केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या सातशे-साडेसातशे जणांमध्ये दरवर्षी मराठी उमेदवारांचे प्रमाण गेली काही वर्षे सातत्याने आठ ते दहा टक्के इतके टिकून आहे, ही आनंदाची बाब आहे. यंदाही 759 उत्तीर्णांमध्ये साठच्या आसपास मराठी विद्यार्थी आहेत. यातील काही महाराष्ट्राबाहेर स्थायिक झालेले आहेत. यंदाच्या उत्तीर्ण मराठी उमेदवारांपैकी पहिल्या तीन क्रमांकावर महिला आहेत, ही आणखी एक आनंदाची बाब. राष्ट्रीय स्तरावरही एकूण उत्तीर्णांपैकी 182 महिला आहेत. मराठी उमेदवारांनी यशातील हे सातत्य राखले असले, तरी त्यात अपेक्षित असलेली वाढ मात्र झालेली दिसत नाही, याची दखल घ्यायला हवी.
दरवर्षी देशाला दहा टक्के गुणवान अधिकारी देणाऱ्या या राज्यातून पहिल्या क्रमांकावर किंवा पहिल्या दहामध्ये येणाऱ्यांची संख्या कमी आहे. वास्तविक, पुणे-मुंबई ही स्पर्धा परीक्षांची केंद्रे असून, योग्य वातावरणाची आणि मार्गदर्शनाची येथे कमतरता नाही. त्यामुळे पुढील काळात तरी महाराष्ट्र हा यशाचा केंद्रबिंदू ठरेल, अशी आशा आहे; तसेच पुण्या-मुंबईत अभ्यासाची तयारी करण्यासाठी इतर शहरांमधून आणि ग्रामीण भागातून अनेक विद्यार्थी येतात; तर अनेकांना आर्थिक किंवा इतर काही कारणांमुळे येता येत नाही. त्यांच्या गावांमध्ये दर्जेदार सुविधा मिळाल्यास इच्छुकांना गावातच अभ्यासाची सोय होऊन उत्तीर्णांचे प्रमाण वाढणेही शक्य आहे.
शहरात येऊन राहण्या-खाण्याचा आणि कोचिंगचा खर्चही त्यातून वाचू शकतो. या परीक्षेत उत्तीर्ण होण्याचे प्रमाण कमीच असते. त्यामुळे ज्यांना यश मिळाले नाही, ते गुणवान नाहीत, असे समजायचे कारण नाही; पण अपयशामुळे संधी हुकलेल्या अथवा निराश झालेल्यांसाठी योग्य समुपदेशन करून त्यांनी केलेल्या अभ्यासाचा फायदा होईल, अशा क्षेत्रांकडे त्यांना वळविल्यास हे यश दुहेरी होईल.
महाराष्ट्र हे नेहमीच कार्यकर्त्यांचे मोहोळ म्हणून नावाजले जाते. आजच्या काळात सामाजिक-आर्थिक बदलांसाठी सनदी सेवा हे एक परिणामकारक माध्यम आहे, हे लक्षात घेऊन या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्यासाठी व त्यांचा दृष्टिकोन घडविण्यासाठी आणखी व्यापक प्रमाणात प्रयत्न करायला हवेत. तसे झाल्यास आणि ज्यांना यश मिळाले आहे, त्यांनी विविध राज्यांत उत्तम काम करून आपला ठसा उमटवल्यास मराठी माणसाच्या यशाचा गुणाकार होत जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.