संपादकीय

फटाक्‍यांचे स्फोट ! (ढिंग टांग !)

सकाळवृत्तसेवा

इतिहासापुरुषास नेमकी डुलकी लागत होती, तेव्हाच दाणकन स्फोटाचा आवाज होवोन तो खडबडून जागा झाला. कोर्टाची मनाई असूनही ही माणसे किती फटाके लावितात अं? अशी मनातल्या मनात कुरबूर करोन इतिहासपुरुषाने कूस बदलून डुलकीचे ड्युरेशन आणखी पाच-दहा मिनिटांनी ताणायचे ठरवले. परंतु तसे घडलें नाही. आणखी एका जोरकस दणक्‍याने दचकून इतिहासपुरुष बदकिती पलंगावरोन खालतें पडिला. "ओय ओय' असे ओरडत पाठीच्या जरा खालील अवयव चोळत तो उठला आणि संतापून ओरडला, ""कोणॅय ते? पोलिस लावीन मागे..!'' 

परंतु इतिहासपुरुषाचा संताप वाया गेला. त्याच्या धमकीस विकट हास्याने प्रत्युत्तर मिळाले. वर आणखी एक भयाकारी स्फोट झाला. रिश्‍टर स्केलवर त्या स्फोटाची तीव्रता 9.7 एवढी मोजली गेली. (भूकंपमापकाचे हे यंत्र एकदा पाहून ठेवले पाहिजे...) भूगर्भातील खंडपठारे ऊर्फ टेक्‍टॉनिक प्लेट एकमेकांवर धडकल्या की असले आवाज होतात, एवढे जनरल नालेज इतिहासपुरुषाकडे होते. ह्या प्रकाराने अचंबित झालेल्या इतिहासपुरुषाने सावध होवोन पुनश्‍च लेखणी हाती घेतली व सदर प्रसंग इतिहासात नमूद केला. घडले होते ते असे : 
शिवाजी पार्कच्या कृष्णकुंजगडाच्या टॉपच्या मजल्यावर भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे कळले. गडावर दिवाळीचा माहौल होता. मिठायांची बॉक्‍से ओसंडून वाहात होती. फराळाची पोती रिती होत होती. महाराष्ट्राच्या नवनिर्माणाच्या कार्याला चालना मिळाली होती. साक्षात चुलतराजसाहेबांच्या हस्ते पेटवून घेण्यासाठी दिव्या-पणत्यांची रांग उभी होती. आपल्या वातीस त्यांच्याच हस्ते अग्नि मिळावा, ही आस कुठल्या ज्योतीस नसते? असो!! 

दाणदाण स्फोट झाल्यानंतर गडाच्या पायथ्याशी असलेली वस्ती हडबडून गेली. लोक घाबरून रस्त्यावर आले. कुठेतरी प्रलयंकारी भूकंप झाला असून अवघे भूमंडळ डळमळल्याची चर्चा सुरू झाली. वातावरण तंग झाले होते. तेवढ्यात लगबगीने नवनिर्माणाचे काही शिलेदार गडाच्या बालेकिल्ल्यात शिरले, त्यांनी मोठी खबर आणिली होती... 

"नवनिर्माणाचा विजय असो! शिवाजी पार्क परिसरात आवाजाच्या डेसिबलची मर्यादा ओलांडली गेल्याचे निष्पन्न झाले असून, कारवाई करण्याचा विचार ध्वनिप्रदूषणविरोधी संघटना करीत आहेत, साहेब!'' सरखेल नितीनाजी सरदेसायांनी अदबीने साहेबांच्या कानी महत्त्वाची माहिती घातली. 

साहेब मान खाली घालून पेन्सिलीला टोक काढण्यात मग्न होते. थोड्या वेळाने खाकरून त्यांनी विचारले, ""कोण करतंय एवढा आवाज?'' 

"डेसिबलची मर्यादा ओलांडणारे आवाज आपल्याच गडावरून आले, असा विरोधकांचा दावा आहे...,'' मनाचा हिय्या करोन नितीनाजींनी आणखी माहिती पुरवली. मग उगाच बोललो, असा चेहरा करून ते उभे राहिले. त्यांचा चेहरा तसा नेहमीच "उगाच बोललो' असाच असतो. पण तेही एक असो. 

"आमच्या गडावरून? इथं तर आम्ही साधी फुलबाजीदेखील पेटविली नाही...'' साहेबांनी खांदे उडवत खुलासा केला. 
"आम्ही दिवाळीतले साप लावले, सापाच्या गोळ्यांमधून आवाज येत नाही, असा लेखी खुलासा आपण ऑलरेडी फाइल केला आहे, साहेब!'' नितीनाजी तत्परतेने म्हणाले. "सापाच्या गोळ्या' हा एक प्राचीन फटाक्‍याचा प्रकार असून तो वय वर्षे सहा ते बारा ह्या दरम्यानच्या मुलांसाठी असतो. एका काळ्या गोळीस आगकाडी लावली असता, त्यातून काळा साप सरासरा बाहेर येतो. धूर येतो, मज्जादेखील येते, परंतु आवाज येत नाही. 

"मग कसला आवाज झाला?'' साहेबांनी विस्मयाने विचारले. त्यावर कुणी काही बोलले नाही. साहेबांनी सगळ्यांना बाहेर घालवले आणि कागद आणि चित्रकलेचा पाट पुढ्यात ओढला. नवे व्यंग्यचित्र काढावयास घेतले. त्यांनी पेन्सिल टेकविली, आणि पुन्हा एकदा महास्फोटासारखा आवाज येवोन भूमंडळ थरथरले. 
...थरथरत्या हाताने टेबल घट्ट धरून इतिहासपुरुषाने ह्या प्रसंगाची कशीबशी नोंद केली. इति. 

- ब्रिटिश नंदी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

Lok Sabha Election 2024 : डमी नावाच्या उमेदवारांना निवडणूक लढविण्यास मनाई करा; प्रकरण कोर्टात पोहचलं पण...

SCROLL FOR NEXT