"कोरोना'चा प्रादुर्भाव आटोक्यात यावा यासाठी पुण्यात लागू करण्यात आलेली टाळेबंदी शुक्रवारपासून मागे घेण्यात आली असली, तरी "कोरोना'चा धोका टळलेला नाही. तेव्हा टाळेबंदी उठली म्हणून वैयक्तिक आणि सामूहिक स्तरावर सर्व नियम झुगारून देणे, हे संकटाला निमंत्रण देण्यासारखे आहे. ते कटाक्षाने टाळले पाहिजे.
"कोरोना'च्या पार्श्वभूमीवर पुण्यात लागू करण्यात आलेल्या पाचव्या लॉकडाउनची मुदत गुरुवारी संपली. अत्यावश्यक असे काही निर्बंध कायम राहतील; पण बव्हंशी व्यवहार शुक्रवारपासून पूर्ववत होतील. "यापुढे लॉकडाउन केला जाणार नाही,' असे प्रशासनाने स्पष्ट केले असले, तरी लोकांचा व्यवहार प्रत्यक्षात कसा चालतो आहे, यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत.
आरोग्याची आचारसंहिता महत्त्वाची
पुण्यात "कोरोना'मुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या एक हजारांच्या वर गेली असून, बाधितांचा आकडा चाळीस हजारांवर पोचला आहे. अर्थात या भयंकर आजाराला यशस्वीरीत्या तोंड देऊन बरे झालेल्यांची संख्याही लक्षणीय आहे. "कोरोना बरा होऊ शकतो' हे या "योद्ध्यां'नी सिद्ध करून दाखवले आहे. त्यांना जी अग्निपरीक्षा द्यावी लागली, तिला सामोरे जाण्याची वेळ आपल्यावर येऊ नये, यासाठी उर्वरित लोकांनी आरोग्याची आचारसंहिता काटेकोरपणे पाळली पाहिजे.
बेशिस्तीचा फटका
या आजाराच्या वाढत्या प्रसाराबद्दल सरकारला, तसेच महापालिका, महसूल विभाग, आरोग्य खाते, पोलिस या सगळ्यांना सरसकट जबाबदार ठरवले जात आहे. त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून जाब विचारले जात आहेत; पण यात नागरिकांची काहीच जबाबदारी नाही का? "कोरोना'च्या सार्वत्रिक फैलावास लोकांची बेशिस्त हेच मुख्य कारण आहे. साबणाने हात स्वच्छ धुणे वा सॅनिटायझर वापरणे, कुटुंबाबाहेर वावरताना शारीरिक अंतर राखणे, मास्क लावून नाक-तोंड सुरक्षित ठेवणे... टाळेबंदी असो वा नसो, सुरक्षित जगण्याचे हे नियम सर्वांनी अंगीकृत केले पाहिजेत; परंतु या सगळ्यांना हरताळ फासून स्वतःचा आणि इतरांचा जीव पणाला लावणारे महाभाग थोडे-थोडके नाहीत. आगामी काळात अशी बेजबाबदार मंडळी खऱ्या अर्थी धोकादायक ठरणार आहेत.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
"कोरोनायोद्ध्यां'ची कसोटी
पुण्यातील हा पाचवा लॉकडाउन दहा दिवसांचा होता. पाच दिवस कडक, उर्वरित दिवस थोडा शिथिल, असे त्याचे स्वरूप होते. तो लागू होण्याच्या आधी दोन-तीन दिवस रस्त्यांवर, दुकानांत जी प्रचंड गर्दी झाली, तिने या टाळेबंदीचा उद्देशच धुळीला मिळवला. आता निर्बंध उठल्यानंतर त्या अनुभवाची पुनरावृत्ती होणार नाही, याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. लोकांना शिस्त लावण्याच्या प्रयत्नांत अनेक सरकारी अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी यांना "कोरोना'ची लागण झाली. स्वतःच्या चुकीने आजार ओढवून घेतलेल्यांना बरे करताना काही डॉक्टर, परिचारिका रोगबाधित झाल्या. नागरिकांना सुरक्षित ठेवण्याचे कर्तव्य पार पाडत असताना विविध सरकारी खात्यांतील काही "कोरोनायोद्ध्यां'ना प्राणही गमवावे लागले आहेत. याला जबाबदार कोण? चूक कोणाची आणि भोग कोणाच्या वाट्याला?..
आपत्तीला तूर्त शेवट नाही
"कोरोना'वरील लशीच्या संशोधनाला यश येत असल्याच्या बातम्या अलीकडे येत आहेत. ही "संजीवनी' सर्वसामान्यांना उपलब्ध होईपर्यंत किती काळ जाईल, याची खात्री नाही. त्यामुळे दिवसाचे 24 तास काळजी घेत जगणे, याला पर्याय नाही. "भविष्यात आपले गाव वा शहर कोरोनामुक्त झाले, की आपण कायमचे निर्धास्त होऊ,' असे कोणी समजत असेल तर ते "अज्ञानातील सुख' म्हणावे लागेल. फक्त आपले शहर, जिल्हा, राज्य, देश यांच्यापुरते हे संकट मर्यादित नसून, ते वैश्विक आहे. त्यामुळे संपूर्ण जगातून हा आजार हद्दपार होईपर्यंत पहिल्यासारखे स्वास्थ्य कोणालाही लाभणार नाही. एखाद्या ठिकाणी "कोरोना'बाधित वाढणे - कमी होणे - एकही रुग्ण नसणे... या सर्व अवस्था तात्कालिक स्वरूपाच्या आहेत. त्यांत सतत सकारात्मक वा नकारात्मक बदल होणे अटळ आहे. जे गाव आज "कोरोना'मुक्त आहे, ते तसे कायम राहील, याची अजिबात शाश्वती नाही. कारण स्थानिक व्यक्तींचा संचार केवळ त्या गावात नव्हे, तर अन्य शहरांत, देशभरात होत असतो. बाहेरचेही लोक नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने गावोगाव ये-जा करीत असतात. अशा वातावरणात विषाणूच्या संक्रमणाचा धोका नेहमीच राहणार.
लशीची प्रतीक्षा
यावर, एकच उपाय आहे, तो म्हणजे आपण सतत सजग राहणे. टाळेबंदी उठली म्हणून वैयक्तिक आणि सामूहिक स्तरावर सर्व नियम झुगारून मुक्त वागणे, हे संकटाला निमंत्रण देण्यासारखे आहे. ते कटाक्षाने टाळले पाहिजे. कारण आज ना उद्या येऊ घातलेली "कोरोना'वरील लस सर्वांनाच हवी आहे. तिचा लाभ घेण्याची संधी मिळण्यासाठी आपली तब्येत ठीकठाक ठेवायलाच हवी ना?
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.