Hous of Bamboo
Hous of Bamboo sakal
संपादकीय

हौस ऑफ बांबू : आधी बीज एकले..!

कु. सरोज चंदनवाले

एक थोर साहित्यिक आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये व्हिलनची कामे करणारा एक दिग्गज मराठी अभिनेता पुण्यात रामी हाटेलात दडून बसल्याची खबर गेल्या आठवड्यात लागली.

नअस्कार! अश्मयुगापासून सिंधु नदीच्या अलीकडे कधीही झाले नाहीत, असे एक थोर साहित्यिक आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये व्हिलनची कामे करणारा एक दिग्गज मराठी अभिनेता पुण्यात रामी हाटेलात दडून बसल्याची खबर गेल्या आठवड्यात लागली. खबरी म्हणाला की, मी माणसं पाहिली नाहीत, पण मिश्या पाहिल्या.

‘पण मिशा म्हंजे तंतोतंत मिशाच का?’’ मी विचारलं. तर खबरी म्हणाला की हुबेहूब मिशाच. मग मी मागावर गेले. रामी हॉटेलाच्या लॉबीतच मला त्या दोन मिशा दिसल्या. त्या मिशांमागील दोन दिग्गजही दिसले. ते दुसरे तिसरे कोणीही नसून आमचे लाडके लेखक ज्ञानपीठकार रा. भालचंद्र नेमाडे आणि ज्येष्ठ अभिनेते सयाजीराव शिंदे होते. दोघांच्याही पाठीवर पोती होती... त्याचा उलगडा गेल्या २५ तारखेला म्हणजेच मंगळवारी झाला.

रा. सयाजीराव शिंदे हे जेव्हा दाक्षिणात्य हिरोंवर अन्याय करत नसतात, तेव्हा महाराष्ट्रभर हिंडून बिया पेरत असतात, हे किती लोकांना माहीत आहे? त्यांची सह्याद्री देवराई नावाची एक संस्थाही आहे. गेल्या काही वर्षात महाराष्ट्रातले ग्रीन कव्हर वाढले आहे, असे अहवाल येत आहेत. त्याला कारणीभूत हे सदगृहस्थ!! त्यांनीच रा. नेमाडे यांच्या बीजतुलेचा घाट घातला होता…हा उपक्रम स्तुत्यच आहे. यापासून धडा घेऊन अन्य थोर साहित्यिकांनीही आपापली वजनं वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्नाला लागावे, असं नम्र आवाहन मी इथं करत्ये. जेणेकरुन महाराष्ट्रात अधिकाधिक हिरवाई निर्माण होईल.

मंगळवार, दि. २५ एप्रिल : कर्वेनगरमधल्या डीपी रोडवर गोल्डन लीफ लॉन नावाचे एक ठिकाण आहे. तिथे एक मंच उभारण्यात आला होता. मंचावर एक तराजू होता. (तो मंडईतून कांदेबटाटेवाल्याकडून उसना आणण्यात आला असावा!) तराजूत धोतर-सदरा, आणि फेटाधारी रा. नेमाडे पाय मुडपून बसले होते. दुसऱ्या तागडीत पोतीवजा पिशव्या होत्या. तराजूच्या आसपास माणसे होती. तागडी पिशव्यांनी भरली, तरी पारडं हलेना! अखेर चतुर सयाजीराव शिंदे यांनी तुळशीच्या बिया चपळाईने पिशव्यांवर टाकताच, रा. नेमाडेजींसकट पारडे वर आले! (याला म्हणतात हिंदू : भाग दोन!! )

पिशवीवजा पोत्यांमध्ये देशी झाडांचं बी-बियाणं होतं. रा. नेमाडे यांचा साहित्यातला देशीवाद आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यताप्राप्त झाला आहे. ज्या मातीत जन्मलो, त्या मातीशी कृतज्ञताभाव म्हंजे देशीवाद अशी साधीसोप्पी व्याख्या या सिद्धांताची करण्यात येते. (अधिक तपशीलासाठी संपर्क साधा.: रा. नेमाडे यांच्याशीच!) पिशव्यांमध्ये शेवगा, वड, पिंपळ, जांभूळ, आंब्याच्या कोयी आदी वृक्षांच्या बिया होत्या असं समजलं. या बिया महाराष्ट्रातील अनेक विचारवंत, लेखक, अभिनेते आणि पर्यावरण कार्यकर्त्यांनी गोळा केल्या होत्या म्हणे. कमाल आहे! मराठी साहित्यिक जांभळं खाऊन जांभळ्या जिभांनिशी बिया पिशवीत जपून ठेवताहेत, हे चित्र डोळ्यासमोर प्रयत्न करुनही उभं राहात नव्हतं.

ज्यांच्या साहित्याच्या छायेत मराठी भाषा वाढली, त्या थोर लेखकाच्या बीजतुलेतून उगवलेल्या या बिया आता महाराष्ट्रभरातील पांथस्थांना गारीगार सावली देतील. या कल्पक तुलासोहळ्याखातर रा. सयाजीराव शिंदे यांचं अभिनंदन! आणि पाय मुडपून तराजूत बसल्याबद्दल रा. नेमाडेसरांचेही आभार!!

रा. नेमाडे यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधून ही बीजतुला केली गेली. रा. नेमाडेजींचा वाढदिवस असतो २७ मे रोजी! पण बीजतुला एक महिना ॲडव्हान्स करण्यात आली, कारण देशी वाणाचं बियाणं रुजायला बारा ते सत्तावीस दिवस लागतात! म्हणजे रा. नेमाडेजींच्या बर्थडेला या बियाण्यातून देशी अंकुर फुटणार आहेत. वाट पाहू या! आधी बीज एकले, बीज अंकुरले रोप वाढले…! पांडुरंग हरि!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: बिश्नोईने दूर केला तुफानी खेळ करणाऱ्या सुनील नारायणचा अडथळा, कोलकाताने गमावली दुसरी विकेट

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

SCROLL FOR NEXT