Prakash Pawar writes Chhatrapati Shahu Idea of India concept sakal
संपादकीय

छत्रपती शाहूंची ‘आयडिया ऑफ इंडिया’ संकल्पना

छत्रपती शाहू महाराजांच्या नजरेतील ‘आयडिया ऑफ इंडिया’ संकल्पना उपयुक्त आहे. या संकल्पनेमध्ये ‘सायंटिफिक इंडिया’ आणि ‘अाध्यात्मिक भारत’ यांची सांधेजोड होती.

प्रा. प्रकाश पवार

छत्रपती शाहू महाराजांच्या नजरेतील ‘आयडिया ऑफ इंडिया’ संकल्पना उपयुक्त आहे. या संकल्पनेमध्ये ‘सायंटिफिक इंडिया’ आणि ‘अाध्यात्मिक भारत’ यांची सांधेजोड होती. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि शाहू महाराजांच्या स्मृतिशताब्दीच्या निमित्ताने ही संकल्पना समजून घेतली पाहिजे. छत्रपती शाहू महाराज यांची आज (ता.२६) जयंती, त्यानिमित्ताने.

छत्रपती शाहू महाराजांनी चोखंदळपणे राजकीय, सामाजिक, वैज्ञानिक, धार्मिक-अाध्यात्मिक गोष्टींची निवड केलेली होती. त्यांच्या काळात धार्मिक, अाध्यात्मिक भारताबद्दल चर्चा होत होती. न्यायमूर्ती रानडे, गोपाळ कृष्ण गोखले, महात्मा गांधी यांनी अध्यात्मिक चर्चा सुरू केली होती. शाहू महाराजांनी सत्यशोधक समाज, आर्य समाज यांच्याशी सलोख्याचे संबंध ठेवले होते. ॲनी बेझंट यांनीही कोल्हापूरला भेट दिली होती. गोपाळ कृष्ण गोखले आणि शाहू यांचे एकत्रित कार्यक्रमही होत होते. थोडक्यात शाहू महाराजांनी भारत हा धार्मिक आहे, हे निटनिटके समजून घेतले होते. धार्मिक सुधारणांचा विचार स्वीकारलेला होता. हिंदी लोक अशी समाजाची अस्मिता मांडली होती. तर त्यांनी धर्म आणि राष्ट्र यापैकी राष्ट्राला अव्वल स्थान दिले होते. असे असूनही शाहू महाराजांनी धार्मिक श्रद्धांचा आणि धार्मिक सुधारणांचा पुरस्कार केला होता. सामाजिक आणि राजकीय सुधारणा यांच्याशी सांधेजोड केलेला अाध्यात्माचा विचारही स्वीकारला होता. लोकांच्या जीवनातील दुःख आणि वेदनांचे निरसन करून आत्मसुख प्राप्त करून देणे हा त्यांच्या अाध्यात्माचा अर्थ होता. त्यांनी व्यक्तींच्या जीवनावरील नियंत्रण काढून टाकले. व्यक्तीने स्वविवेकाला अनुसरून निर्णय घ्यावा, अशी त्यांची ‘आयडिया ऑफ इंडिया’ संकल्पनेतील व्यक्तीची संकल्पना होती. त्यांची ही संकल्पना महात्मा गांधींच्या ‘आतला आवाज’ या संकल्पनेशी मिळतीजुळती आहे. तसेच त्यांची ही संकल्पना न्यायमूर्ती रानडे आणि गोपाळ कृष्ण गोखले यांच्या अाध्यात्माशीही मिळतीजुळती आहे.

राजकारण अभिजनांचे होते. शाहूंनी त्याचे सार्वजनिकीकरण केले. राजकारणाचे सार्वजनिकीकरण व नैतिकीकरण म्हणजे अध्यात्मिकीकारण होय. त्यामुळे छत्रपती शाहू महाराज ‘सायंटिफिक इंडिया’ ही संकल्पना स्वीकारतानाच अाध्यात्मिक भारत ही संकल्पनादेखील स्वीकारत होते. या दोन संकल्पनांबद्दल वर-वर आंतरविसंगती दिसते. परंतु शाहू महाराजांनी या दोन्हीही संकल्पनांचा अतिरेक होऊ दिला नाही. उलट त्यांचा योग्य समन्वय घालण्याचा प्रयत्न केला. सायंटिफिक इंडिया आणि आध्यात्मिक भारत या दोन संकल्पनांमधील द्वैत संपुष्टात आणले होते. ‘सायंटिफिक इंडिया’ आणि ‘अध्यात्मिक भारत’ अशा छावण्या अनेकांना मान्य होत्या. परंतु शाहू महाराजांनी त्यांच्यामधील राजकारण बाजूला ठेवले. त्यांनी या दोन छावण्यांवरती जाऊन पाहण्याची दूरदृष्टी दिली.

आधुनिक संकल्पनांचे व्यवस्थापन

छत्रपती शाहू महाराजांनी राज्यकारभाराची व्यवस्था शास्त्रशुद्धपणे समजून घेतली होती. त्यामुळे त्यांनी आधुनिक संकल्पनांचे शास्त्रशुद्धपणे व्यवस्थापन केले होते. लोक, राज्य, राष्ट्र, धर्म, इतिहास, सामाजिक सलोखा, नागरी समाज यांचे सुयोग्य व्यवस्थापन त्यांच्या जीवन चरित्रात सुस्पष्टपणे दिसते. धार्मिक क्षेत्राबद्दल त्यांनी सामाजिक सलोख्याचा विचार स्वीकारला होता. धार्मिक सामाजिक सलोखा हे त्यांच्या अध्यात्मिक भारत संकल्पनेचे व्यवच्छेदक वैशिष्ट्य आहे. शाहू महाराजांनी आर्य समाजाच्या अधिवेशनात धार्मिक सामाजिक सलोख्याचा सविस्तर विचार मांडला होता. त्यांनी तेव्हाच भारतातील परंपरा धार्मिक सामाजिक सलोख्याच्या आहेत, याबद्दल विवेचन केले होते. त्या भाषणांमध्ये त्यांचा इतिहास विषयक दृष्टिकोन व्यक्त झालेला आहे. तो धार्मिक सामाजिक सलोख्याचा आहे. शाहू महाराजांनी राष्ट्र ही संकल्पना पूर्णपणे लोककल्याणाशी जोडली होती. लोक आणि राष्ट्र यांच्या कल्याणाचा मेळ घातला होता (राखीव जागा, भटके विमुक्त, अल्पसंख्याक). त्यांनी राज्य आणि राष्ट्र या दोन संकल्पनांपैकी राज्य संकल्पनेला अग्रक्रम दिलेला होता. हा क्रम त्यांनीच लावलेला होता. एकविसाव्या शतकाच्या आरंभीपासून अशा प्रकारे क्रम लावण्यास सुरुवात झाली. शाहू महाराजांनी असा विचार जवळपास शतकापूर्वी रुजवला होता. त्यांचा आधुनिक भारतीय राज्यसंस्थेची स्थापना हा ‘आयडिया ऑफ इंडिया’ संकल्पनेशी सुसंगत असणारा विचार होता. त्यामुळेच त्यांनी भारतीय स्वातंत्र्य संग्रामाला आणि क्रांतीकारकांना कधी उघड तर कधी अदृश्यपणे पाठिंबा दिला होता.

थोडक्यात राज्य, राष्ट्र, धर्म, इतिहास, नागरी समाज (civil society) आणि लोक (People) यांचा एकत्रित सुमेळ शाहू महाराजांनी घातला होता. त्यांनी राज्यसंस्थेला अव्वल स्थान दिले होते. राष्ट्र-राष्ट्रवाद या संकल्पनांचे मानवी जीवनातील स्थान ओळखले होते. शाहू महाराजांनी मानवी जीवनातील धर्माचे आणि अाध्यात्माचे मूल्यही ओळखले होते. त्यामुळे या दोन्ही क्षेत्रांना नागरी जीवनाचा अनन्यसाधारण भाग मानले. लोककल्याणासाठी सार्वजनिक धोरणाकरता राज्यसंस्था या घटकाला अव्वल स्थान दिले. तसेच नागरी समाज आणि राज्यसंस्था यांच्या मध्यभागी राष्ट्र-राष्ट्रवाद या संकल्पनांना ठेवले होते, असे छत्रपती शाहू महाराजांच्या भाषणांच्या आधारे दिसते. अशाप्रकारे त्यांनी संकल्पनांचे व्यवस्थापन मानवी जीवनात करण्याची परंपरा निर्माण केली.

संवादाची वैचारिक परंपरा

शाहू महाराजांनी संवादाची परंपरा घडवलेली होती. वर्चस्वापासून मानवमुक्ती हा विचार ‘आयडिया ऑफ इंडिया’ या संकल्पनेशी जोडला होता. तसेच संवाद हा लोकशाही मार्ग निवडला होता. दुसऱ्या शब्दात शाहू महाराजांची राज्यसंस्था ही प्राचीन ग्रीक आणि रोमन या शहरांप्रमाणे विवेकी संकल्पनांचा प्रयोग करणारी होती. तसेच आधुनिक संकल्पनांचे प्रयोग करवीर राज्यसंस्थेमध्ये केले. यामुळे करवीर राज्यसंस्था आणि प्राचीन ग्रीक व रोमन शहरे यांच्यामध्ये विवेकाधारित प्रयोग करण्याची समान प्रक्रिया दिसते. आधुनिक काळातील शास्त्रीय फेरबदल करवीर राज्यसंस्थेमध्ये राबविले होते. प्राचीन ग्रीक आणि रोमन ज्ञान विज्ञान, मध्ययुगीन भारतातील (अकबर व छत्रपती शिवाजी महाराज) ज्ञान-विज्ञान आणि आधुनिक काळातील युरोपच्या इतिहासातील ज्ञान विज्ञान यांचा एकत्रित सुमेळ त्यांनी करवीर राज्यसंस्थेमध्ये घातला. महात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे, लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातील द्वैत समजून घेतले. तसेच त्या द्वैतांचा शाहू छत्रपतींनी अंत घडवून आणला. यामुळे आजच्या काळात महात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे, लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे द्वैत ओलांडून पुढे जाण्याचा महामार्ग छत्रपती शाहू महाराजांनी निर्माण केला होता, हे त्यांच्या स्मृतिशताब्दीच्या निमित्ताने समजून घेतले पाहिजे. कारण द्वैताच्यापुढे जाण्याचा विचार ‘आयडिया ऑफ इंडिया’ संकल्पनेत समाविष्ट आहे. ही गोष्ट त्यांनी अधोरेखित केली होती. म्हणूनच ‘सायंटिफिक इंडिया’ आणि ‘आध्यात्मिक भारत’ असे द्वैत खुद्द शाहू महाराजांनीच मिटविले होते. त्यांचा हा विचार पन्नाशीच्या दशकात पंडित जवाहरलाल नेहरू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांमध्ये सुस्पष्टपणे दिसतो. यामुळे ‘आयडिया ऑफ इंडिया’ संकल्पनेचे पूर्वसुरी छत्रपती शाहू महाराज होते, असे दिसते. तसेच आर्य समाजाच्या रूपाने उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांची सांधेजोड देखील करणारे होते.

दुसऱ्या शब्दात शाहू महाराजांनी इंग्रजी व हिंदी भाषांतील द्वैत उभे केले नाही. त्यांनी उत्तरेशी संवाद ठेवला होता. भौगोलिक सामाजिक सलोखा आणि भाषिक सामाजिक सलोखा अशा दोन गोष्टींची जोड ‘आयडिया ऑफ इंडिया’ या संकल्पनेला दिली होती. या अर्थाने छत्रपती शाहू महाराज हे ‘आयडिया ऑफ इंडिया’ संकल्पना समजून घेणारे एक महत्त्वाचे वैचारिक व्यक्तिमत्व होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Motivation Story : 'संकटातही सोडत नाहीत पत्‍नीचा हात'; रहीम भाई व अनसना यांचा संघर्षमय प्रवास

Yogi Adityanath : माफिया मुख्तार अंसारीच्या जागेवर गरिबांचे हक्काचे घर! मुख्यमंत्री योगींनी ७२ कुटुंबांना सोपवली चावी

Dev Diwali 2025 : आयुष्यात फक्त आनंदच आनंद असो... देव दिवाळीनिमित्त तुमच्या मित्रपरिवाराला द्या खास शुभेच्छा!

Happy Birthday Virat Kohli : बर्थ डे आहे, भावाचा...! विराट कोहलीचे हे तीन रेकॉर्ड त्याला भारताचा सर्वोत्तम कर्णधार बनवतात...

Pushkar Singh Dhami : ‘नीती आयोगा’त अव्वल, शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीत देशात पहिला क्रमांक; उत्तराखंडला ‘विकासाचे मॉडेल राज्य’ बनवण्याचा धामींचा संकल्प”

SCROLL FOR NEXT