sachin tendulkar
sachin tendulkar 
संपादकीय

सचिनचा ‘स्ट्रेट ड्राइव्ह’ (अग्रलेख)

सकाळवृत्तसेवा

क्रीडाविषयक सगळी रचनाच आरपार बदलून तिथे चैतन्य आणण्याची गरज सचिनच्या विवेचनातून अधोरेखित झाली. त्यासाठी शासकीयच नव्हे तर सामाजिक, सांस्कृतिक पातळीवरही व्यापक प्रयत्न करायला हवेत.

छातीत धडकी भरावी, एवढ्या वेगाने एखाद्या गोलंदाजाने मारा करावा आणि सचिनने मात्र चेंडू अगदी सहजपणे बॅटच्या मधोमध घेत सीमापार भिरकावणारा स्ट्रेट ड्राइव्ह अशा काही नजाकतीने मारावा, की सगळ्यांनी स्तिमित होऊन पाहत राहावे! सचिनने क्रीडारसिकांना असा आनंदानुभव एकदा नव्हे असंख्य वेळा दिला आहे. पण मैदानाप्रमाणेच मैदानाबाहेरही अशीच लक्षवेधक कामगिरी तो करू शकतो, हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘मिशन यंग अँड फिटनेस’ कार्यक्रमाच्या उद्‌घाटनाच्या भाषणात त्याने दाखवून दिले. त्याने अगदी मूळ मुद्द्यालाच हात घातला आणि तसे करताना समाजात तयार झालेल्या एक प्रकारच्या दांभिकतेवर बोट ठेवले. या देशात खेळ आहेत, खेळाडू आहेत; पण क्रीडासंस्कृतीचा मात्र अभाव आहे, हे त्याच्या मर्मभेदी विवेचनाचे सार. त्याने मांडलेल्या मुद्द्यांची खरे तर देशपातळीवर चर्चा व्हायला हवी. सचिनने दिलेले व्याख्यान हे मोठा जनसमुदाय डोळ्यांसमोर ठेवूनच केले होते. खरा मुद्दा आहे तो आपण बदलण्याचा. जो काळ मुलांच्या जडणघडणीचा असतो, नेमक्‍या त्याच काळात पाठ्यपुस्तकी शिक्षणात विद्यार्थी इतका वेढला जातो, की खेळ आणि खेळाचे मैदान यांना तो दुरावतो. खेळ हा विषय म्हणून तोंडी लावण्यापुरता येतो. तो शिक्षणाचा अविभाज्य भाग झालेला नाही. ॲथलिटची निवड करण्यासाठी ज्यांना नेमले जाते ते निव्वळ उपचार म्हणून या जबाबदारीकडे पाहतात आणि समाजात तळापर्यंत कुठे ना कुठे असलेली गुणवत्ता संधीअभावी कुजून जाते, याकडे सचिनने लक्ष वेधले. क्रीडाविषयक सगळी रचनाच आरपार बदलून तिथे चैतन्य आणण्याची गरजच त्याच्या विवेचनातून अधोरेखित झाली.

खेळांविषयी; विशेषतः क्रिकेटविषयी अधिकारवाणीने बोलणाऱ्यांची देशात वानवा नाही. पण हे बोलणे आणि ही चर्चा केवळ टाइमपास या स्वरूपाची असते. महान खेळाडू जन्मावा; पण शेजारच्या घरात असाच सगळा व्यवहार असतो. ऑलिंपिकच्या निमित्ताने जगभरातले खेळाडू पदकांची लयलूट करीत असतात, तेव्हा तिथे भारत कुठेच कसा नाही, असा प्रश्‍न विचारणाऱ्यांची मात्र एकच भाऊगर्दी झालेली असते. या स्थितीला आपणदेखील जबाबदार आहोत, असे मात्र कुणालाच वाटत नाही. गेल्या जवळजवळ शतकभर आपण ऑलिंपिकमध्ये भाग घेत आहोत, त्या कालावधीत मिळविलेल्या पदकांची संख्या तिशीदेखील ओलांडत नाही. केनया अन्‌ जमैकासारखे छोटे देशही पदकतालिकेत मानाने मिरवतात; पण सव्वाशे कोटींचा हा देश हाताच्या बोटावर मोजता येतील, एवढ्या पदकांवर गुजराण करतो. जी मिळतात, तीदेखील खासगी पातळीवर केलेल्या प्रयत्नांमुळे. घरातून मिळालेला वारसा आणि एखाद्या खासगी संस्थेचे पाठबळ त्या यशामागे असते. पण देशव्यापी प्रयत्न त्यात दिसत नाहीत. यश, कीर्ती आणि पैसा या सर्वच बाबतीत शिखर गाठलेल्या खेळाडूंचे ‘आयकॉन’ आपल्याकडे तयार होतात; नाही असे नाही. पण या सगळ्याविषयीच्या दंतकथांनाच महत्त्व येते. एखादा रॉजर फेडरर किंवा नदालसारखे खेळाडू फोरहॅंडचे किमान हजार फटके मारण्याचा सराव दिसामाजी करतात, यासारखे रोकडे वास्तव आपण मुलांपुढे ठेवत नाही. हे रियाजाचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवावे लागेल. अनेक देशांतून अकरा ते चौदा या ऐन घडणीच्या वयोगटातच अशी मेहनत करून घेतली जाते. त्यातून तयार होते ती ‘मसल मेमरी’. सचिन ‘क्रीडासंस्कृती’चा उल्लेख करतो, तेव्हा हे सगळे त्याला अभिप्रेत असते. परंतु जोवर शाळांमधून कला-क्रीडा यांसारख्या विषयांकडे ‘ऑप्शनल’ या दृष्टीने पाहिले जाते, जोवर एक-दोन गुण वाढतात एवढ्याखातरच खेळाची कास धरली जाते, जोवर शहरनियोजनातील आरक्षणे हटविताना कारभाऱ्यांची वक्रदृष्टी मैदानांवर पडते, जोवर खर्चकपातीची पहिली कुऱ्हाड क्रीडा प्रशिक्षकांच्या पदांवर कोसळते, ‘आधी अभ्यास नीट कर तरच खेळायला जा’, असे जोवर घरांघरांतील आया-बापे मुलांना बजावतात, जोवर खेळाडूंच्या निवडीत वशिलेबाजी आणि खेळांच्या आयोजनात भ्रष्टाचार चालू आहे आणि जोवर सचिन तेंडुलकरच्या अशा प्रेरणादायी व्याख्यानाचे निमंत्रण उत्सुक तरुण विद्यार्थिवर्गाऐवजी फक्त संस्थाचालक आणि प्राचार्यांनाच दिले जाते, तोपर्यंत क्रीडासंस्कृतीची पहाट उगविण्याची आशा कशी काय करणार?

मुळात अशा प्रकारची संस्कृती ही केवळ पदके मिळविण्यासाठी आणि ढाली-ट्रॉफ्या मिरविण्यासाठी नसतेच. मैदानावरचेच नव्हे तर मैदानाबाहेरचे जगणे सुसह्य नि सुंदर करणे हे तिचे खरे म्हणजे लखलखीत वैशिष्ट्य असते. बक्षिसे हा आनुषंगिक परिणाम. जय-पराजयातून जगणे शिकविणाऱ्या खेळाचे हे खेळपण अंगी मुरविण्यासाठी सर्वव्यापी प्रयत्नांची गरज आहे. सचिनच्या या ताज्या ‘स्ट्रेट ड्राइव्ह’चा तोच संदेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: बिश्नोईने दूर केला तुफानी खेळ करणाऱ्या सुनील नारायणचा अडथळा, कोलकाताने गमावली दुसरी विकेट

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

SCROLL FOR NEXT