लस तयार करणं हा एका आजाराविरुद्धचा लढा आहे. पण तो यशस्वी व्हायचा असेल तर विज्ञानाने दाखवून दिलेला मार्गच अनुसरावा लागेल. उपाय आपल्याला हवा आहे; पण सुरक्षिततेची खबरदारी घेऊनच. त्यादृष्टीने ही सारी प्रक्रिया नेमकी समजून घ्यायला हवी.
गेल्या काही दिवसांत कोरोना विषाणुवरील लस हा केवळ उत्सुकतेचा व जिज्ञासेचा भाग राहिलेला नसून राजकीय, सामाजिक, वैज्ञानिक क्षेत्रातील चर्चेचा आणि काही अंशी वादाचाही विषय बनला आहे. लशीचे विज्ञान समजून घेतले तर अनाठायी घाई करणे किती धोक्याचे आहे हे कळू शकते. `द लॅन्सेट` या प्रख्यात नियतकालिकाच्या संपादकीयामध्ये असं स्पष्ट म्हटलं आहे की, `लस त्वरित यावी याकरिता स्पर्धा चालू आहे, असे दिसते. आपल्या सगळ्यांनाच एक उपाय हवा आहे. पण या उपायाबरोबरच सुरक्षितता ही सर्वोच्च महत्त्वाची बाब आहे.` त्यामुळे मला वाटतं हा लढा एका आजाराविरुद्धचा आहे. शास्त्रज्ञ त्यांचं काम अत्यंत कष्टाने करत आहेत आणि त्यांना सामाजिक, राजकीय आणि आर्थिक दबावाशिवाय काम करू दिलं पाहिजे.
लशींचे बरेच प्रकार आहेत; पण त्यामागचं शास्त्रीय तत्त्व एकच. लस घेतल्यानंतर ती रक्तात मिसळली, की ती त्या रोगाच्याविरुद्ध लढणारे प्रतिपिंडं शरीरात तयार करायला सुरवात करते. जेव्हा त्या विषाणू/जिवाणूचा संसर्ग या निरोगी माणसाला होतो तेव्हा ही प्रतिपिंडं त्या विषाणू किंवा जिवाणूला निकामी करतात आणि त्या आजारापासून लस घेतलेल्या माणसाचा बचाव होतो. जेव्हा लस तयार केली जाते तेव्हा ती निरोगी शरीरात गेल्यावर किती प्रमाणात प्रतिपिंडं तयार करते, शरीरात गेल्यावर किती काळाकरीता या लशीची परिणामकारकता टिकून राहते आणि त्याचा मानवी शरीरावर काही वाईट परिणाम होतो आहे का, हे सगळं पडताळून बघितलं जातं. त्यासाठी `प्रीक्लीनिकल स्टडीज` होतात. म्हणजेच प्राण्यांवर चाचण्या घेतल्या जातात आणि त्यानंतर `क्लिनिकल स्टडीज`मध्ये त्या माणसांवर घेतल्या जातात. वेगवेगळ्या मापदंडाचा अभ्यास करून प्राण्यांवर घेतलेल्या चाचण्यांचे परिणाम नीट पडताळून मग पुढे क्लिनिकल चाचण्या सुरु करायच्या की नाही हे `ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया` ठरवतात. त्यानंतरच `क्लिनिकल डेव्हलमेंट`चा टप्पा येतो, जिथे क्लिनिकल चाचण्या केल्या जातात. या चाचण्या टप्पा १,२,३ आणि ४ अशा प्रकारात असतात. यामध्ये निरोगी माणसांवर या लशीच्या चाचण्या होतात. कधीकधी पहिल्या तीन चाचण्या उत्तीर्ण केल्या असल्या, तर लस बाजारात आणून मग चौथ्या टप्प्यातल्या चाचण्या एकीकडे चालू ठेवल्या जातात.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
जेव्हा पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा यातील क्लिनिकल चाचण्या सुरु होतात, तेव्हा निरोगी माणसांवर त्या घेण्यात येतात. त्यांना ही लस देऊन, त्यांच्या शरीरात प्रतिपिंडं तयार झाली की विशिष्ट दिवसांनी मग त्या माणसाचं रक्त (सेरा) काढून प्रयोगशाळेमध्ये लाईव्ह जिवाणू/विषाणूंच्या स्ट्रेनच्या कल्चरबरोबर एकत्र केलं जातं. जर तो जिवाणू/विषाणू वाढला नाही आणि नष्ट झाला तर याचा अर्थ त्या माणसामध्ये लशीने आपलं काम केलं आहे. याला “व्हायरस / बॅक्टेरियल न्यूट्रलाईझेशन” म्हणतात. तसंच प्रतिपिंडं शरीरात किती काळ राहतात हेसुद्धा तपासणं गरजेचं असतं. याला `लॉन्ग टर्म इफिकसी` असं म्हणतात. हे झालं एका माणसाच्या बाबतीत. जास्त संख्येच्या माणसांवर (स्वयंसेवकांवर) जेव्हा या चाचण्या घेतल्या जातात, तेव्हा जैवसांख्यिकी मापदंड लावून मग या लशीच्या उपयुक्ततेचा आणि सुरक्षिततेचा अभ्यास काळजीपूर्वक केला जातो आणि म्हणून क्लिनिकल चाचण्यांचे चार टप्पे असतात. या लशीच्या उपयुक्ततेचा आणि सुरक्षिततेचा अभ्यास काळजीपूर्वक केला जातो. फेज तीन क्लिनिकल चाचण्या जोपर्यंत नीट आणि व्यवस्थितरित्या पार पडत नाहीत, तोपर्यंत लस बाजारामध्ये नक्की कधी येऊ शकते, हे सांगता येणं कठीण असतं.
आता आपण कोरोनाच्या लशीसंबंधातलं जगभरात चालू असलेलं संशोधन थोडक्यात बघूया. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार जगभरात सध्या कोरोनाच्या लशीकरता २४ कँडिडेट्स आहेत. यामधल्या `सायनोव्हॅक`, `ऑक्सफर्ड विद्यापीठ, एस्ट्राझेनका` यांची कॅव्हिशिल्ड, चीनमधील `कॅनसिनो बायोलॉजिकल` यांच्या लशी तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचण्यांपर्यंत पोहोचल्या आहेत. ऑक्सफर्डच्या कोरोना व्हॅक्सिनच्या टप्पा एक आणि टप्पा दोनच्या क्लिनिकल चाचण्यांसंदर्भातला संशोधन प्रबंध ‘द लॅन्सेट’ या नियतकालिकात नुकताच प्रकाशित झाला आहे. ऑक्सफर्ड विद्यापिठामधील प्रो. सारा गिलबर्ट, प्रो. अँड्रयू पोलार्ड, जेन्नर इन्स्टिट्यूटचे संचालक प्रो.एड्रियन हिल, जेन्नर इन्टिट्यूटमधील सहायक प्राध्यापक डॉ. टेरेसा लॅम्बे यांच्या नेतृत्वाखाली अनेक शास्त्रज्ञ या संशोधन पथकात आहेत. २३ एप्रिल ते २१ मे या काळात पहिल्या आणि दुसऱ्या टप्यातील क्लिनिकल चाचण्या १०७७ रुग्णांवर घेतल्या गेल्या. `लॅन्सेट`च्या संशोधन निबंधात नमूद केलेल्या संशोधन निष्कर्षांचे सार लक्षात घ्यायला हवे. लस दिल्यावर कोरोना विषाणूला ती लस किती प्रमाणात न्यूट्रलाइज करू शकते, यावरून ती लस विषाणूला रोखण्यात किती प्रभावी ठरते, हे आपल्याला कळतं. यासाठी `न्यूट्रलाइजिंग अँटीबॉडी रीस्पॉन्स` बघितला जातो. ही लस दिल्यानंतर नुसतेच प्रतिपिंड नाही, तर टी सेल रिस्पॉन्स देखील मोजला जातो. एलायझासारख्या चाचण्या हा प्रतिसाद मोजण्याकरिता वापरल्या जातात. कोरोना झाल्यावर त्याविरुद्ध लढण्यासाठी प्रतिपिंडांची गरज असते आणि जर कधी आपल्याला परत कोरोना झाला तर हे `टी सेल` लक्षात ठेवून परत तेच प्रतिपिंड बनवायची सूचना देतात. म्हणून ह्युमोरल इम्युनिटी, जी हे प्रतिपिंडं तयार करते आणि सेलूयलर इम्युनिटी जी `टी सेल` तयार करते; या दोन्हीही अत्यंत गरजेच्या असतात आणि लस दिल्यावर या दोन्हीचे प्रतिसाद मोजणं आणि त्यांचा अभ्यास करणं महत्त्वाचं ठरतं. ऑक्सफर्ड विद्यापीठाने या दोन्ही बाबी लक्षात घेऊन सर्व चाचण्या केल्या आहेत. त्यांना `सार्स कोव्ह- २`च्या (कोरोना विषाणू) विरुद्ध मिळालेला `न्यूट्रलाइजिंग अँटीबॉडी रीस्पॉन्स` हा सिंगल डोस करिता ९१ टक्के ( ३५ पैकी ३१ सब्जेक्टस्) होता आणि डबल डोसकरीता १०० टक्के ( ३५ पैकी ३५ सब्जेक्टस्) होता. बूस्टर डोस दिल्यानंतर सर्व या चाचण्यांमध्ये सहभागी असलेल्या सर्व माणसांमध्ये १०० टक्के न्यूट्रलाइजिंग रिस्पॉन्स आढळून आला. याचाच अर्थ हा की ऑक्सफर्ड विद्यापीठाची कोरोनावरील लस सुरक्षिततेचा घटक दाखवते आहे. तसंच या लशीचे होमोलॉगस बुस्टिंग ( म्हणजे लशीचे एका पाठोपाठ असे काही काळाने दिले जाणारे डोसेस) प्रतिपिंडाचा रिस्पॉन्स वाढवत आहे, म्हणजेच लशीची परिणामकारकता वाढवतं आहे. ही लस ह्युमोरल आणि सेल्युलर असे दोन्हीही इम्युनॉलॉजिकल रिस्पॉन्स दाखवते आहे आणि त्यामुळे सध्या सुरु असणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांसाठी ही अत्यंत आशादायक आणि आनंदाची बाब आहे.
सध्या भारतात `कोरोना`च्या लशीवर पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील चाचण्या घेण्याची मुभा दोन कंपन्यांना मिळाली आहे “कोव्हॅक्सिन” या नावाने भारत बायोटेक आणि `आयसीएमआर` बनवत असेलेली लस आणि दुसरी म्हणजे “झायकोव्ह डी” झायडस कॅडीला या कंपनीची `डीनए प्लाझमिड बेस्ड लस`. तसंच पुण्यातल्या `जिन्होव्हा बायोफार्मास्युटिकल` या कंपनीच्या `एमआरएनए बेस्ड` लशीलादेखील नुकतीच पहिल्या टप्प्यातील क्लिनिकल चाचण्यांसाठी परवानगी मिळाली आहे. ऑक्सफर्डच्या लशीने तिसर्या टप्प्यातील चाचण्या व्यवस्थित पार पाडल्या की भारतामधील `सिरम इन्टिट्यूट ऑफ इंडिया` ही कंपनी या लशीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करेल, असं आदर पूनावाला यांनी स्पष्ट केलंच आहे.
( लेखिका `इकोसोल`कंपनीत संशोधनप्रमुख आहेत. लेखातील मते वैयक्तिक.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.