून निघालो आणि गांधीजींच्या चरित्रावरील काही पुस्तके विकत घेतली. " मी खरे म्हणजे गांधीजींचे नाव त्यापूर्वी ऐकले होते, पण मी फार गंभीरपणे वाचलेले नव्हते. जेव्हा गांधी वाचायला सुरुवात केली त्यानंतर मात्र त्यांच्या आयुष्यातील सविनय कायदेभंगाच्या चळवळीने मी प्रभावित झालो.विशेषतः मिठाच्या सत्याग्रहाचा त्यांचा लढा मला फारच वेगळा वाटला. पुढे याच विचारांचा अवलंब करत आंदोलने सुरू केली..."

अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा त्यांच्या कारकिर्दीत भारताला भेट देण्यासाठी आले होते. त्यावेळी भारताच्या संसदेत भाषण करताना त्यांनी अधोरेखित करून सांगितले की, गांधीजी नसते तर मी या पदावर येऊ शकलो नसतो! गांधीजींचा हा जागतिक स्पर्श समजून घेताना, आज देशातील वातावरण आणि खुद्द गांधीजींच्या विचारांना विषारी विरोध करण्याची भूमिका घेणारे आणि तसे वर्तन करणारे अनेक अतिरेकी समाजकंटक, या सर्वांना कोण आवरणार हाच प्रश्न आहे!

दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आपल्या मुलांना, विद्यार्थ्यांना गांधीजींच्या विचारांचे संचित आपण द्यायला उणे पडत आहोत. साधेपणातला आनंद, समतेची शिकवण, सत्याचा आग्रह धरणारा त्यांचा निर्धार, अन्यायाविरुद्ध उभे राहणारी त्यांची निर्भयता,

जातिभेद, धर्मभेद व देशाच्या भिंती ओलांडून मानवतेला त्यांनी घातलेली साद हे आपण विसरलो आहोत का? गांधीजयंतीच्या निमित्ताने या प्रश्नांची उत्तरे काही प्रमाणात शोधण्याचा आपण प्रयत्न केला तरी कदाचित गांधींचे नवे दर्शन आपल्याला होईल.( लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : मूक आक्रंदनाचा वारसा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 4 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : कोल्हापुरात पंचगंगेच्या पातळीत एक फुटाने वाढ, ५० बंधारे पाण्याखाली

ढिंग टांग : वाजत गाजत या...!

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

SCROLL FOR NEXT