मुंबई-लाईफ

मुंबईला साथीची संगत!

दीपा कदम

१९व्या शतकात प्लेगची साथ आटोक्‍यात आणण्यासाठी ब्रिटिश सरकारने ‘एपिडेमिक ॲक्‍ट १८९७ - साथरोग कायदा’ जन्मास घातला. आज सव्वाशे वर्षांनंतर तो त्यातील सर्व कलमांसह जिवंत करण्याची वेळ यावी, हे दुर्दैव. वर्तमानाने इतिहासापासून काही धडेही घ्यायचे असतात. ते घेण्याची गरज ‘कोरोना’च्या थैमानामुळे सध्या प्रकर्षाने जाणवत आहे.

भायखळ्यातील एका चाळीच्या आवारात प्लेगचे अनेक उंदीर मेले होते. पोलिसांनी चाळीचा ताबा घेतला होता. तिथं एक बाई दगावल्याची कुणकूण होती. पोलिसांनी जाऊन पाहिलं. तर ती बाई चुलीजवळ स्वयंपाक करीत होती. पण तो सारा देखावा होता. त्या बाईचा मृतदेह बांधून चुलीजवळ बसविण्यात आला होता. ती जिवंत असल्याचा भास व्हावा यासाठी. अनेक घरांतून आजारी व्यक्तींना बिछान्यांखाली दडवून ठेवण्यात येत होतं. लोकांचं म्हणणं होतं, की ‘आमचा जीव गेला तरी चालेल, पण आम्हाला हात लावू नका’. मुंबईचे तत्कालीन कार्यकारी अधिकारी जे. ए. टर्नर यांनी लिहिलेल्या ‘हिस्ट्री ऑफ प्लेग इन मुंबई’ - १८९६-१८९७’ या पुस्तकातील ही माहिती. उपचारांसाठी लोकांना रुग्णालयात आणण्याकरिता किती, कशा प्रकारचे प्रयत्न करावे लागले, याची विस्तृत माहिती त्यात आहे. रुग्णालयात जाण्याचे टाळण्याच्या वृत्तीत आजही फरक पडलेला नाही. संशयित रुग्ण विलगीकरण कक्षांतून पसार झाल्याच्या घटना घडताहेत. या बाबतीत डॉक्‍टरांना पोलिसांची मदत घ्यावी लागत आहे. १९व्या शतकात प्लेगची साथ आटोक्‍यात आणण्यासाठी ब्रिटिश सरकारने ‘एपिडेमिक ॲक्‍ट १८९७ - साथरोग कायदा ’ जन्मास घातला. आज सव्वाशे वर्षांनंतर तो त्यातील सर्व कलमांसह जिवंत करण्याची वेळ यावी हे दुर्दैव. 

दीडशे वर्षांपूर्वी कॉलरा, इन्फ्लुएंझा, प्लेग, देवी अशा कैक साथींचं मुंबई हे माहेरघर होतं. प्लेगच्या साथीनं १८९६पासून मुंबईत कहर माजवला होता. २३ सप्टेंबर १८९६ ला पहिला प्लेगचा रुग्ण आढळला. १५ दिवसांतच आयुक्‍तांनी ‘स्वच्छता आणि विलगीकरण’ याविषयी परिपत्रक जारी केलं. ‘एपिडेमिट ॲक्‍ट’चा जन्मच मुळी सहकार्य मिळत नसल्याने झाला होता. आजारी रुग्णांना ताब्यात घेऊन त्यांचे विलगीकरण करणे, घरांची तपासणी, रुग्णांकडची सामग्री जाळून टाकणे असे कठोर पण आवश्‍यक उपाय योजले जात होते. रेल्वेगाड्यांची व प्रवाशांची तपासणी करून बाहेर सोडलं जात होतं. या कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या मुंबईच्या आयुक्‍तांना मोठ्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं. 

साथीच्या आजारासाठी अद्ययावत उपचार आणि तपासणी करण्यासाठी देशभरातून ज्या मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयाकडे आज पाहिलं जातं, त्या रुग्णालयालाचं तेव्हाचं नाव ऑर्थर हॉस्पिटल असं होतं. रुग्ण तेथे आणून त्यांचं विलगीकरण केलं जाई. त्याच्याविरोधात गिरणी कामगारांनी १० ऑक्‍टोबर १८९६ ला ऑर्थर रोड रुग्णालयावर हल्ला केला होता. मुंबईतील प्लेगच्या साथीत १८९६ ते १९०७ या काळात प्लेगने १ लाख ५७ हजार ८९१ लोकांचा मृत्यू झाला होता. भीतीने लोकांनी शहर सोडल्याने येथील लोकसंख्या निम्म्यावर आली होती. वेगळ्या अर्थानं ही साथ इष्टापत्ती ठरली. कारण त्यानंतर शहराला नीट आकार देण्याचा, ते स्वच्छ करण्याचा विडा ब्रिटिशांनी उचलला. एकाच रूग्णालयात वेगवेगळ्या जातीच्या रूग्णांनी एकत्र राहण्यास नकार दिल्यानंतर रातोरात वेगवेगळ्या ज्ञातीच्या समूहाच्या लोकांनी एकत्र येऊन लहान-मोठी ४० रुग्णालये याच शहरात उभी राहण्याचा विक्रम होऊ शकला, तो या साथीतच. त्यातली काही तात्पुरती होती. याच महानगरात डॉ. वेल्डिमर हाफकिन यांनी प्लेगच्या लशीची निर्मिती केली. लोक सजग झाले. क्‍वीन्स रोडवरील बंगल्यात राहणाऱ्या कुटुंबाने प्लेगच्या उंदराला जाळण्याचा पराक्रम केला होता. पण नंतरच्या दहा दिवसात कुटुंबातील ६ जणांना प्लेग झाला. त्यापैकी ४ जणांचा मृत्यू झाला. अशा प्रकारचे प्रकार आज कोरोनाबाबतही घडू लागले आहेत. परदेशातून भारतात येणारे कोरोनाची लक्षणं दिसू नयेत किंवा ताप आल्याचे कळू नये म्हणून क्रोसिनसारखी तात्पुरती औषधं घेऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात, त्या वेळी ते इतरांच्या जिवाशीही खेळत असतात. परदेशातून येणाऱ्यांसोबत कोरोनाची साथ मुंबईत आलीय. खरं तर त्यांनी तो पसरू न देण्याची दक्षता घ्यायला हवी होती. पण ‘शिक्षणाने शहाणपण येत नाही’ हे  टर्नरच्या अहवालातलं वाक्‍य पुन्हा सिद्ध झालंय. 

हे झालं तातडीच्या उपायांबाबत. ब्रिटिश सरकार तिथंच थांबलं नव्हतं. त्यांनी दूरगामी उपाय योजले. साथरोगांची कारणं मुळातून शोधून ती नाहीशी करणं यासाठी त्यांनी अभ्यास केला. नवे रस्ते बांधणे, रस्तारुंदीकरण करणं, मोकळ्या जागा तयार करणं आणि त्यातून शहरात समुद्रावरून येणारी हवा खेळती राहील हे पाहिलं गेलं. गलिच्छ इमारती, चाळी जमीनदोस्त करण्यात आल्या. कामगारांसाठी चाळी उभारण्यात आल्या. सांडपाणी व्यवस्थापन करण्यात आलं. जमिनीखालील गटारांची संख्या वाढवण्यात आली.

या सगळ्याचा विचार मुंबई आणि खरं तर सारीच शहरं आज करणार आहेत का? आजही १२५ वर्षे जुन्या कायद्याचा आणि इतर पद्धतींचा वापर मुंबईला करावा लागतोय. कारण साधं नागरिकशास्त्र आपल्याला समजलेलं नाही. स्वच्छतेचे नियम पाळण्याची शिस्त नाही. पायाभूत सुविधा व स्वच्छतेबाबत अद्यापही प्रश्‍नचिन्ह आहे. ब्रिटिशांनी दूरगामी उपाययोजना राबविल्या. हे करणं फार अवघड असतं का? तसं नसेल, तर ‘डेंगी आणि मलेरियाने एकही मुंबईकर दगावणार नाही,’ असं आव्हान मुंबई महापालिकेने स्वीकारायला काय हरकत आहे? कोरोना येईल आणि पुरेसं नुकसान करून जाईलही. त्यानंतर काय? वर्तमान इतिहासाचं बोट धरून चालत असतं असं म्हणतात. पण चालता चालता वर्तमानाने इतिहासापासून काही धडेही घ्यायचे असतात. ते आपण करणार आहोत, की वृथा इतिहासाचा गर्व बाळगत त्याच इतिहासाची पुनरावृत्ती करीत बसणार आहोत, याचा विचार करण्याची ‘हीच ती वेळ’ आहे. ‘कुछ तो कोरोना’ हेच या साथीचं सांगणं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Power of Simple Living and Discipline : साधं राहणीमान अन् बचतीच्या जोरावर ४५व्या वर्षी निवृत्तीपर्यंत जमवले ४.७ कोटी; जाणून घ्या कसे?

Latest Marathi News Updates : दक्षिण मुंबईतील गणेशोत्सव मंडळांची बैठक सुरु, अडचणींवर व नियोजनाबाबत होणार चर्चा

Video: प्रेमाची तालिबानी शिक्षा! काकाच्या मुलीवर प्रेम जडलं; रागात गावकऱ्यांनी प्रेमीयुगुलांना नांगराला जुंपलं, व्हिडिओ व्हायरल

८ चेंडूंत ६ विकेट्स.. पाच त्रिफळाचीत ! Kishor Kumar Sadhak ने इंग्लंडमध्ये सलग दोन षटकांत घेतल्या दोन Hat-Tricks

Parenting tips: पेराल ते उगवेल, आई वडिलांकडून अशा प्रकारे सवयी शिकतात मुलं

SCROLL FOR NEXT