संपादकीय

मेरी आवाज सुनो! (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी

आदरणीय हायकमांड यांना शतशत प्रणाम. मी नांदेडचा एक साधासुधा, सिंपल आणि निष्ठावान कार्यकर्ता असून, कर्मधर्म संयोगाने सध्या प्रदेशअध्यक्षदेखील आहे. काही काळ मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीदेखील राहिलो असून, माझी कारकीर्द आदर्श होती, अशी सरकार दरबारी नोंद झाली आहे. पक्षासाठी मी आजवर काय नाही केले? सर्व काही केले!! नांदेडच्या जनतेने माझ्यावर खूप प्रेम केले. जनता सारे काही पाहात असते. शांतपणे जनसेवेत गढलेल्या निरलस कार्यकर्त्याला जनता निमूटपणाने निवडून देते, ह्याचे महाराष्ट्रातले (बहुधा एकमेव) उदाहरण म्हंजे मीच! पक्षासाठी कुठलीही तडजोड न करणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर सध्या मात्र फार वाईट वेळ आली आहे. तीच कैफियत आपल्या कानावर घालण्यासाठी हे पत्र लिहीत आहे... 

आदरणीय पक्षाध्यक्ष, माझी अवस्था सांगताना मला घशात मोठ्‌ठा आवंढा आला आहे. हे पत्र वाचल्यानंतर तुमचाही घसा दाटून येईल. (इडली खात हे पत्र वाचू नका! बेकार अवस्था होईल!!) हल्ली पक्षात माझे कुणीच ऐकत नाही, अशी स्थिती झाली आहे. पूर्वीच्या काळी अध्यक्षांनी नुसती भुवई वर केली तरी खळबळ माजत असे. मी हात वर करून ओरडलो, तरी कुणाला ऐकू येत नाही!! विरोधी पक्षात असल्याने सत्ताधारी विचारत नाहीत, आणि "घर की मुर्गी दाल बराबर' ही पक्षातील अवस्था!! औंदाच्या निवडणुकीला मला उमेदवारी देऊ नका असे सांगूनही माझ्याच गळ्यात हार घालण्यात आला. हे म्हंजे भावासाठी सांगून आलेल्या स्थळाशी आपलीच पत्रिका मारून मुटकून जमवावी, त्यातला प्रकार झाला. हे असे कां झाले असावे? काही कळेनासे झाले आहे. 

परवा असेच झाले. चंद्रपुरातील कार्यकर्त्याचा फोन आला. तो म्हणाला, ""साहेब, आपला चंद्रपुरातला उमेदवार हुकलाय!'' मी म्हणालो, "" हुकला तर हुकला, मी काय करू?'' 
तो म्हणाला, ""तुम्ही एवढे मोठे साहेब, तुम्ही काहीतरी करा ना!'' 
""माझं कुणीही ऐकत नाही, तुम्ही दुसऱ्या कुणाला तरी फोन करा!'' मी म्हणालो. 
""असं कसं? तुम्ही आमचे आदर्श नेते आहात!'' ते म्हणाले. कुणीही आदर्श-बिदर्श बोलू लागला की गप्पच बसतो. काय करणार? शेवटी "हो-नाही' असे गुळमुळीत काहीतरी बोलत त्यांना खरे काय ते सांगून टाकले. 

""हे पाहा, माझं कोणीही ऐकत नाही. मीच राजीनामा देण्याच्या मनःस्थितीत आहे. तुम्हाला जे काही सुचतंय ते करा...'' एवढे कसेबसे बोलून मी फोन ठेवला. फोन ठेवून काही मिनिटे जेमतेम झाली असतील, माझ्या ह्या खासगी संभाषणाची "ऑडिओ क्‍लिप' व्हायरल झाल्याचे कळले. भराभरा फोन येऊ लागले. 
""साहेब, असं करू नका... राजीनामा कशाला देताय?'' ""कुणी ऐकत नाही, हे काय राजीनाम्याचं कारण झालं का साहेब?' अशा गयावया कार्यकर्ते करत होते. मलाही वाईट वाटले. एका कार्यकर्त्याने तर "तुम्ही सांगाल तिथून उडी मारतो' अशीही गळ घातली. माझे मन द्रवले.

अखेर आपल्या पक्षाच्या महाराष्ट्र प्रभारींनी सूचना केली, की "हायकमांडलाच पत्र पाठवून काय ते कळवा!'' त्यानुसार हे पत्र लिहीत आहे. 
कुणीही ऐकत नाही हे वाक्‍य माझे असले तरी ते काही फार महत्त्वाचे नाही. आपल्या पक्षात कुणीच कुणाचे ऐकत नाही, हे पूर्वापार सत्य आहे. कुणीच कुणाचे न ऐकण्याच्या स्थितीलाच लोकशाही म्हणतात नव्हे काय? 

सदरील ऑडिओ क्‍लिप आपल्याला व्हॉट्‌सऍपवर पाठवत आहे. कृपया ऐकून डिलिट करावी, ही विनंती. काहीही झाले तरीही तुमचाच. एक नांदेडचा कार्यकर्ता. 

- ब्रिटिश नंदी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT