Drama Sakal
संपादकीय

Theatre Drama:...इथला हर्ष नि शोक हवा!

विनोदी भूमिका साकारण्यासाठी प्रसिद्ध असलेले विशाखा सुभेदार, पॅडी कांबळे, नम्रता संभेराव आणि प्रसाद खांडेकर यांनी वठवलेल्या भूमिकांतून ही आनंदोत्सवाची ‘नॉर्मल डिलिव्हरी’ करण्यात आली आहे.

महेंद्र सुके mahendra.suke@esakal.com

चौथी विंग

आयुष्यात सुख वाट्याला येते, तसे दु:खही असतेच. असे सुख-दु:खाचे सारेच क्षण सेलिब्रेट करत आनंददायी जीवन कसे जगता येते, याची जाणीव करून देणारे नाटक म्हणजे ‘कुर्रर्रर्रर्र’. (Marathi Theatre Drama)

प्रत्येक कुटुंबात वेगवेगळ्या अडचणी असतातच. त्या दूर करण्यासाठी मनावर ताण घेतला तर जगण्यात अडचणी निर्माण करतात. आलेल्या अडचणीचा प्रसंग स्वीकारून, पुढे जायचे ठरवले तर जगण्याचा आनंदोत्सव साजरा करता येतो, हे सांगण्यासाठी रसिकांना हसवत खेळले गेलेले ‘कुर्रर्रर्रर्र’ नाटक. विनोदी भूमिका साकारण्यासाठी प्रसिद्ध असलेले विशाखा सुभेदार, पॅडी कांबळे, नम्रता संभेराव आणि प्रसाद खांडेकर यांनी वठवलेल्या भूमिकांतून ही आनंदोत्सवाची ‘नॉर्मल डिलिव्हरी’ करण्यात आली आहे.

नाटकाची गोष्ट तशी साधी-सोपी आणि सरळ असली तरी, कथेतील वेगवेगळे धक्कातंत्र या नाटकाचा मुख्य धागा आहे. त्याचे विणकाम लेखक-दिग्दर्शक प्रसाद खांडेकर यांनी उत्तम केले आहे. हे धक्कातंत्र प्रेक्षकांना आश्‍चर्यचकित करते, नाटकात गुंतवते आणि रंजन करते.

प्रत्येक प्रसंगात नाटकाची गोष्ट वेगवेगळी वळणे घेत पुढच्या प्रसंगाची उत्सुकता जागवते. चटकदार संवाद आणि त्यात कलावंतांसाठी हुडकून काढलेली विनोदनिर्मितीची स्पेस प्रेक्षकांना हसवत ठेवते. त्यामुळेच नाटकाचा विषय गंभीर असला तरी त्याचे ओझे वाटत नाही. आपल्याला मूल होत नाही, याचे दु:ख अक्षर-पूजा दोघांनाही आहे. त्याच काळजीत असणारी वंदना, त्या अनुषंगाने या तिघांनीही वठवलेल्या व्यक्तिरेखा समाजातील अनेक घरांत सापडतील. त्यांच्या दु:खासह, चिंतेसह आणि मूल व्हावे म्हणून केलेल्या साऱ्या धडपडीही आपल्याला परिचयाच्या असतात. त्यासाठी समाजात त्या दाम्पत्याला काय काय ऐकावे लागते, हे सारे आपल्या अवतीभवती घडत असते. इथेही घडते, पण मूल न होण्याचे दु:ख किती परिपक्व असू शकते, याचा वस्तुपाठ हे नाटक आपल्याला करून देते.

कुठल्याही स्त्रीला लग्न झाल्यानंतर आई व्हायचे असते. त्यामागची नेमकी तगमग कशी असते, हे सांगताना पूजाचे एक स्वगत टचकन रसिकांच्याही डोळ्यांत पाणी आणते. अशा कठीण काळात पती-पत्नीने एकमेकांना कसे समजून घेतले पाहिजे, याचीही जाणीव अक्षर-पूजाची व्यक्तीरेखा करून देते.

पोट धरून हसायला लावणारे विनोद आणि क्षणार्धात हळवे करतील अशा प्रसंगांनी नाटक पुढे नेण्यासाठी महत्त्वाचा आधार ठरला आहे तो पार्श्वसंगीताचा. अमीर हडकर यांनी ही जबाबदारी चोख बजावली आहे. संदेश बेंद्रे यांचे नेपथ्य आणि अमोघ फडके यांची प्रकाशयोजना नाटकाच्या आशयविषयाशी सुसंगत आहे. रंगभूषा (उल्हेश खंदारे), वेशभूषा (अर्चना ठावरे शहा) आणि नाट्यविचाराला पुरक ठरणारी गाणी तेजस रानडे यांची आहेत. पडद्यामागून रंगमंचावरचा अवकाश भरून काढणारे सारे काम उत्तम झाले आहे. नाटकाची निर्मिती विशाखा सुभेदार यांच्या प्रग्यास क्रिएशन्स आणि पूनम जाधव यांच्या वी आर प्रॉडक्शनची आहे. सूत्रधार आहेत गोट्या सावंत.

‘कुर्रर्रर्रर्र’साठी विशाखा सुभेदार यांनी निर्माती आणि अभिनेत्री अशा दुहेरी जबाबदाऱ्या पेलल्या आहेत. प्रसाद खांडेकर लेखक-दिग्दर्शक-अभिनेता अशा तीनही आघाड्यांवर दमदारपणे लढले आहेत. लेखन-दिग्दर्शनासह अक्षरची भूमिका त्यांनी छान वठवली आहे. लग्नानंतर बरीच वर्षे बाळ न होणाऱ्या स्त्रीची तगमग नम्रता संभेरावने ताकदीने साकारली आहे. आई-मुलीच्या नात्याचे वेगवेगळे पदर विशाखा आणि नम्रताने अलगदपणे उकलले आहेत. पॅडी कांबळेचा रंगमंचावरचा सहज वावर आणि नाटकाला ट्विस्ट देण्यासाठी त्याच्या व्यक्तिरेखेवर असलेली जबाबदारी त्याने त्याच्या अभिनयातून पूर्णत्वाकडे नेली आहे. विशाखा आणि पॅडी या विनोदविरांची खास जुगलबंदी या नाटकाच्या श्रीमंतीचे एक कारण म्हणायला हरकत नाही.

नाटकांमध्ये घडते, तसे आपल्याला समाजात दिसते का, या प्रश्‍नाचे उत्तर फिफ्टी-फिफ्टी असे बहुतांश कलाकृतींविषयी असते. ‘कुर्रर्रर्रर्र’ हे शंभर टक्के वास्तवाच्या जवळ जाणारे ठरावे, अशी सदिच्छा या नाटकाचा सुखांत आपल्याला देईल. एका सुखांतासाठी भलामोठा दु:खाचा डोंगर कसा पार करता येतो, याची ही गोष्ट आपल्यालाही आनंद देणारी आहे.

mahendra.suke@esakal.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance : आरोग्य विम्यावर ‘जीएसटी’चा भार; सर्वसामान्यांचे बिघडतेय आर्थिक गणित

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रावर अतिमुसळधार पावसाचे संकट, पुढील 24 तास महत्वाचे; हवामान विभागाचा हाय अलर्ट

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : महाराष्ट्रापुढील सर्व संकटे दूर करण्याची शक्ती पांडुरंगाने द्यावी- देवेंद्र फडणवीस

Beed News: परळीतील गोळीबार खून प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय ,आरोपींना मिळणार नाही जामीन!

Ashadhi Ekadashi 2025 Special Recipe: आषाढी एकादशीनिमित्त उपवासाला बनवा खास अन् स्वादिष्ट पॅटिस, सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT