Mohan Bhagwat
Mohan Bhagwat 
संपादकीय

‘भागवत पुराणा’ची फलश्रुती! (अग्रलेख)

सकाळवृत्तसेवा

सरसंघचालकांनी स्वातंत्र्य चळवळीतील काँग्रेसच्या कामगिरीचा आदराने उल्लेख करणे आणि सर्वसमावेशकतेची भाषा करणे, हे संघातील वैचारिक परिवर्तन आहे, की राजकीय चाल? मोदी-शहा यांची याविषयी भूमिका काय आहे? अनेक प्रश्‍नांचे मोहोळ उठविणाऱ्या या भाषणांचे राजकीय परिमाण दुर्लक्षिता येणार नाही.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या दिल्लीस्वारीने अनेकांना अचंब्यात टाकले असून, राजधानीतील त्यांच्या ‘पुराणा’चे पडसाद आगामी निवडणुकांमध्ये शंखध्वनीप्रमाणे उमटत राहणार, अशीच चिन्हे आहेत. सर्वार्थाने आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच भागवत यांनी हे विचार मांडले, हे उघड आहे. खास निमंत्रितांसाठी आयोजित केलेल्या तीन दिवसांच्या व्याख्यानमालेत केलेली अनेक विधाने ही निव्वळ संघाची प्रतिमा उजळवण्यासाठी होती. एकीकडे काँग्रेसकडून पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांची प्रतिमा ‘शिवभक्‍त’ म्हणून निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असतानाच, भागवत हे संघाच्या कट्टर हिंदुत्ववादी प्रतिमेला छेद देऊन, सर्वसमावेशकत्वाची भूमिका मांडत आहेत. हे सारेच एका अर्थाने अनाकलनीय आहे आणि त्यामुळे आजवर ‘अखंड भारत’ आणि ‘हिंदूराष्ट्र’ अशी स्वप्ने पाहणाऱ्या हजारो स्वयंसेवकांचा मुखभंग झाला असणार! संघ असो की जनसंघ की भारतीय जनता पक्ष; या परिवाराचे अवघे तत्त्वज्ञान काँग्रेस आणि विशेषत: गांधी-नेहरू द्वेषावर आधारित आहे. मात्र, मोहनरावांनी आपल्या ‘पुराणा’च्या पहिल्याच सत्रात, देशाच्या स्वातंत्र्यचळवळीतील काँग्रेसच्या सहभागाचा आदराने उल्लेख केला आणि काँग्रेसनेच देशाला मोठे नेते दिले, असे प्रमाणपत्रही बहाल केले. अर्थात, काँग्रेसला अशा प्रमाणपत्राची गरज नसली, तरी यामुळे सर्वात संतापले असणार ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा! चार वर्षांपूर्वी दिल्लीची सत्ता स्वबळावर काबीज केल्यापासून या दोन नेत्यांचा सूर हा जवाहरलाल नेहरूंचे नाव इतिहासातून पुसून टाकण्याचाच आहे आणि तसे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे भागवत यांची या भाषणमालिकेतील हे तसेच अन्य अनेक विधाने मोदी आणि शहा यांना मान्य आहेत काय, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

भागवत यांनी आपल्या या पुराणासाठी मुहूर्तही मोठा नामी निवडला आहे. लोकसभा निवडणुकांना जेमतेम सहा- सात महिने उरले आहेत, तर किमान चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांना तीनच महिने बाकी आहेत. या पार्श्‍वभूमीवरील त्यांचे सर्वात महत्त्वाचे विधान हे मुस्लिमांबाबतचे आहे. ‘देशातून मुस्लिमांना हाकलून दिले पाहिजे, अशी भूमिका घेतली तर हे हिंदूराष्ट्र असणारच नाही,’ असे ठामपणे सांगतानाच ‘गोरक्षणाच्या नावाखाली हिंसाचार, तसेच हत्या होता कामा नये,’ असेही ते म्हणाले. मग दिल्लीपासून हाकेच्या अंतरावर झालेल्या ‘दादरीकांडा’त अखलख या निरपराध नागरिकाचा बळी गेला, तेव्हा सरसंघचालकांनी मिठाची गुळणी का धरली होती, हा प्रश्‍नच आहे. त्यांचे आणखी एक विधान हे आरक्षणाबाबत मारलेल्या कोलांटउडी संबंधातील आहे. मात्र, ‘आपल्याला आरक्षण आणखी किती काळ हवे, ते त्या समाजानेच ठरवायचे आहे!’ असे त्यांनी सांगितले. त्याचे कारण अर्थातच बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनीच आरक्षणाला केलेल्या विरोधामुळे भाजपला बसलेल्या मोठ्या फटक्‍यात आहे. शिवाय, भागवत यांनी सर्वात मोठा टोला हा थेट मोदी यांनाच लगावला आहे. उत्तर प्रदेशात मोदी यांनी ‘समशान और कब्रस्तान’ अशी देशाची आणखी एकदा फाळणी केली होती. ‘असा विचार हा निव्वळ सत्तासंपादनासाठी असतो, समाजहितासाठी नाही!’ हे भागवत यांचे विधान मोदी यांच्याबरोबरच शहा यांनाही झोंबणारे आहे. हिंदू-मुस्लिम विवाहाला ‘लव्ह-जिहाद’चे रूप देणारे हे नेते आता भागवत यांच्या या विधानाचा ‘आदेश’ म्हणून स्वीकार करतात काय, हे बघणे कुतूहलाचे ठरणार आहे.

भागवत यांचा तीन दिवसांतील सारा सूर हा संघपरिवाराला ‘सॉफ्ट हिंदुत्वा’च्या दिशेने घेऊन जाणारा आहे. मोदी-शहा यांच्या आक्रमक हिंदुत्वात ते बसते काय? वाजपेयी हे हिंदुत्वाबाबत सौम्य भूमिका घेत असतानाच्या काळात संघ अत्यंत आक्रमक असे. मग मोदी यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे संघाला सौम्य, तसेच सर्वसमावेशक भूमिका घेणे भाग पडले, असे समजायचे काय? या साऱ्या प्रश्‍नांची उत्तरे मिळायला हवीत आणि संघाने द्वितीय सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर यांचे काही ‘विचारधन’ कालबाह्य ठरल्यामुळे भागवत यांनी सांगितल्याप्रमाणे खरोखरच नाकारले आहे काय, हा तर सर्वात कळीचा प्रश्‍न आहे. -आणि तसे खरोखरच असेल तर आपल्याच परिवारातील विश्‍व हिंदू परिषद, बजरंग दल, स्वदेशी जागरण मंच यांना त्यांची भूमिका मान्य आहे का, हाही प्रश्‍न उपस्थित होईल. वाजपेयी यांच्या सौम्य अशा ‘समझोता एक्‍सप्रेस’मुळे वैतागून संघाने २००४ मध्ये भाजपला बळ पुरविले नव्हते, हे सर्वश्रुत आहे. आता संघ अधिक धोरणी झाला आहे आणि हाती आलेली सत्ता टिकवणे महत्त्वाचे आहे, हे त्यांना कळून चुकले आहे. बाकी हिंदुत्वाचे काय व्हायचे ते होवो, हीच या भागवत पुराणाची फलश्रुती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे पहिल्यांदाच काँग्रेसला देणार मत; मतदानापूर्वी केली मोठी घोषणा

Indian CEO In USA: 'अमेरिकेत कंपनीचा CEO होण्यासाठी भारतीय असणं गरजेचं', असं का बोलले अमेरिकेचे राजदूत?

Latest Marathi News Live Update: भाजपचे उमेदवार पराभूत होणार हे लक्षात आल्याने भाजप सरकारने कांदा निर्यातीचा निर्णय घेतला आहे- राजू शेट्टी

Shiv Sangram: 'शिवसंग्राम' विधानसभेच्या 12 जागा लढवणार, लोकसभेची रणनीती काय? ज्योती मेटेंनी स्पष्ट केली भूमिका

IPL 2024 DC vs MI Live Score : अखेर मुंबईला मिळालं पहिलं यश; आक्रमक खेळणाऱ्या फ्रेझर-मॅकगर्कचं शतक हुकलं

SCROLL FOR NEXT