Devendra Fadnavis
Devendra Fadnavis sakal
संपादकीय

Ayodhya Ram Mandir : अवघे वातावरण राममय

मृणालिनी नानिवडेकर

देशाच्या आर्थिक राजधानीतील नेहमीची दिवाळी फिकी वाटेल, इतकी रोषणाई सगळीकडे दिसते आहे. अवघे वातावरण राममय झाले आहे.

मुंबई महानगरात कुठेही जा, अयोध्येत आल्यासारखे वाटेल अशी स्थिती आहे. प्रभू रामांची प्रतिमा असलेले भगवे झेंडे सर्वत्र लहरताहेत, अन् आता म्हणे बाजारात उपलब्धही नाहीयेत. दुकान असो का मकान, सर्वत्र प्रभू रामाचे दर्शन घडते आहे. ज्या भागात हिंदूंची वस्ती तुरळक आहे, अशा वस्त्यांमध्येही पताका, ध्वज लहरताहेत. एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे.

पाचशे वर्षांनी श्रीराम स्वगृही परतत असल्याची भावना बहुसंख्याक समाजाच्या उन्मादात परिवर्तित झालेली नाही, हे सुदैव. तसे होऊही नये ही प्रभूचरणी प्रार्थना. आज मात्र नेहमीची दिवाळी फिकी वाटेल, इतकी रोषणाई सगळीकडे दिसते आहे. धर्म हाच भारताचा मुख्य भाव आहे हे स्वामी विवेकानंदांचे वाक्य खरे असल्याचा प्रत्यय सर्वत्र येतो आहे. अवघे वातावरण राममय झाले आहे.

मंदिरामंदिरांत तर प्राणप्रतिष्ठा सोहळा दाखवला जाणार आहेच; पण गल्ली-वस्त्यांत एलईडी स्क्रीन उभारल्या आहेत. दिवसागणिक १० हजार रुपये आकारून ज्या एलईडी स्क्रीन मिळत, त्यांचा दर चार-पाच दिवसांपूर्वी २५ हजारांवर पोहोचला. आता एकही पडदा मिळत नाही, अशी स्थिती आहे.

अयोध्येत जे आठ हजार निमंत्रित बोलावले गेले आहेत, त्यातली सर्वाधिक संख्या मुंबईतील आहे. अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर, विराट कोहली हे अंबानी परिवाराच्या खासगी विमानातून अयोध्येला पोहोचणार आहेत, असे म्हणतात. देशातल्या मुख्यमंत्र्यांना प्राणप्रतिष्ठा समारंभाचे निमंत्रण नाही. पण एकनाथ शिंदे यांना पक्षप्रमुख या नात्याने बोलावण्यात आले आहे.

त्या गर्दीतला एक बिंदू होण्याऐवजी शिंदे मुंबई- ठाण्यातल्या वातावरणनिर्मितीवर स्वार होणे पसंत करत आहेत. देवेंद्र फडणवीस नागपुरात ३३ वर्षांपूर्वी केलेल्या कारसेवेची संस्मरणे करताहेत. उद्धव ठाकरे यांना निमंत्रण पाठवले होते, हे संघपरिवाराने सांगून टाकले आहे.

‘सामाजिक अभियांत्रिकी’

राममंदिर हे संघविचार मानणाऱ्या परिवाराच्या संघटनशक्तीचे प्रतीक आहे. त्याचे मार्केटिंग केल्याचा ठपका पुरोगामी भलेही ठेवोत; परिवाराने अत्यंत रेखीव आयोजन केले असे दिसते आहे. केवळ प्रतिष्ठितांनाच निमंत्रणे नाहीत तर मसणजोगी, फासेपारधी, वडार, मरिआई अशा समाजातले रामसेवक अयोध्येत निमंत्रितांमध्ये आहेत. विठ्ठल कांबळे, महादेव गायकवाड या दोघांची कुटुंबे पूजेचे मानकरी आहेत. ते ना शेटजी, ना भटजी.

वर्षानुवर्षे संघपरिवाराशी संबंधित संस्थेमार्फत राष्ट्रकार्य करणारे कार्यकर्ते एवढीच त्यांची ओळख. या निमंत्रणांतून सामाजिक अभियांत्रिकी केली जाते आहे. मुंबईकर हे जाणताहेत. महाराष्ट्रात संघविचार परिवाराने गेल्या १५ दिवसांत ७० हजार कार्यकर्त्यांच्या मदतीने ७७ हजार घरी प्राणप्रतिष्ठेच्या अक्षता पोहोचवल्या. राममंदिर हे राष्ट्रमंदिर आहे हे सांगितले जात आहे. त्याला उत्साही प्रतिसादही मिळत आहे.

देशभरातल्या मंदिरांत व्रतस्थ मोदी गेल्या पंधरा दिवसांत निष्ठेने पोहोचले. त्यांच्या या ‘टेम्पल-रन’ला प्रारंभ झाला तो नाशिकच्या काळाराम मंदिरातून. तेथील गल्लीबोळांत जाऊ नका, असा सुरक्षा यंत्रणांचा निरोप होता; पण ते गेले. ‘येथून निवडणूक लढवा’ ची मागणीही हळूच सुरू झाली. त्यांना मिळणारा प्रतिसाद पाहून बाकी राजकारणी गोंधळले असावेत. प्रकाश आंबेडकरांनी ठामपणे सांगितले की, विभाजनाच्या या प्रयत्नात सहभागी व्हायचे नाही. मी जाणार नाही. बाकी नेते नंतर जाऊ, बांधकाम पूर्ण झाल्यावर जाऊ, असे सांगताहेत.

मंदिराचा आनंद

भाजपने ठिकठिकाणी लावलेले फलक पाहून आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या शाखाही सजू लागल्या आहेत. वाघाने मंदिर उभारले, असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची छायाचित्रे लावून सांगणे सुरू आहे. मुंबईने राममंदिराचे आंदोलन वेगळ्याच पद्धतीने अनुभवले होते. नाक्यानाक्यावर शेकडो लोक महाआरतीसाठी एक येत.

मशीद किंवा ढाचा पडला त्यानंतर मुंबई बॉम्बस्फोटाने हादरली. त्या काळी धर्माच्या आधारावर विभागलेल्या मुंबईला शिवसेना आधार वाटे. बाळासाहेब केवळ मराठी माणसाचे नाहीतर हिंदूंचे तारणहार झाले. आता नव्या पिढयांनाही तसेच वाटते का? मंदिराचा आनंद शिवसेनाही व्यक्त करु लागली तर सर्वोच्च न्यायालयाने हिंसक कृत्य ठरवलेल्या बाबरी पतनाचे श्रेय घेणाऱ्या शिवसेनेसमवेत बसणे महाविकास आघाडीतील अन्य पक्षांना मान्य होणार का?

मुस्लिमांचा जो विश्वास उद्धव ठाकरे यांनी मिळवला आहे, तो टिकणार का कापरासारखा उडणार, याचीही परीक्षा होईल. धर्म आणि राजकारण वेगळे मानत निकाल वेगळे लागतील का? की सगळे नियोजनाप्रमाणे घडेल अन् भाजपला पाठोपाठ येणाऱ्या लोकसभेत चळवळीचे रामबळ अन जनतेचे पाठबळ मिळेल? राज्यभर संदेश जावा यासाठी अख्ख्या मंत्रिमंडळासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यथावकाश अयोध्येत जाणार आहेत.

हिंदुत्वाचा नारा बुलंद होईल हे कॉंग्रेसला लक्षात आले नाही, की उत्तर सुचले नाही, हा प्रश्नही सध्या चर्चेत आहे. रामनामाने विटा पण तरल्या म्हणतात. इथे तर तीन राजकीय पक्ष समवेत आहेत. या वातावरणाचा राजकीय फायदा घेण्याचा पुरेपूर प्रयत्न होईल. या संधीचे शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना काय करते, हे लवकरच कळेल. घोडामैदान जवळच आहे. कॉंग्रेसनेही मेळावे सुरू केले आहेत. बघू या काय होते ते !

आरक्षणासाठी लॉंगमार्च

समूहाचा आविष्कार हा सध्याच्या सामाजिक वास्तवाचा स्थायीभाव झालेला दिसतोय. गर्दी होतेय. कधी मंदिरासाठी तर कधी आरक्षणाच्या मागणीसाठी. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे मुंबईकडे निघाले आहेत. समाजाला आरक्षण देऊ, असे सरकारने आश्वासन दिलेय; पण जरांगे यांचा त्यावर विश्वास नाही. शिंदे सरकारने मागासपणाचे सर्वेक्षण करायचे ठरवले आहे. यंत्रणा कामाला लागली आहे. तीन शिफ्टमध्ये सर्वेक्षण होणार आहे.

विशेष अधिवेशन बोलावले जाणार आहे. तोवर मजल दरमजल करत जरांगे मुंबईत पोहोचलेले असतील. या काळात कुठेही सामाजिक तणाव निर्माण होऊ नये, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मागण्यांवर ठाम असलेल्या जरांगेंचे समाधान होते काय? त्यांच्या या लॉंगमार्चला कसा प्रतिसाद मिळतो, यावर जनतेचे लक्ष आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT