Pune Edition Editorial Article on Jaganyach Vastav
Pune Edition Editorial Article on Jaganyach Vastav 
संपादकीय

जगण्याचे वास्तव साहित्यात उमटू द्या

नवनाथ गोरे

साहित्य म्हणजे भोवतालचं जीवन निरखणं आणि ते कागदावर उतरवणं एवढंच असतं, असं मला वाटत नाही. उलट जगण्याच्या वास्तवाला, प्रतिकूल परिस्थितीला भिडताना मनात जे काही साचत जातं, त्याला शब्दरूप देणं महत्त्वाचं. साहित्य अकादमीचा युवा कादंबरीकाराचा पुरस्कार मिळाल्यानंतर माझ्यासारख्याच अनेक मित्रमंडळींनी लेखनाविषयी मला काय वाटतं, याविषयी विचारलं. हा प्रतिसाद आणि त्याचं एकूणच लेखनाविषयीचं औत्सुक्‍य ही मला मोलाची गोष्ट वाटते. ही उत्साह वाढविणारी घटना आहे. त्यामुळेच माझा अनुभव तरुण मंडळींना; विशेषतः खेड्यापाड्यांत राहून कला, साहित्य याविषयी आस्था असलेल्यांना सांगावा, त्यांचा हुरूप वाढवावा, या हेतूनं हे चार शब्द. 

प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्षाचे दिवस येतातच. अडचणी उद्‌भवल्या नसतील तर जगण्यालाही मूल्य प्राप्त होत नाही. कोणतीही गोष्ट प्राप्त करण्यासाठी सातत्याने कष्ट उपसावे लागतात. अलीकडं सर्व स्तरांत पाहिलं, तर संघर्षातून साकारलेली अनेक व्यक्तिमत्त्वं नजरेस पडतील. ग्रामीण भागात सोयीसुविधा अजूनही पोचल्या नसल्या तरीही त्यावर मात करीत आज ग्रामीण मुले-मुली विविध क्षेत्रांत यशस्वी होताना दिसतात. उच्च शिक्षणापासून स्पर्धा परीक्षेतील गुणवंतांपर्यंत गरिबांची मुले गुणवत्तेवर उच्च स्थानावर पोचलीत.

ध्येयाप्रती आवड, त्या प्राप्तीसाठी सातत्याने धडपडत राहणं, यश-अपयश यांचा विचार न करता कार्याप्रती प्रामाणिक राहून कार्यरत राहणं हेच यशाचं गमक आहे. अलीकडे यशासाठी "शॉर्टकट' मार्ग वापरू जाऊ लागलेत. मित्रांनो, अशा मोहापासून दूर राहा. सोशल मीडियावर सातत्याने दिसणारा तरुण आभासी वातावरणात वावरतोय. काहीजण तळमळीने व्यक्‍त होण्याचे माध्यम म्हणून फेसबुक, व्हॉट्‌सऍपवर दिसतात. मात्र समूहात व्यक्‍त होताना ते कशाची भीड बाळगतात, ते मात्र समजत नाही. मनातील संकुचित भाव बाजूला सारून तरुणांनी लिहितं होणं गरजेचे आहे. पदव्या प्राप्त करताना वर्गखोल्याबाहेरचं शिक्षणही समजावून घेतलं पाहिजे. अवघं आकाश कवेत घेण्याचं सामर्थ्य आजच्या पिढीत नक्‍की आहे. मात्र हे करताना पायाखालची जमीन निसटत नाही ना, याचे भान ठेवणे गरजेचे आहे. 

मी एक लिहिणारा माणूस म्हणून जेव्हा आजूबाजूला पाहतो, तेव्हा गावाकडच्या मुली, महिलांची स्थिती अलीकडे काही प्रमाणात सुधारल्याचं जाणवतं. मात्र ते अपवादात्मक. आजही दहावी, बारावीपुढे पाऊल टाकणं मुलींना सहजसाध्य नाही. पदवीपर्यंत पोचणाऱ्या तर अगदी थोड्या. गुणवंत, यशवंतांच्या यादीत मुली दिसतात. मात्र हे चित्र सार्वत्रिक नाही. वर्तमानात हे चित्र बदलायला हवं. आपण फक्‍त यावर विचार करून प्रश्‍न सुटणार नाही. सातत्याने काही समस्यांवर आवाज उठवणं मात्र आपले काम आहे. ते प्रामाणिकपणे करावं लागेल. आपलं लिहिणं परिणामकारक झालं पाहिजे. तसं ते होण्यासाठी अनुभवाशी आपण किती प्रामाणिक राहतो आणि त्यावर स्वतःचा असा विचार करतो, ते महत्त्वाचं. 

मी जे जगलो, जे भोगलं तेच मांडायचं ठरवून लिहिता झालो. लिहिताना माझ्यात मुरलेल्या माझ्या घरातील, प्रदेशातील रीतीभाती, परंपरा आपोआप पाझरल्या. भाकरीमागं फिरता फिरता जगण्याशी चाललेला झगडा चालूच होता. पण शिक्षणाची कास सोडायची नाही, असं ठरवून कोल्हापूरला शिवाजी विद्यापीठात एम.ए.ला. प्रवेश घेतला. बिल्डिंगवर पाणी मारत, सिक्‍युरिटी गार्ड म्हणून काम करीत शिक्षण पूर्ण केलं. नैराश्‍याच्या खाईत सापडलो नाही, याचं कारण माझं मन मोकळं करायचं माध्यमच मला लेखनाच्या रूपात मिळालं. अलीकडं बरीच तरुण मुले-मुली, महाविद्यालयीन विद्यार्थी स्वत:ला व्यक्‍त करण्यासाठी लेखन करताना दिसतात. खरं तर ही कौतुकाची गोष्ट आहे. कल्पनाविश्‍वात रमण्यापेक्षा वास्तव गोष्टींचा अनुभव हे साहित्यातून मांडू लागलेत. सोशल मीडियावर तर अनेकजण लिहिते झालेत. 

मला मनापासून वाटतं, की लिहिणाऱ्या प्रत्येकानं आपला आतला आवाज ओळखायला हवा. जनसामान्यांचे कितीतरी प्रश्‍न आज ऐरणीवर आहेत. अशा प्रश्‍नांना साहित्यातून वाचा फोडता आली पाहिजे. अलंकारिक भाषेचा सोस न धरता जसे आहात, जसे बोलता, आचरण करता, त्याप्रमाणेच लिहा. ज्या मातीतून आपण उभे राहतो त्या मातीशी निष्ठा ठेवून प्रामाणिकपणे अभिव्यक्‍त होणे, हे नव्या दमाच्या लिहिणाऱ्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. मित्रांनो, जे वाटते ते लिहा; पण सातत्याने लिहीत राहा, एवढंच माझं सागणं आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT