नअस्कार! ‘‘संध्याकाळच्या सुमारास रोज नट्टापट्टा करुन कुठे जाता हो,?’’ या उर्मट सवालाकडे तितक्याच उर्मटपणाने दुर्लक्ष करुन मी रिक्षा पकडली.
नअस्कार! ‘‘संध्याकाळच्या सुमारास रोज नट्टापट्टा करुन कुठे जाता हो,?’’ या उर्मट सवालाकडे तितक्याच उर्मटपणाने दुर्लक्ष करुन मी रिक्षा पकडली. रिक्षावाल्यास म्हटलं, ‘‘सदाशिव चलो!’’ तर तो चटकन म्हणाला, ‘‘ परसोत्तम को जाना है क्या? चलो, मैं वहीं जा रहा हूं…’’ पुण्यातल्या रिक्षाचालकाची अभिरूची पाहून अभिमान वाटला…
तसं बघायला गेलं तर (आमच्या) पुण्यात ॲम्फीथिएटरं आणि एकांकिका स्पर्धांचा सुकाळु आहे. पुरुषोत्तम, फिरोदिया, विनोदोत्तम…बऱ्याच चांगल्या चांगल्या स्पर्धा होत असतात. पण…पण…विश्वाचा केंद्रबिंदू म्हणून त्रैलोक्यात प्रसिद्ध असलेली आमची सदाशिव पेठ. त्या सदाशिव पेठेचं केंद्रक म्हणजे भरत नाट्य मंदिर, आणि तिथं नव्या कलावंतांची वाट पाहात तिष्ठणारा पुरुषोत्तम करंडक हे त्या केंद्रकाचं केंद्रक!!
‘जीवलगा, कधी रे नेशील तू?’ असं जणू तो करंडक तरुण कलावंतांना विचारतो आहे. इथंच महाराष्ट्राच्या नाट्यकलेची गंगोत्री आहे बरं का! या करंडकातून कितीतरी नामवंत सेलेब्रिटी भळाभळा बाहेर पडले. (अरे, सारंग, निपुण, आलोक, अतुल, पर्ण, गिरीजा, अमेय… ऐकताय ना?तुम्हाला सेलेब्रिटी म्हणतेय..!! )तेथे सध्या तारुण्याचा जो उत्सव सुरु आहे, त्याला तोड नाही. राजकारणातली नाटकं काय बारमाही चालू असतात, पण इथं पुरुषोत्तम करंडकासाठी महाविद्यालयातली मुलं-मुली जे काही करताहेत, ते बघून च्याट पडायला झालं...
भरत नाट्यमंदिरातलं वातावरण भारलेलं होतं. पहावं तिथं तारुण्याचे ताटवे. ती बॅकस्टेजची धावपळ. तोंडाला रंग लावून विंगेत उभी असलेली ती हुरहुरलेली मुलं. मागल्या बाजूनं नेपथ्याचे फलाट आणण्याची धडपड…केस पिकलेल्या बुजुर्गांच्या अखेरच्या क्षणी येणाऱ्या सूचना. नाट्यगृहातल्या आरोळ्या…मन कैक वर्षं मागे गेलं. तरी बरं, मी अजून तरुण आहे! ‘महाराष्ट्रीय कलोपासक’तर्फे पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेचं करडं आयोजन केलं जातं. आयोजनात इतका करडेपणा असतो की काही लोक त्याला ‘पुरुषोत्तम करडक’ असंच म्हणतात. पण ते असो.
‘पुरुषोत्तम’मध्ये रंगायला मिळावं म्हणूनही अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी कॉलेजांमध्ये प्रवेश घेतात, ही वस्तुस्थिती आहे. काही तर मुक्कामी राहतातसुद्धा!! गेल्या महिनाभरात प्राथमिक फेरी पार पडली. ५१ मधल्या नऊ एकांकिका अंतिम फेरीत आल्या आहेत. अंतिम फेरीत प्रवेश केलेल्या एकांकिकांमध्ये तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय (बारामती) ची ‘भू भू’, फर्ग्युसन महाविद्यालयाची ‘आद्य’, डीवाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय (आकुर्डी) ची ‘एक्स्पायरी डेट’, कमिन्स अभियांत्रिकीची ‘चाराणे’, पीआयसीटी महाविद्यालयाची ‘कलिगमन’, मॉडर्न कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय (शिवाजीनगर) ची ‘गाभारा’, मॉडर्न महाविद्यालय (गणेशखिंड) संघाची ‘अहो, ऐकताय ना’, अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे संघाची ‘ओंजळभर चंद्र’ आणि टिकाराम जगन्नाथ महाविद्यालय संघाची ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटील’ या एकांकिकांचा समावेश आहे.
गेल्या वेळेला बीएमसीसीनं करंडक नेला होता. काय अप्रतिम एकांकिका होती- ‘मंजम्मापुरामण’! दुसऱ्या क्रमांकाची नगरच्या पेमराज सारडाची ‘सहल’ही टॉप क्लास होती. यंदा हे दोन्ही संघ फायनलला आले नाहीत. याऊलट ‘पीआयसीटी’च्या संघाला नशिबाच्या चिठ्ठीनं हात दिला, म्हणून स्पर्धेत स्थान मिळालं, आणि आज ही मंडळी चक्क फायनलला आली आहेत! नाट्यकलेचा प्रवाह बदलतोय, याचंच हे चिन्ह म्हणायचं. शनिवार-रविवारी सकाळ-संध्याकाळच्या तीन सत्रात नऊ एकांकिका होतील. रविवारी रात्री करंडकाचा धनी ठरेल! नेमकं कोण फेवरिट आहे, हे मी काही सांगणार नाही. हा उत्साह, एनर्जी अशीच टिकून राहो!! आखिर विश्वाच्या केंद्राच्या इज्जतीचा सवाल आहे. अरे, आव्वाज कुणाचा…पुरुषोत्तमचा!!
या स्पर्धेत उतरलेल्या सर्वच कलावंतांना आणि नवरंगकर्मींना शुभेच्छा! ओंजळभर चंद्र.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.