- डॉ. नवनाथ रासकर
भारतीय तत्त्वज्ञानाचा उगम प्रामुख्याने उपनिषदांत आहे. हे सर्व जग अखंड, अविनाशी आणि अविकारी अशा ब्रह्मतत्त्वाच्या अधिष्ठानावर प्रतिष्ठित आहे. जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय त्याच्याच ठिकाणी होत असते.
तेच एक सत्य असून जगातील सर्व व्यक्ती, वस्तू व घटना सर्व त्याचीच रूपे होत. खरे तर ती सर्व मुळात ब्रह्मच आहेत. ‘सर्व खल्विदं ब्रह्म’ तेच सर्वकाही आहे. ते निरपेक्ष आणि सर्वव्यापी सत्य आहे. भारतीय मन याच विचारावर पोसले आहे.
‘वसुधैव कुटुंबकम्’ ही या मनाची देन आहे, अशी धारणा उपनिषदांच्या विचारातून घडते. सत्याच्या आधारशिलेवर जगातील सर्व व्यवहार चालतात, ही त्यांची शिकवण होती. म्हणून हा संस्कार भारतीय मनावर कायम कोरला गेला व संक्रमित झाला.
त्यामुळेच भारतीय विचारात भेदापेक्षा समावेशकता अधिक राहिली आहे. सत्याकडे असंख्य दृष्टीने पाहता येते, ते असंख्य रीतीने दिसते आणि भावते तसेच आकळते. सत्याची अनंतता विविधतेतून प्रकट होत असते.
त्यामुळे आपल्यापेक्षा ज्यांचे दृष्टिकोन भिन्न असतात त्यांच्याकडे सहानुभूतीने पहायला हवे व त्याच दृष्टीने नि:पक्षपणे त्यांना समजून घेतले पाहिजे. या पद्धतीने त्यांच्यातील सत्यांश लक्षात घेऊन त्याचा स्वीकार केला पाहिजे; पण तेच सत्य आहे असे समजणे मात्र चूक आहे.
कारण अतिरंजित सत्य असत्य बनत असते. हे लक्षात घेतल्यास व त्याचबरोबर सत्य सर्वव्यापक, समावेशक आणि अनंत असते, याचे भान ठेवल्यास आपण सर्व मतांना-विचारांना समजून घेऊ शकतो आणि त्यांचा आदरही करू शकतो. ही मनोवृत्ती व्यापक दृष्टिकोनातून तयार होत असते. हा संस्कार भारतीय मनावर उपनिषदांनी केला आहे .
सत्य एकच व सर्वव्यापक असून, त्याच्या दृढ पायावर विविधता प्रकट होत असते. ही मूलभूत कल्पना भारतातील अनेक संप्रदाय, धर्म, तत्त्वज्ञान, संस्कृती आणि जाती-जमाती यांच्यातील परस्पर आदराला म्हणजेच ‘अनेकषु एकम’ अनेकात एकत्व पाहायला शिकवणारी ठरली आहे. उपनिषदांची शिकवण मूलतः आदर्शवादी आहे.
अंतिम सत्ता ब्रह्म असून ती सच्चिदानंद स्वरूप आहे, असे ब्रह्म समजून घेऊन त्याची अनुभूती घेतली, तर माणसाला शुद्ध स्वरूपाचा दिव्य आनंद वाट्याला येऊ शकतो. याचा अर्थ हे ब्रह्म आपल्या रोजच्या व्यवहारात नाही असे नाही, ते सर्वत्र आहे.
अन्नाला म्हणजेच भौतिक जगाला तुच्छ समजू नका असे उपनिषदे सांगतात. अशा तऱ्हेने सर्व एकाच ब्रह्माला-आत्म्याला पाहणारी उपनिषदे समस्त जीवनाकडे मांगल्याच्या भावनेने पाहतात आणि तेच शिकवतात.
अशा आनंदमय स्वरूप ब्रह्माचा अनुभव सहज प्राप्त होत नाही. त्यासाठी तप करावे लागते. तप म्हणजे अथक प्रयत्नांनी ते प्राप्त होत असते. ते एक ना एक दिवस आपल्या अनुभवाला येईल, ही दृढ आशा आणि त्या अनुषंगाने श्रद्धा बाळगली तर आत्मप्राप्ती होईल, असे उपनिषदे उच्चरवाने सांगतात.
‘सत्यमेव जयते’ हा विचार मनाच्या गाभाऱ्यात कायम स्फुल्लित ठेवला तर आत्मप्राप्ती होईल, असेही ती ठामपणे सांगतात. तपाने सर्व साध्य होते म्हणजे अविरतपणे प्रयत्न करीत राहिल्यास उच्च ध्येय प्राप्त होते. ‘नायमात्मा बलहिनेन लभ्य:’ असे ती सांगतात, ते यामुळेच.
तप म्हणजे रानावनात जाणे नव्हे, तर सायासपूर्वक जीवनातील इच्छित ध्येयाचा पाठपुरावा करीत राहणे असते. उपनिषदांच्या जीवनदृष्टीचा परिघ व्यापक आहे. या परिघात पूर्णत्वाचे ध्येय सामावले आहे. हेच मानवाचे सर्वोच्च ध्येय आहे. माणसाने कसे जगावे आणि कोणते ध्येय उरी बाळगावे हे ती सांगतात. माणूस हा केवळ भाकरीवर जगणारा आणि क्षुल्लक असा प्राणी नाही, म्हणूनच त्याचे ध्येय त्याच्या तोलामोलाचे आहे, हे उपनिषदांचे म्हणणे चिंतनीय आणि वंदनीय आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.