ढिंग टांग ब्रिटिश नंदी: पंगा मत ले यार...! sakal
संपादकीय

ढिंग टांग ब्रिटिश नंदी: पंगा मत ले यार...!

बेटा : (शूरवीर योद्ध्याप्रमाणे) ढॅणटढॅऽऽण...मम्मा, आयम बॅक..! ढिशुम...ढिशुम..! मम्मामॅडम : (प्रेमभराने स्वागत करत) आलास? ये! दमला असशील ना? हे घे गरम पाणी! बेटा : (चक्रावून) गरम पाणी कशाला? मी आंघोळ करुनच आलोय!!

सकाळ वृत्तसेवा

बेटा : (शूरवीर योद्ध्याप्रमाणे) ढॅणटढॅऽऽण...मम्मा, आयम बॅक..! ढिशुम...ढिशुम..!

मम्मामॅडम : (प्रेमभराने स्वागत करत) आलास? ये! दमला असशील ना? हे घे गरम पाणी!

बेटा : (चक्रावून) गरम पाणी कशाला? मी आंघोळ करुनच आलोय!!

मम्मामॅडम : (काळजीपोटी...) दीड तास भाषण केलंस! घसा सुकला असेल ना? आपल्याला कुठे सवय असते दीड-दीड तास बोलण्याची?

बेटा : (खुशीत) मी आणखी दीड तास बोलू शकतो!

मम्मामॅडम : (आग्रहाने) नको, नको! तू गरम पाणी पी!!

बेटा : (पाण्याचा घोट घेत) आहा! या गरम पाण्याच्या घोटामुळे मला हरयाणातल्या ट्रकवाल्यांच्या चहाच्या टपरीची आठवण झाली! मी ट्रक ड्रायवरांसोबत प्रवास केला होता आठवतंय?

मम्मामॅडम : (घाईघाईने) तुला भूक लागली आहे का?

बेटा : (जुन्या आठवणीत रमत) दक्षिणेत एका ठिकाणी मी गाडीवरच्या तव्यावर डोसा घातला होता, आठवतंय?

मम्मामॅडम : (हळू आवाजात) उत्तप्पम म्हणावं!

बेटा : (ठामपणाने) डोसाच घातला होता!! एका शेतात शिरुन भात लावणी केली होती, आठवतंय?

मम्मामॅडम : (संशयानं) गव्हाचं शेत होतं ते!!

बेटा : (ठामपणाने) भाताचंच पीक घेतलं होतं...! एकदा एका टावरान हाटेलात भजी खाल्ली होती, आठवतंय?

मम्मामॅडम : (मनापासून दाद देत) तुझ्या मेहनतीचंच फळ आहे बेटा! दोनदा संपूर्ण भारत पायी चालत पालथा घातला होतास!! पायी चालून तू लोकांची मनं जिंकलीस!!

बेटा : (विषय बदलत) तुला म्हटलं होतं...मोदीजी मला जाम घाबरतात! डोळ्याला डोळा भिडवत नाहीत, आठवतंय?

मम्मामॅडम : (समाधानाने) आठवतंय, बरं, सगळं आठवतंय!!

बेटा : (डोळे मिटून मंदपणे हसत) ते पुन्हा एकदा सिद्ध झालं! मी दीड तास बोलत होतो, ते डोळे मिटून ऐकत होते! बहुधा माझ्या तेजस्वी शब्दांचा मारा त्यांना सहन झाला नसेल!! दीड तास मी त्या कमळवाल्यांचे असे वाभाडे काढले की, त्यांना वाटलं असेल की बुरे दिन आनेवाले है!! हाहा!!

मम्मामॅडम : (तिरस्काराने) बरं झालं, त्यांना अद्दल घडवलीस!! गेली दहा वर्षं आपल्याला किती टोचून टोचून बोलत होते! एका भाषणात परतफेड केलीस! शाब्बास!!

बेटा : (निर्भयपणे) मी कुणालाच घाबरत नाही! ‘डराओ मत, डरिए मत,’ हे माझं घोषवाक्य आहे!! हे कमळवाले उगीचच विरोधकांना घाबरवतात! इतर लोक घाबरत असतील, पण मी नाही डरत कुणाला!!

मम्मामॅडम : (समाधानाने) गेली दहा वर्षं कुठं गेलं होतं तुझं हे तेज?

बेटा : (युद्धाच्या पवित्र्यात) खटाखट खटाखट खटाखट खटाखट..! आपुन से पंगा नही लेनेका, लेने के देने पड जायेंगे...समझे?

मम्मामॅडम : (सबुरीचा सल्ला देत) अजून बराच पल्ला मारायचा आहे, तेव्हा बेतानं!!

बेटा : (सपशेल दुर्लक्ष करत) कमळवाल्यांना मी गुजरातमध्ये हरवून दाखवीन! लिहून ठेव!!

मम्मामॅडम : (हरखून जात) खर्रर्रच?

बेटा : (आत्मविश्वासाने) लगी शर्त!! त्यांना तिथं धूळ चारुन ढोकळा खाऊन येतो की नाही बघ!!

मम्मामॅडम : असेच आक्रमक हल्ले चालू ठेवलेस, तर पुढच्या वेळेला तुझा राज्याभिषेक नक्की!! ये हमारी गारंटी है!!

बेटा : (स्फुरण चढून) मी टर्मिनेटर आहे! माझ्यासमोर आता कोणीही टिकू शकत नाही! शत्रूला खटाखट खटाखट खटाखट परास्त करुन मी जिंकणारच, ही माझी गॅरंटी आहे!!

मम्मामॅडम : (खुर्चीत शांतपणे बसत) आता पाच वर्षांनी हं! तोवर धीर धरायचा, बरं का!!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : अक्षर पटेलने 'त्या' दोघांना दिल्ली कॅपिटल्सचा विजय समर्पित केला; मन जिंकणारी कृती, फॅन्सही हळहळले... नेमकं काय घडलं?

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : २ मे २०२६ ते ८ मे २०२६ - मराठी राशी भविष्य

सकाळच्या चहा-नाश्त्याला परफेक्ट क्रंच! कुरकुरीत मसूर डाळ वड्यांची झणझणीत रेसिपी लगेच लिहून घ्या!

IPL 2026 : दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table मध्ये उलथापालथ; राजस्थानचा नेट रन रेट घसरला, CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळा

RR vs DC Live: 'चिमणी उडे, कावळा उडे'! पृथ्वी शॉ याच्यावर आली ही वेळ... सचिन, लारा यांच्यासोबत तुलना व्हायची आज तोच... Video

SCROLL FOR NEXT