व्लादिमीर पुतीन ९ ऑगस्ट १९९९ रोजी रशियाचे हंगामी पंतप्रधान बनले. याच दिवशी रशियाने आपले भविष्य निश्चित केले. सुरवातीला कोणाच्याही खिजगणतीत नसलेला हा नेता जनतेच्या गळ्यातील ताईत बनला. जनतेला एक खंबीर आणि एकहाती निर्णय घेणारा शक्तिशाली नेता मिळाला. सुधारणावादी भूमिकेतून सुरू झालेला त्याचा प्रवास आता एकाधिकारशाहीपर्यंत पोचला आहे. पुतीन यांच्या प्रत्येक निर्णयाचे समर्थन करणारी जनता आता त्यांच्याविरोधातच रस्त्यावर उतरू लागली आहे.
तत्कालीन अध्यक्ष बोरीस येल्त्सिन यांनी रशियाची गुप्तहेर संघटना ‘केबीजी’चे माजी हेर असलेले पुतीन यांना हंगामी पंतप्रधानपदाची संधी दिली. तो दिवस होता ९ ऑगस्ट १९९९. त्या वेळी या नियुक्तीकडे कोणीही फारसे गांभीर्याने पाहिले नाही. येल्त्सिन यांच्या कार्यकाळात तीन पंतप्रधान आले अन् गेले. त्यामुळे पुतीन यांच्याबद्दल फार काही विचार करण्याची आवश्यकता कोणालाच वाटली नव्हती. पंतप्रधानपद स्वीकारल्यानंतर सहा महिन्यांच्या आतच येल्त्सिन यांनी अनपेक्षितपणे १९९९ मध्ये अध्यक्षपदाची माळ पुतीन यांच्या गळ्यात घातली. येथूनच ते रशियाचे निर्विवाद नेते बनले.
पुतीन यांना सुरवातीच्या काळात जनतेचे समर्थन मिळण्याचे कारण होते, त्यांनी केलेला बळाचा वापर. रशियात सप्टेंबर १९९९ मध्ये अनेक शहरांमध्ये साखळी बाँबस्फोट झाले. ही संधी साधत पुतीन यांनी दहशतवाद संपविण्याची भाषा सुरू केली आणि त्यासाठी पावले उचलली. जनतेचा याला पाठिंबा मिळावा यासाठी त्यांनी देशात आक्रमक राष्ट्रवादाला खतपाणी घालणारे वातावरण निर्माण केले. रशियातील बाँबस्फोटांना मुस्लिम मूलतत्त्वाद्यांच्या हात असल्याचे तपास यंत्रणांना सांगितले. मात्र, यामागे सरकारचाच हात असल्याचा आरोप करणाऱ्या विरोधकांचाही संशयास्पद मृत्यू झाला. सरकारी यंत्रणेचा वापर करीत पुतीन यांनी ते शक्तिशाली नेते असल्याचे जनतेच्या मनावर बिंबविले. रशियाला जागतिक पातळीवर मानाचे स्थान पुतीनच मिळवून देऊ शकतील, असे वातावरण निर्माण करण्यात आले. सोव्हिएत महासंघाच्या विघटनानंतर जनतेला पुन्हा भव्यदिव्य स्वप्न त्यांनी दाखविले.
आता सध्याचे रशियातील वातावरण पाहा. पुतीन हे देशाचा एकहाती कारभार सांभाळत आहेत. त्यांची पोलादी पकड सुटावी, यासाठी हजारो नागरिक आता रस्त्यावर उतरू लागले आहेत. या नागरिकांचा आवाज सरकार बळाचा वापर करून दाबून टाकत आहे. सरकार कोणालाही विनाचौकशी तुरुंगात डांबून राष्ट्रद्रोही ठरवत आहे. पुतीन यांनी विरोधी पक्षांचे अस्तित्व केवळ नावालाच ठेवले आहे. अर्थव्यवस्थेला लागलेली घसरण, बेरोजगारी, जीवनमानाचा खालावणारा दर्जा यामुळे तरुणांच्या मनात सरकारविरोधात मोठा असंतोष आहे. राष्ट्रवाद, लोकानुनयी भावनिक मुद्दे यापेक्षा पोटाचा प्रश्न महत्त्वाचा असतो, हे तेथील जनतेला आता कळू लागले आहे.
देशात सध्या पुतीन यांना कोणताही राजकीय पर्याय दिसत नाही; परंतु देशातील परिस्थिती पाहता जनतेची भावना आता पुतीन नकोत अशीच आहे. पुतीन यांचा कार्यकाळ २०२४ ला संपत आहे. त्या वेळी त्यांनी पायउतार होणे बंधनकारक आहे. मात्र, इतर काही मार्ग काढून सत्तेवर कायम राहतील, अशी भीती जनतेच्या मनात आहे. यामुळे रशियावरील पुतीन यांची पोलादी पकड सुटण्याची शक्यता धूसर आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.