संपादकीय

कलाटणी ! (ढिंग टांग!)

सकाळवृत्तसेवा

इतिहासास अवघे ठाऊक असतें. कुठेही खुट्ट जरी झाले तरी तो आपल्या बखरीत नोंद करून ठेवतो. खळ्ळ-खटॅक झाले तर विचारूच नका... पण हे असले काही घडेल, हे त्याच्या स्वप्नातदेखील नव्हते... 

""काहीही झालं तरी उत्तर भारतीय आपले भाईबंद आहेत...,'' राजेसाहेबांच्या मुखातून हे वाक्‍य घरंगळले, तेव्हा इतिहासाने कलाटणी घेतली की इतिहासाने कूस बदलल्यावर राजेसाहेबांनी उपरोक्‍त विधान केले, ह्याबद्दल तूर्त मतभेद आहेत. 
""उत्तर भारतीयांशी मुळात आमचं भांडणच नाही...'' समोरच्या कागदावर ब्रशाची वेलांटी काढत राजेसाहेब म्हणाले, तेव्हा तर इतिहासाने कूसबिस बदलण्याच्या भानगडीत न पडता थेट उशीच स्वत:च्या कानावर चेपली... हे काय भलतेच? मग इतकी वर्षे ह्या भय्यालोकांची टाळकी सडकली त्याचे काय? इतकी वर्षे परप्रांतीयांच्या गठड्या वळण्याच्या कामात पोलिस ठाण्यात खेटे पडले त्याचे काय? इतकी वर्षे रस्त्यात, रेल्वे स्टेशनात, स्टेशनाबाहेर परप्रांतीयांना सळो की पळो केले, त्याचे काय? 
""त्याचे काय काय त्याचे काय? तुमच्या नाकात दोन पाय...'' राजेसाहेब खवळून म्हणाले, तेव्हा इतिहास उशीच्या खालतीच प्राणांतिक दचकला. आपल्या मनातले सवाल साहेबांनी कसे वळखले, अं? पण तसे नव्हते. राजेसाहेबांनी व्यंग्यचित्राखालच्या ओळी जरा मोठ्यांदा वाचल्या होत्या, येवढेच. 

"बिचारे दररोज लोंढ्यांनी येतात, मुंबईत श्रम करतात... त्या श्रमिकांचे लोंढे म्हणजे आमच्या मुंबईची लोकगंगा आहे, लोकगंगा! त्या गंगेत आम्ही डुबकी मारून पवित्र होणार आहो...'' सद्‌गदित स्वरात राजेसाहेबांनी आपला हेतू जाहीर केला आणि इतिहासाचा बांध फुटला, फुटला, फुटला!! हे मी काय ऐकतो आहे? आजवर काय लिहिले आणि आता काय लिहावे लागत आहे? ह्याच लोंढ्यांना आम्ही गेली कैक वर्षे मोजता येणार नाहीत, इतक्‍या शिव्या घातल्या ना? ह्याच उत्तर भारतीयांची टाळकी काचेची असल्याचे समजून आघात केले ना? ह्याच परप्रांतीयांनी मुंबईची वाट लावली, म्हणून ठो ठो केली ना? कालपर्यंत ज्याला नाला समजत होतो, ती आज लोकगंगा झाली? दैवगतीचा खेळच न्यारा..! हा बदल कशामुळे झाला असेल बरं? 

पापलेटे आणि कोळंबीची घमेली घेऊन दाराशी येणारा उत्तर भारतीय मासळी विक्रेता इतिहासाला आठवला. ""साहब, लेके तो देखो, ऐसा पापलेट आपको कहां मिलेंगा?'' अशी आर्जवे करणारा तो लाडिक भय्या!! कोळंबीच्या वाट्यासाठी प्रेमाने वाटाघाटी करणारा तो मनमिळाऊ उत्तर भारतीय! अहाहा!! कोळणीच्या पाटापेक्षा उत्तर भारतीयांचा सपाटा अधिक मोलाचा... हे उशिरा का होईना, कळले तर... 
इतिहासाच्या मनातील सवाल राजेसाहेबांनी आत्ताही अगदी अचूक वळखला. 

"आमच्या मनात उत्तर भारतीयांबद्दल कायमच प्रेम होतं, पण त्याबद्दल काही हितशत्रूंनी गैरसमज पसरवले. टॅक्‍सीवाल्या उत्तर भारतीयाचे टाळके आम्ही सडकले, कारण त्याच्या डोक्‍यात उवा झाल्या होत्या. मासे विकणाऱ्या उत्तर भारतीय बांधवाचा धंदा उधळला, तो त्याच्या पाटीतील शिळ्या मासळीच्या दुर्गंधीमुळे. रेल्वे स्थानकातला उच्छाद तर केवळ टीसीला गंडवण्यासाठी होता...''

राजेसाहेबांनी एकापाठोपाठ खुलासेवजा गौप्यस्फोट केले आणि इतिहासाचे अक्षरश: डोळे उघडले. हे आधीच कळले असते, तर आज हा महाराष्ट्र (मुंबईसह हं!) गुण्यागोविंदाने नांदला असता. उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्र ही तिन्ही भावंडे बंधुभावनेने बांधली गेली असती. देर आये, दुरुस्त आये... 

"म्हणूनच आम्ही कांदिवलीला उत्तर भारतीयांच्या महापंचायतीत जाऊन आमच्याविषयीचे गैरसमज एकदाचे संपवणार आहो!!'' राजेसाहेबांनी आपला इरादा जाहीर केला आणि इतिहासाने घाईघाईने आपली खतावणी पुढ्यात ओढली. इतिहासाने नोंद केली : 

इक भाई भये अयोध्या 
दुजा कांदिवली जाय 
भय्या भय्या कहते रहना, 
जब व्होट मांगने आय! 

-ब्रिटिश नंदी 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT