Pune Edition Editorial Article on Nammudra by Sanjay Miskin
Pune Edition Editorial Article on Nammudra by Sanjay Miskin 
संपादकीय

रणनीतिकार ते नेता..! (नाममुद्रा)

संजय मिस्कीन

भारतीय राजकारणात नवे नेते... नवे चेहरे याची काही कमी नाही. पण देशात "निवडणूक रणनीतिकार' म्हणून ठसा उमटविणारे मात्र मोजकेच. लोकांना राजकीय "मत' बनवायला शिकवणे ही अवघड कला शक्‍य करून दाखवली ती प्रशांत किशोर यांनी..! बिहारमध्ये एका डॉक्‍टराच्या घरात जन्मलेल्या प्रशांत किशोर यांनी वयाच्या 41 व्या वर्षीच सर्वच पक्षांत स्वत:च्या नावाचा दबदबा निर्माण केला.

राजकीय पक्षाचं संघटन कितीही मजबूत असले तरी सर्वसामान्य मतदारांच्या मनात शिरून त्या पक्षाला व नेत्याला रुजवणं हे अवघड काम ते करतात. मितभाषी, हसतमुख, साधी राहणी ही त्यांची वैशिष्ट्ये. निवडणूक प्रचारतंत्राचा हा "बेताज बादशहा' मानला जातो. 2014 च्या निवडणुकीपूर्वी "मोदी लाट' तयार करण्यात त्यांच्या व्यूहरचनेचा वाटा लक्षणीय होता. आता हा रणनीतिकार स्वतःच राजकीय आखाड्यात प्रत्यक्ष उतरलाय. संयुक्त जनता दलात सहभागी झाल्याक्षणीच नितीश कुमार यांनी "प्रशांत किशोर हे "भविष्य' आहे', असे उद्‌गार काढले.

बिहारमध्ये सध्या तेजस्वी यादवसारखा युवक नेता उभारत असताना प्रशांत किशोरच्या रूपानं नव्या तरुण चेहेऱ्याचे आव्हान उभे करण्याची ही "जेडीयू'ची रणनीती असू शकते. एक आरोग्य सुधारक व विश्‍लेषक म्हणून त्यांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये काम सुरू केलं; पण नंतर 2012मध्ये नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराची धुरा हाती घेतली. उत्तम आकलन व निरीक्षणशक्तीची त्यांना देणगीच आहे. अगदी आरोप-प्रत्यारोपांच्या धुळवडीतही आपल्या नेत्याची प्रतिमा कायम केंद्रस्थानी राहील यासाठीची रणनीती ते आखतात. अमित शहा यांच्याशी काहीशा मतभेदानंतर त्यांनी भाजपचं काम सोडलं. लगेचच 2015ला बिहार विधानसभा निवडणुकांत प्रशांत किशोर यांनी नितीश कुमार व लालूप्रसाद यांच्या प्रचार व्यूहरचनेची जबाबदारी हाती घेतली. मोदी लाट असतानाही बिहारमध्ये मात्र भाजपला दणकून मार खावा लागला.

मोदींचा करिष्मा बिहारमध्ये चालला नाही, यामागे प्रशांत किशोर यांची रणनीती होती. "बिहार में बहार है.. नितीशे कुमार है...! या टॅगलाइनखाली "मोदी विरुद्ध नितीश कुमार' अशी प्रचाराची आखणी करण्यात प्रशांत किशोर यांना यश आले. त्यानंतर पंजाबात अमरिंदर सिंग यांच्यासाठी त्यांनी काम केले. पंजाबात कॉंग्रेसला एकहाती सत्ता मिळाली. 2012 ते आतापर्यंत प्रशांत किशोर यांचे एकमेव अपयश म्हणजे उत्तर प्रदेश निवडणुका. तेथे त्यांनी कॉंग्रेसच्या प्रचाराची धुरा सांभाळली; पण तेथे मात्र त्यांचे आडाखे चुकले. 

माहितीचे सखोल विश्‍लेषण करून त्याचा वापर सर्वसामान्य व्यक्तीच्या अंतःकरणात शिरण्यासाठी करणे हे त्यांचे वैशिष्ट्य. निवडणूक प्रचारातील अजेंडा आपल्या मनासारखा तयार होण्यासाठी ते योजना आखतात व लोकांना आकृष्ट करतात. ती त्यांची खासियत. विरोधी पक्षाला कोंडीत पकडण्यासाठी मुद्दामहून वादग्रस्त मुद्दे पुरवणे व त्यावर प्रतिहल्ला चढविताना आरोपातली हवा काढून विरोधकांना तोंडघशी पाडणं हे कसब प्रशांत किशोरकडे आहे. त्यांच्या प्रवेशामुळे बिहारमधील युवक नेत्यांच्या नव्या राजकारणात आणखी रंगत येणार आहे, हे नक्की. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: सलमान खान गोळीबार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल; सीबीआय तपासाची केली मागणी

Virat Kohli : 'खूप फसवणूक झाली मात्र आता...' विराट कसा झाला 634 कोटी रूपयाचा मालक?

Car Maintenance Tips: कारची 'अशी' घ्या काळजी, अन्यथा लागेल गंज

Juice For Diabetes : मधुमेहाच्या रुग्णांनी प्यायलाच हवेत 'हे ज्यूस, रक्तातील साखरेची पातळी राहील नियंत्रणात

Karan Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहच्या मुलाच्या प्रचार रॅलीत फायरिंग? चौकशीतून काय समोर आलं?

SCROLL FOR NEXT