old book
old book  
संपादकीय

खुणांचं पुस्तक

मल्हार अरणकल्ले

कपाटातल्या जुन्या तलम वस्त्राची घडी हाती यावी; आणि एकेक पदर उलगडताना कशिदाकामाची दृष्टिवेल्हाळ नक्षी सामोरी येत जावी, तसा अनुभव परवा अचानक आला. अनोख्या रंगाचं, मुठीएवढ्या चणीचं पाखरू कुठूनसं अलगद उतरलं, पावसाच्या साठलेल्या पाण्यात त्यानं तुषारस्नान केलं, इवल्या पंखांत लपलेले थेंब विशिष्ट नजाकतीनं उडविले; आणि पंखांच्या पाकळ्या पसरून काही क्षणांत ते कुठं दिसेनासं झालं. पाखराच्या येण्याजाण्याच्या, त्याच्या हालचालींच्या चित्राकृती नंतर किती तरी काळ नजरेसमोर भिरभिरत-गरगरत राहिल्या... मनाच्या कप्प्यात पाण्याचे थेंब पुनःपुन्हा उधळीत राहिल्या...

रस्त्याकडेच्या दुकानातल्या गठ्ठ्यांतून खरेदी केलेल्या जुन्या पुस्तकात पानोपानी असाच आनंद काठोकाठ भरलेला असेल, असं वाटलंही नव्हतं; पण वाळून गेलेल्या बकुळफुलांचा वस्त्रगाळ गंध जाणवावा, तसं त्या पुस्तकात बरंच काही होतं. नाजूक प्रकृतीचं ते पुस्तक हलकेपणानं हाताळावं लागत होतं. एकेक पान बाजूला करताना अधेमधे काही खुणा दिसत होत्या. छापील मजकुरात कुठं कंस काढलेले होते. कुठं प्रश्‍नचिन्हं होती. काही ठिकाणी उद्‌गारवाचक चिन्ह होती. कुठं अधोरेखितं होती. कुठं एखादा शब्द लिहिलेला होता. "वा, छान, सुंदर, नवी माहिती, वेगळा शब्द, सुरेख कल्पना' अशा नोंदींनी लक्ष वेधून घेतलं जात होतं. पुस्तक चाळताना असंही लक्षात आलं की, काही ठिकाणी विशिष्ट विषयांशी संबंधित मजकूर वेगवेगळ्या खुणांनी दर्शविलेला आहे.

फुलपाखरांच्या पंखांवर जेवढ्या अलगदपणानं रंग आणि नक्षी रेखाटलेली असते, तशाच तलम स्पर्शानं पुस्तकाच्या पानापानंवर या खुणा काढलेल्या होत्या. पुस्तकाचा हा आद्य वाचक त्यात मनःपूर्वक रंगून गेलेला असणार, हे या खुणाच सांगत होत्या. काहींना पुस्तकाशी असा खुला संवाद आवडतो; पण काहींना पुस्तकाचं नवेपण जपण्यात अप्रूप वाटतं. पुस्तकाच्या पानांवर कुठं छोटा ओरखडाही त्यांना सहन होत नाही. पानांवर काही दृश्‍य खुणा नसल्या, तरी त्या त्यांनी वाचता वाचता मनाच्या पानोपानी मात्र केलेल्या असतात. पुस्तक चाळताना ते मनातली ही पानंही उलगडतात; आणि रमून जातात. खुणांनी भरेलली पुस्तकं म्हणजे जणू गजबजून गेलेलं एखादं झाड असतं. वाऱ्यावर डोलणारं. मनसोक्त नाचणारं. टाळ्या पिटून गाणारं. सर्वांगानं शहारणारं. पानापानांतून बहरणारं. नंतरचा वाचक आधीच्या खुणांशी आपल्या खुणा जुळवितो. काही नव्या रेखाटतो. पावसात भिजताना आपणही नाही का मनातल्या आठवणींच्या आषाढधारा, श्रावणसरी त्यात मिसळून टाकतो!

पुस्तकांतले शब्द म्हणजे जणू लेखकाच्या प्रतिभेचा मोहर. वाचक त्याचा आनंद घेतो; आणि खुणांच्या कळ्या पानोपानी बहरत जातात. या कळ्या नंतरच्या वाचकाच्या हातांत फुलं होऊन उमलतात; आणि मग पुस्तक फिरेल तिथं तिथं अनेक नवे ताटवे बहरत जातात. कोऱ्या करकरीत पुस्तकांतही मोहराचे, कळ्यांचे आणि फुलांचे आवेग ओथंबलेले असतात. त्यांतल्या एखाद्या पानावर खुणेची गोंदणनक्षी उमटली, तरी ते सारं पुस्तक दहिवरानं गवत चिंब व्हावं, तसं समांतर आठवणींचा पाऊस होऊन आपल्या मनात बरसत राहतं.


तुमच्या मनाचं पुस्तक कोरं आहे की त्यात काही खुणा आहेत?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

Latest Marathi News Live Update : अमेठी-रायबरेलीमधून राहुल-प्रियांका यांच्या उमेदवारीबाबत जयराम रमेश काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT