संपादकीय

छान किती दिसते...

मल्हार अरणकल्ले

गर्दीचे दाट थर एकत्र येऊन तयार झालेल्या माणसांच्या-वाहनांच्या भिंती पुढं पुढं सरकणाऱ्या रस्त्यावर त्या इवल्या फुलपाखरानं यावंच कशाला? बहुधा त्याचा रस्ता चुकला असणार; नाही तर असल्या संततधार गर्दीत जीव गुदमरवून घ्यायला ते का आलं असतं? आजूबाजूच्या कोलाहलानं धपापणारे क्षण शरीराभोवती लपेटून ते तिथं मनस्वी भिरभिरत होतं. सेकंदासेकंदाला आरपार लहरत होतं. आपल्या अस्तित्वाच्या नाजूक गोंदणखुणांची नक्षी इथून तिथं घेऊन जात होतं. विस्तारणाऱ्या गंधलाटांनी धूपकांडीची वलयं तुडुंबत जावीत, तशी फुलपाखराभोवतीची नक्षिरेखा आपला रंगीबेरंगी परीघ दूरवर पसरवीत होती. कचेरीची वेळ गाठण्याच्या व्यावहारिक ताणामुळं यांत्रिक माणसांचे समुद्र भरतीनं जणू बेभान झाले होते. त्यांच्या पावलांची चाकं झाली होती; आणि वाहनांच्या चाकांची स्पर्धा गतीशी सुरू होती. 

भरदार गर्दीची झड पेलता पेलता फुलपाखराची कोण पुरेवाट होत होती! वाऱ्याच्या प्रवाहाबरोबर तरंगत जाताना अनेक अडथळ्यांशी ते अडत-धडपडत होतं. गर्दीत दिसलेल्या चिंचोळ्या वाटेनं पुढं निसटत होतं. थकव्याचं ओझं हलकं करण्यासाठी एक-दोन क्षणांपुरतं कुठं कुठं विसावत होतं; आणि लगेचच हवेत सूर मारत होतं. जवळपास दिसता-दिसता, दूर कुठून तरी हलकेच वर उंचावत होतं. पानं-फुलं दिसताच त्यांच्याशी लपाछपी खेळत होतं. फुलांच्या पाकळ्यांवरील तलम रंगांचे पारदर्शक पापुद्रे पंखांनी उचलून घेत होतं. रंगमोहराचं उमलत जाणारं सौंदर्य दिमाखानं मिरवीत होतं. पुष्पपरागांशी टाळ्या पिटताना अंगभर लगडलेले मखमली कण सगळीकडं शिंपत होतं. शब्दांच्या-आवाजांच्या त्या कोसळातही फुलपाखराच्या हालचालींत एक अल्लड मैफल झंकारत होती; आणि निराकारात एक चित्रलिपी आकारत होती. 

रंगनक्षीनं मंतरलेले फुलपाखराचे पंख लहरताना उघडमीट करीत होते. फुलपाखरू कुठं स्थिरावलं, की साखरझोप उतरलेल्या पापण्यांसारखे ते अलगद बंद होत होते. सुईच्या अग्राएवढे डोळे रोखून दिशांचा शोध घेत ते धावत निघालं, की त्याच अग्रबिंदूंत गरुडाची तीक्ष्ण नजर उतरत होती; आणि ते जवळ येऊन स्थिरावलं, की त्याच्या इटुकल्या शरीरावर ती छोटी नेत्रटिंबं शोधूनही सापडत नव्हती. त्याच्या पंखनक्षीची सौंदर्यशोभा नजरेनं उचलून घेताना, तिथल्या रंगांत आणि नाजूक रेषांच्या आकारांत कधी गुंतून गेलो, ते कळेनासं होत होतं. मग फुलपाखराच्या लहरण्याच्या विभ्रमांचे रंगथेंब अलवारपणे मनभर उतरू लागले. फुलपाखराच्या पसरणाऱ्या पंखांचं आभाळ आजूबाजूनं निळावत चाललं; आणि चवथीच्या चंद्रकोरीची सलज्ज नक्षी तिथं खुलत राहिली. 

एवढ्या दाटभोर गर्दीत फुलपाखराचं बिंदुरूप अस्तित्व केवढा निर्मळ आनंद उधळीत असतं! गर्दीत, धावपळीत आपण हे काही पाहत नाही; आणि दिवस मिटून जाताना कसे अगदी आक्रसून-कोमेजून जातो!

काही क्षणांतच फुलपाखरू गर्दीआड हरवलं; पण त्याचे नक्षिरंग नजरेच्या क्षितिजावर पसरत-घरंगळत राहिले; आणि त्यांतून विविधरंगी फुलपाखरं उघडमीट करीत राहिली! 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''त्यांची लायकी नाही.. त्यांना कशाकशातून बाहेर काढलं, याची यादी वाचली तर फिरणं मुश्कील होईल'' पवारांचा धनंजय मुंडेंवर हल्ला

जुगार कंपन्यांकडून भाजपला इलेक्ट्रॉल बॉण्डव्दारे 1400 कोटी; पृथ्वीराज चव्हाण यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल

Jos Buttler IPL 2024 :वर्ल्डकपसाठी इंग्लंड संघाची घोषणा झाली अन् राजस्थानसह अनेक IPL संघांना बसला मोठा झटका

India Squad for T20 WC: केएल राहुलची टी20 कारकीर्द संपुष्टात? 'या' पाच खेळाडूंचीही संधी हुकली

Arvind Kejriwal: केजरीवालांना निवडणुकीपूर्वीच अटक का केली? सुप्रीम कोर्टानं ईडीकडून मागवलं उत्तर

SCROLL FOR NEXT