लिखित भाषेत देवनागरी लिपी, प्रमाणीकृत वर्णमाला, जोडाक्षर लेखन इत्यादींचा योग्य वापर करण्याबाबत महाराष्ट्र शासनाने ६ नोव्हेंबर २००९ रोजी शासन आदेशाद्वारे निर्देश दिले होते.
- माधव राजगुरू
ज्ञानभाषा आणि लोकभाषा एक होतील तेव्हाच मराठी टिकेल, अशी भूमिका महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी मांडली होती. तथापि शासनाच्या मराठी प्रमाणलेखन निश्चितीकरण समितीने लेखन सुकर करण्याऐवजी त्यात क्लिष्टता आणि जटिलता आणली आहे.
लिखित भाषेत देवनागरी लिपी, प्रमाणीकृत वर्णमाला, जोडाक्षर लेखन इत्यादींचा योग्य वापर करण्याबाबत महाराष्ट्र शासनाने ६ नोव्हेंबर २००९ रोजी शासन आदेशाद्वारे निर्देश दिले होते; परंतु जोडाक्षर लेखन आणि वर्णमाला यामध्ये काही मूलभूत स्वरूपाच्या त्रुटी असल्यामुळे शालेय स्तरावरील शिक्षक, विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांना लेखनात अडचणी येत होत्या. शिवाय, वर्णमालेत नव्याने समाविष्ट स्वर लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करणारे होते. या सर्व गोष्टींचा अभ्यास करून त्यांचा उहापोह करणारे दोन लेख मी ‘सकाळ’मध्ये (१८ सप्टेंबर २०११ आणि ६ मे २०१२) रोजी लिहिले होते.
अखेर शासनाने उपरोक्त शासन निर्णयात सुधारणा करण्यासाठी २९ सप्टेंबर २०२१रोजी प्रमाणलेखन निश्चितीकरण समिती स्थापन केली. त्याचा मीही सदस्य होतो. समितीच्या काही बैठकांमध्ये सर्वसामान्यांच्या शिक्षक-विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून लेखनातल्या अडचणी आणि करावयाच्या सुधारणा याबाबतची माझी भूमिका लिखित स्वरूपात मांडली. ती काही सदस्यांना मान्य असली तरी काही संस्कृतप्रेमी सदस्यांनी माझे मुद्दे डावलून स्वतःचे मुद्दे रेटून नेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, २२ फेब्रुवारी २०२२ रोजी ‘बिघडलेली बाराखडी’ या शीर्षकाखाली आणखी एक लेख मी ‘सकाळ’मध्ये लिहिला, त्यामुळे मला समितीच्या नंतरच्या बैठकांसाठी बोलावले नाही. तरीही मी पत्र पाठवून माझे मुद्दे विचारात घ्यावेत, असे शासनाच्या मराठी भाषा विभागाला कळवले होते.
ज्ञानभाषा आणि लोकभाषा एक होतील, तेव्हाच मराठी भाषा टिकेल, अशी भूमिका महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी मांडली होती. त्यानुसार प्रमाणभाषा ही लोकभाषेशी मिळती-जुळती असायला हवी. शासनाच्या मराठी प्रमाणलेखन निश्चितीकरण समितीमध्ये या दृष्टिकोनातून काम झालेले नाही. सर्वसामान्यांना लेखन सुकर व्हावे, यासाठी समितीत सुलभीकरणाचे काम अपेक्षित असताना तेथे काही सोप्या गोष्टींमध्ये क्लिष्टता आणि जटिलता आणली आहे. मराठीकरण जपण्याऐवजी मराठी भाषा संस्कृतच्या जोखडात कायमची जखडून ठेवण्याचा प्रयत्न झाला आहे. उदाहरणार्थ शासन निर्णयातील पुढील मुद्दे सांगता येतील.
१) जोडाक्षर लेखनात क्+त्+य यांचे लेखन ‘क्त्य'' असे सोपे करणे शक्य आणि रूढ असताना ते ‘त्त्य’ अशा कठीण पद्धतीने जोडून दाखवले आहे. ‘तक्त्यात’ हा शब्द लिहायला आणि उच्चारायला सुलभ वाटतो, तसा ‘तत्त्यात’ हा शब्द वाचताना आपण थबकतो, त्याहून लिहिणे अधिक अवघड आहे; कारण या शब्दातील जोडाक्षरात अक्षराची मूळ रूपे अदृश्य झाली आहेत. यात कोणत्या अक्षराला कोणते अक्षर जोडले आहे हे कळत नाही. ‘क’ आणि ‘त’चे जोडाक्षर ‘त्त्य’ ऐवजी ‘क्त’ असे लिहिणे सोपे आहे. त्+त या जोडाक्षराबाबतही असेच झाले आहे. ‘त्त’ यामध्ये ‘त्''ला ‘त’ जोडले आहे, हे लक्षात येत नाही, ते ‘त्त’ या जोडाक्षरात दिसते.
२) ‘लृ’ हा स्वर संस्कृत भाषेतून आला आहे. या स्वराचे शब्द मराठीत नाहीत. संस्कृत भाषेतही क्लृप्ती, क्लृप्त असे दोनच शब्द आढळतात. या संस्कृत दोन शब्दांसाठीच ‘लृ’ या स्वराचा समावेश मराठी वर्णमालेत करण्यात आला आहे, त्यामुळे हा स्वर मराठी वर्णमालेतून वगळल्याने मराठी भाषेचे काहीही नुकसान होणार नाही; कारण संस्कृत ‘क्लृप्ती’ ऐवजी उच्चारणाला सोपा असा ‘युक्ती’ हा शब्द मराठीच्या वापरात रूढ आहे. यामुळे मराठीची शब्दसंपत्ती कमी होणार नाही.
३) ‘च’ वर्गातील ‘ञ’ या अनुनासिकाचा वापर ‘नञ तत्पुरुष’ या एकमेव शब्दात होतो. अन्यत्र अनुनासिकाऐवजी अनुस्वार देऊन लिहिण्याची पद्धत आहे. उदाहरणार्थ, ‘चञ्चल’ ऐवजी ‘चंचल’, ‘अञ्जली’ ऐवजी ‘अंजली’ इ; म्हणून ‘ञ’ या अनुनासिकाचा वर्णमालेत समावेश नसला, तरी मराठीच्या शब्दसंपत्तीची हानी होणार नाही. ‘ञ’ या अनुनासिकाचा उच्चारही चुकीचा केला जातो.
४) ‘ङ्’ या अनुनासिकाच्या बाबबीतही असेच घडते. या अनुनासिकाचा वापर केवळ ‘वाङ्मय’ शब्दातच होतो. त्याचाही उच्चार नीट केला जात नाही. या एका शब्दासाठी ‘ङ्’ या अनुनासिकाने मराठी वर्णमालेत आपले स्थान बळकट करून ठेवले आहे. आपण या शब्दासाठी ‘साहित्य’ हा पर्यायी शब्द रूढ केला आहे. सध्या कथा, कविता इत्यादीसाठी ‘साहित्य’ हा शब्द प्रचलित असल्यामुळे ‘वाङ्मय’ शब्दाची मराठी भाषेला आवश्यकता नाही. अभ्यासकांनी तो संस्कृत भाषेत अभ्यासावा. थोडक्यात, मराठी वर्णमालेतून ‘ङ्’ हे अनुनासिक वगळण्यास हरकत नाही.
५) छ्, ट्, ठ्, ड्, ढ्, द्, ल्, ह्, ळ् ही सर्व शीर्षदंड असणारी व्यंजने आहेत. शासन निर्णयात यापैकी ट्, ठ्, ड्, ढ् आणि ह् या पाच व्यंजनांपुढे ‘य’ जोडताना पाऊण य ( ç ) चा वापर करून ट्य, ठ्य, ड्य, ढ्य, ह्य असे लिहायला सांगितले आहे; परंतु शीर्षदंड असलेल्या छ्, द्, ल् आणि ळ् या व्यंजनांनासुद्धा पाऊण य (----) जोडून छ्य , द्य, ळ्य असे लिहिणे सोपे असताना इथे तसे लिहू नये, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. हे तर्कसंगत वाटत नाही; कारण द् व्यंजनापुढे य जोडताना पाऊण य जोडून ‘द्य’ असे लिहायला सांगितले आहे, त्याऐवजी ‘द्य’ असे लिहिणे सोपे आहे.
६) ल/c, श/Ìa या अक्षरांच्या दृश्यरूपाबाबतचा समितीचा निर्णय आश्चर्यकारक आहे. १९६६च्या शासननिर्णयान्वये ‘ल’ ऐवजी ‘c'' आणि "श'' ऐवजी ‘Ìa’ ही अक्षररूपे वापरण्यामागे तर्कसंगत भूमिका होती. जोडाक्षर लेखनातील सुकरता हा निकष पटणारा होता. ‘ल’ ऐवजी ‘c’ वापरल्यामुळे त्यापुढे कोणतेही अक्षर जोडताना केवळ अन्त्य दंड काढले की भागत असे. आताच्या शासन निर्णयात हा मुद्दा भाषिक अस्मितेशी जोडला आहे. "c'' हा एक पाकळीचा "c'' हिंदीचा आहे, म्हणून तो स्वीकारायचा नाही, ही समितीची भूमिका भाषाद्वेष निर्माण करणारी आहे. १९६६च्या शासननिर्णयातील ‘श’बाबतची भूमिका पटणारी होती. शेंडीवाला "Ìa'' लिहिताना "Ìa''मधील शीर्षदंड चुकून राहिला, तर "Ìa''चे "रा'' होण्याची शक्यता होती; म्हणून गाठीचा "श'' सुचवला होता. ‘ल’ आणि ‘Ìa’चा अट्टहास केवळ संस्कृतच्या प्रेमातूनच आहे, हेच यातून स्पष्ट होते.
७) ॲ, ऑ स्वरांचे स्वागत आहे; पण या नव्या स्वरांमुळे शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे, तो दूर केला पाहिजे. जुन्या वर्णमालेतील ऋ लृ स्वर वगळून अं, अः या स्वरादीसह प्रत्येक अक्षराची बाराखडी केली जात होती. आता मूळ स्वरांमध्ये ॲ, ऑ या इंग्रजी स्वरांची भर पडली आहे, त्यामुळे पूर्वीच्या बाराखडीप्रमाणे आता क, का, कि, की, कु, कू, के, कॅ, कै, को, कौ, कं, कः अशी चौदाखडी करायची का, असा संभ्रम लोकांच्या मनात आहे. याबाबतीत शासन निर्णयात स्पष्ट निर्देश देऊन हा संभ्रम दूर करायला हवा होता.
ता. १० नोव्हेंबर २०२२२ रोजीच्या शासन निर्णयात अनेक मुद्द्यांचे विस्तृत स्पष्टीकरण दिले आहे, त्यामुळे या शासनिर्णयाची एकूण २८ पृष्ठे भरली आहेत. ६ नोव्हेंबर २००९च्या शासन निर्णयाची १९ पृष्ठे होती. साठ वर्षांपूर्वी १९६२ आणि १९६६ मध्ये दोन शासन निर्णय आले होते. १९६२चा शासन निर्णय दोन पृष्ठांचा, तर १९६६चा शासन निर्णय केवळ एक पृष्ठाचा होता. २०२२च्या शासन निर्णयातील अनेक मुद्दे स्वयंस्पष्ट करण्याचा प्रयत्न झाला असला, तरी वर दर्शवल्याप्रमाणे त्रुटी लक्षणीय आहेत. त्या दूर करण्याबाबत विचार होण्याची गरज आहे. या बरोबर मराठी साहित्य महामंडळाने तयार केलेल्या लेखनविषयक १८ नियमांमध्येही कालानुरूप बदल अपेक्षित आहेत. याबाबत मराठी साहित्य महामंडळाने स्वतःहून पुढाकार घ्यावा, असे सुचवावेसे वाटते.
(लेखक मराठी भाषा अभ्यासक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.