Qalandar Waghru animal
Qalandar Waghru animal sakal
संपादकीय

भाष्य : झुंज छोट्या वाघरांची...

संतोष शिंत्रे

मार्जारकुळातील मोठे सभासद वगळता सुमारे अकरा प्रकारचे प्राणी आपल्याकडे आढळतात. ती सर्वच छोटी, एकांडी, अत्यंत लाजाळू अशी विविध प्रकारची वाघरे आहेत. विलक्षण सुंदर, रुबाबदार अशा ही वाघरे नामशेष होण्याच्या वाटेवर आहेत. त्यांचे संवर्धन गरजेचे आहे.

वाघ, चित्ते, बिबळे व सिंह हे मार्जारकुळातील मोठे सभासद वगळूनही, भारतीय उपखंडामध्ये मार्जारकूळ छोट्या व मध्यम आकाराच्या सभासदांच्या भरपूर वैविध्याने नटलेले आहे. असे सुमारे अकरा प्रकारचे प्राणी आपल्याकडे आढळतात. ही सर्वच-छोटी वाघरे, एकांड्या शिकारी करणारी, अत्यंत लाजाळू रीतीने आपल्या सवयींनुसार कालक्रमणा करणारी असल्यामुळे त्यांच्या सवयींचा अभ्यास करणे खूप अवघड असतेच, पण त्यांचे दर्शनदेखील दैवदुर्लभ असते.

मात्र हे सर्वच सभासद विलक्षण सुंदर आणि रुबाबदार असतात. मुख्य म्हणजे, त्यांच्या अधिवासातील अन्नसाखळीच्या ती शिरोभागी असल्याने, ती धड राहिली तरच तिथल्या सृष्टीव्यवस्था तग धरून राहतात. पैकी काहींची आता अस्तित्वासाठीच झुंज सुरू झाल्याचे दिसते. त्यांच्या संरक्षण-संवर्धनासाठी राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण महामंडळासारखी स्वायत्त यंत्रणा आता सर्वाधिक गरजेची आहे.

सर्वाधिक संकटात आहे ते यातले ‘कॅराकल’ -मराठी नाव ‘कलंदर’. कमी उंचीच्या टेकाडांवर अथवा वाळवंटी प्रदेशात जगण्यासाठी जुळवण झालेले वाघरू. राजस्थान, कच्छ, पंजाबच्या उत्तरेकडील भाग हे त्याचे अधिवास. सडपातळ, सुमारे सोळा किलो वजन. अंगावर तांबडी किरमिजी फर. ही वाघरे अविश्‍वसनीय रीतीने चपळ असतात.

इतकी, की वाळवंटी ससे पळू लागताक्षणीच त्यांना कलंदरने पकडलेले असते. किंवा बचावासाठी पकुर्ड्यांनी (सँडग्राऊझ) हवेत उड्डाण करताच ते उडी मारून त्यांना पकडू शकतात. आजमितीला भारतभरात जेमतेम पन्नास इतकीच या प्राण्यांची संख्या असावी. एखादी जात टिकायची असेल तर कमीत कमी एक हजार इतकी संख्या आवश्यक असते. आशियाई चित्त्यानंतर नामशेष होण्याची पुरेपूर शक्यता कलंदरची वर्तवली गेली आहे.

मध्य भारतात आणि पंजाबमध्ये तर अधिवास असूनही त्यांना गेली पन्नास वर्षे कुणीच पाहिलेले नाही. त्यांची संख्या कमी होण्याची मुख्य कारणे म्हणजे चोरटी शिकार आणि अवैध व्यापार हीच होती. पण गेल्या काही वर्षात तसे काहीच प्रकार घडलेले नसूनही अधिवास नष्ट होत गेल्याने त्यांच्यावर ही वेळ आली आहे. जंगलापेक्षा माळरानावर ते जास्त आढळत असल्याने, अशा जमिनींमध्ये कॅमेरा ट्रॅप लावून पाहणी करायला हवी, ते झालेले नाही.

झाडवाघरू/ढगाळ बिबट्या (Clouded leopard), सोनवाघरू (Golden cat) आणि झाडमांजर (Marbled cat) ही ईशान्येकडील राज्यांमध्ये आढळणारी गोंडस, सुंदर वाघरे. त्यांच्यापैकी झाडवाघरांची वृक्षांवर चढण्याची, वावरण्याची क्षमता इतर सर्वांपेक्षा जास्त असते. त्यांचे सुळेही वाघरांमध्ये सर्वात मोठे असतात. २०२१च्या ‘आययूसीएन’ अहवालात त्यांची जगभरात संख्या तीन हजार ७०० ते पाच हजार ५८० इतकीच उरली होती.

ईशान्येकडील सदाहरित, घनदाट पर्जन्यवनांमध्येच सोनवाघरुही (गोल्डन कॅट) सापडते. त्यांचे शरीर ठिपकेविरहित, सोनसळी लाल रंगाचे असते. गालावर मात्र गडद आणि फिके अशा दोन्ही प्रकारचे पट्टे असतात. सामान्यतः कलंदरपेक्षा ते चणीने थोराड असतात आणि त्यांची शेपटीही अधिक लांब असते. पिसोरी इ. छोटी हरणे आणि हरणांची लहान पिले हा त्यांचा सर्वसाधरण आहार असतो.

जरी ते सहजी झाडांवर चढू शकत असले, तरी त्यांचा अधिक सहज वावर हा जमिनीवर कोसळलेल्या मोठ्या खडकांदरम्यान नोंदला गेला आहे. झाडमांजर (Marbled cat) ही याच भागांमधली वाघरांची आणखी एक छोट्या चणीची, भित्री जमात. झुपकेदार लांब शेपूट आणि त्यावर तपकिरी मळकट रंगात असणारी सुरेख नक्षी, तीही काळ्या आणि गडद करड्या रंगांची हे या जातीचे वैशिष्ट्य.

ही जात संपूर्णपणे वृक्षनिवासी (arboreal) आहे. विश्रांती घेणारे पक्षी, खारी आणि अगदी कीटकदेखील झाडमांजरांचे भक्ष्य असतात. मोठे प्राणी मारण्यातील धोके वाढले, तशी तस्करांची नजर या सर्व वाघरांवर गेली. त्यांना मारून त्यांची मऊशार फर, कवट्या, हाडे, पंजे दात सर्वच अवयव वाघाचे म्हणून खपवले जात असतात. सांप्रत काळी मिझोराम राज्यातील चांफाई जिल्हा हा या वाघरांच्या सीमापार तस्करीचा हॉटस्पॉट गणला जातो.

मे २०२२ मध्ये एकाच धाडीत तिथे अनेक साप, कासवे, बीव्हर, जंगली मांजर इत्यादी ४६८ जातींचे प्राणी पोलिसांना सापडले होते. हा भाग म्यानमारलगत असल्याने सीमा सुरक्षा दले इथे खूप सक्रिय नाहीत. तियाउ नदी जिथे मिझोराम आणि म्यानमार यांना वेगळा करते, तिथले घनदाट जंगल त्यामुळेच अशा तस्करीला वरदान ठरते. इथे गस्त वाढवली गेलीच पाहिजे.

लडाखमधील वाघरेही धोक्यात

हिम-बिबळ्या (Snow leopard), पहाडमांजर (Lynx) आणि आयाळ-मांजर (Palass’s cat) ही वाघरे लडाखमधली. हिम-बिबळ्याचा काहीसा तरी अभ्यास झाला आहे. आपली विष्ठा पाळीव मांजराप्रमाणे मातीत पुरण्याच्या सवयीमुळे पहाड मांजर या वाघराचा अभ्यास अवघड होतो.

पहाडमांजर वजनाला एका मोठ्या कुत्र्याइतके असते. (२५ किलोंपर्यंत वजन). त्याचे कान लांब आणि टोकदार असतात, पण त्यांच्याशी अत्यंत विजोड अशी टोकाकडे काळी असलेली छोटी शेपूट असते. त्यांची घ्राणेन्द्रिये तीक्ष्ण असल्याने भक्ष्याच्या वासावरून ते शिकार साधतांना दिसतात. स्थानिक असे हिमकोंबडे, ससे, मॉर्मोट प्राणी हे त्यांचे खाद्य.

आयाळ-मांजर या अत्यंत छोट्या प्राण्यांची शेपूट चांगलीच झुपकेदार असते. फर जाडजूड आणि डोक्यावर काळा ठिपका. कान खूप आखूड, गोल असतात. ससासदृश दिसणारे ‘पिका’/पायका प्राणी, चुकोर हे त्यांचे अन्न. इतर वाघरांपेक्षा वेगळे म्हणजे त्यांच्या डोळ्यातील बाहुल्या गोल असतात. छोटे असले तरी त्यांचे वावर-क्षेत्र शंभर किलोमीटर इतके असू शकते.

या तीनही जातींना सध्या सर्वात मोठा, वेगळाच धोका आहे तो म्हणजे भटक्या कुत्र्यांचा. तिथले दोन प्रमुख संरक्षित प्रदेश म्हणजे चांगथांग आणि काराकोरम, या दोन्हीत मिळून सात हजारांवर भटकी कुत्री फिरत असतात. इथे माणसाकडून मारले जाणाऱ्या वन्य प्राण्यांपेक्षा कुत्र्यांकडून ते अधिक मारले जातात.

दुसरा धोका म्हणजे या वाघरांचे अधिवास असणाऱ्या खडकाळ भागातून जेव्हा रस्ते जातात, तेव्हा त्यांच्या शिकारीच्या, वावराच्या जागांवर परिणाम होतो. छोटी वाघरे अधिवासातील छोटे बदलही सहन करू शकत नाहीत. पाणवाघरू (Fishing cat), सोनवाघरू (गोल्डन कॅट), रानमांजर (Jungle cat), वाघाटी (Leopard cat). माळमांजर (desert cat), धाकली माळमांजर (rusty spotted cat) ही आपल्या इथली अन्य काही सुरेख वाघरे.

या सर्वच जातींना रस्त्यांवर अपघात, शिकार, कीटकनाशकांचा वापर, पाळीव मांजरांबरोबर संपर्क येऊन संकर, ढासळते हवामान, अधिवास/भक्ष्य नष्ट होणे या संकटांचा सामना करावा लागतो. २०२१मध्ये पर्यावरण खात्याने एका जागतिक संस्थेबरोबर अशा एकंदर बावीस जातींच्या प्राण्यांच्या संवर्धन-संरक्षण कार्यक्रम सुरू केला होता.

पण त्याचे चांगले परिणाम अद्याप दिसलेले नाहीत. केवळ वाघ-सिंह (आणि सत्ताधाऱ्यांच्या हट्टाने आयात करून मरत राहिलेले चित्ते) या ‘मानाच्या गणपतीं’ पलीकडे आता संवर्धनाचे प्रयत्न हवेत. तरच मनीमावशीची ही छोटी भाचरे सुखाने नांदतील!

(लेखक पर्यावरणाचे अभ्यासक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi Death: इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या हेलिकॉप्टर अपघातामागे षडयंत्र आहे का, नेमकं काय घडलं? इस्रायलच्या भूमिकेबाबत मोठा दावा!

Rohit Sharma : क्रिकेटपटूंची गोपनीयता जपा! ; मुंबई इंडियन्सचा खेळाडू रोहित शर्मा आयपीएल ब्रॉडकास्टरवर भडकला

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.३३ टक्के मतदान

Kalyan News: देशाच्या विकासासाठी मतदार महायुतीच्याच बाजूने, विश्वनाथ भोईरांचे वक्तव्य

Akshay Kumar : अक्षयचा दिलदारपणा; जॉली एलएलबीचं शूटिंग पूर्ण होताच केली 500 मुलींना मदत

SCROLL FOR NEXT